शेतकरी आता पारंपरिक पिके सोडून वेगवेगळ्या प्रकारची पिके घेऊ लागली असून उच्च तंत्रज्ञानाचा वापर देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. आता आपण जर फुल शेतीचा विचार केला तर बरेच शेतकरी बहुतांशी प्रमाणात गुलाब आणि झेंडू या दोन फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. परंतु कार्नेशन या फुलाची लागवड पॉलीहाउस तंत्राचा वापर करून केली तर नक्की शेतकऱ्यांना चांगला नफा मिळविणे शक्य आहे. या लेखात आपण पॉलिहाऊस मधील कार्नेशन लागवडीबद्दल माहिती घेऊ.
पॉलिहाऊस मधील कार्नेशन लागवड
एकंदरीत आपण कार्नेशन फुलांचा विचार केला तर स्वच्छ सूर्यप्रकाश व थंड कोरडे हवामान या फुल पिकासाठी उत्तम असते. कार्नेशन लागवडीसाठी जर तुम्हाला पॉलिहाऊस उभारायचे असेल तर त्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
त्यानंतर ज्या ठिकाणी पॉलिहाऊस उभारायचे आहे त्याठिकाणी मातीत शेणखत तसेच बारीक लाल पोयटा इत्यादी मिसळून जमीन चांगली सपाट करून घेऊन 100 सेंटीमीटर रुंद चार सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून दोन वाफ्यामध्ये 50 सेंटिमीटर पेक्षा जास्त अंतर ठेवता कामा नये.
पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे पाणी देण्यासाठी तसेच तापमान नियंत्रण व पॉली हाउस मधील एकंदरीत आद्रता नियंत्रण करण्यासाठी चांगला उपयोग होतो. पॉलिहाऊस मध्ये तुम्ही जी काही माती टाकलेली असेल त्या मातीचे शंभर प्रतिचौरस मीटर क्षेत्राला दहा लिटर फॉरमॅलिनची फवारणी करून निर्जंतुकीकरण करून उत्तम ठरते.
लागवड कशी करावी?
गादी वाफे तयार केल्यानंतर जेव्हा तुम्ही लागवड कराल तेव्हा ती जास्त खोलवर न करता दोन रोपातील अंतर 15 सेंटिमीटर पेक्षा जास्त न ठेवता करावी. लागवड करत असताना रोपाचा 1/4 भाग खड्ड्यात गाडावा आणि बाकीच्या ¾ भागाला चांगली मातीची भर द्यावी व पॉलीहाउस आठवडाभर बंद ठेवा.
अधिक उत्पादनासाठी या टिप्स
1- गादी वाफे तयार करताना चांगल्या दर्जाची लाल माती व शेणखताचा वापर करावा.
2- फार्मोलीनने निर्जंतुकीकरण केल्यानंतर चांगला वाफसा आल्यानंतर लागवड करावी.
3- नंतर गादीवाफ्यावर ठिबकच्या लॅटरल व उपनळ्या मांडणी व्यवस्थित आणि नियोजनबद्ध करावी.
4- लागवड केल्यानंतर बुरशीनाशक द्रावण रोपांना द्यावे व आधारासाठी दोन जाळ्या लागवडीपूर्वी बसवून घ्याव्यात. लागवड केल्यानंतर तीन आठवड्यांपर्यंत हलकेसे पाण्याचा पुरवठा करावा.
लागवड करत असताना लागवडीच्या वेळेस शंभर चौरस क्षेत्राला 12:6:18 पाच किलो, कॅल्शियम नायट्रेट अडीच किलो, मॅग्नेशियम सल्फेट अडीच किलो व 250 ग्रॅम बोरॅक्स आणि 19:19:19 दोनशे ग्रॅम वापरावे. परत दोन महिन्यांनी हीच खते द्यावीत परंतु प्रमाण अगोदर पेक्षा थोडे कमी करावे व त्यासोबत विद्राव्य खतांचा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पुरवठा करावा.
मावा, फुलकिडे व कळी पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी
15 मिली न्यूऑन, पाच मिली अंबुस, एक मिली डायकोफॉल, 40 ग्रॅम नीम केक किंवा तीन मिली सुजान प्रति एक लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
कार्नेशन फुलांची काढणी
जेव्हा कळी पक्व दिसू लागेल तेव्हा जमिनीपासून वीस सेंटीमीटर अंतरावर दांड्यासह फुलांची काढणी करावी व सिल्वर थायो सल्फेटच्या पाण्यामध्ये वापर करून त्या बादलीत फुलांचे दांडे ठेवावेत. प्रति दोन दिवसांनी फुलांची काढणी करावी. जर आपण उत्पादनाचा विचार केला तर प्रति चौरस मीटरला 250 फुलांचे उत्पादन मिळते.
नक्की वाचा:Fertilizer: शेतकऱ्यांनी 'नॅनो युरिया' का वापरावा? काय आहे त्याचे फायदे? वाचा सविस्तर
Published on: 18 August 2022, 03:33 IST