भारताच्या अर्थाव्यवस्थेचा पाठीचा कणा अशी ओळख कृषिक्षेत्राची आहे. दरवर्षी कृषी क्षेत्रात भारत नवीन उच्चाँक गाठत असतो. भारतात ह्यावर्षी भातपीकाचे व कडधान्याचे लागवडीखालील क्षेत्र चांगलेच लक्षणीय वाढले आहे. भारतात ह्या पिकांच्या लागवडिखालील क्षेत्र वाढणे ही एक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बाब असल्याचे सांगितले जात आहे. देशात कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढवण्याबरोबरच आता मागील वर्षीच्या तुलनेत भातपिकाचे क्षेत्रही वाढले आहे. तूर आणि उडीद सारख्या प्रथिनेयुक्त पिकांखालील क्षेत्र वाढले आहे.
देशात आतापर्यंत सामान्य खरीप क्षेत्रात 1073.01 लाख हेक्टरपेक्षा जास्तची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत 1106.60 लाख हेक्टरच्या तुलनेत आतापर्यंत 1096.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. अशा प्रकारे यावर्षी सुमारे 10 लाख हेक्टर कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुसरीकडे, हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात देशात अधिक पाऊस पडण्याचे संकेत दिले आहेत, जे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील.
कृषी मंत्रालयाने जाहीर केलेली आकडेवारी खालीलप्रमाणे
कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत भातपिकाची लागवड सुमारे 1.5 लाख हेक्टरने वाढून 409.55 लाख हेक्टर झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या 407.97 लाख हेक्टरच्या तुलनेत जास्त आहे. दुसरीकडे, कडधान्यांची पेरणी गेल्या वर्षीच्या 136.98 लाख हेक्टरच्या तुलनेत सुमारे 2.66 लाख हेक्टरने वाढून 139.63 लाख हेक्टर झाली आहे.
यामध्ये 49.84 लाख हेक्टरमध्ये तूरडाळीची पेरणी झाली आहे, जी गेल्या वर्षी आतापर्यंत 47.98 लाख हेक्टरमध्ये झाली होती. मागील वर्षी या कालावधीत 178.21 लाख हेक्टरमध्ये भरड धान्याची पेरणी झाली होती आणि ह्या वर्षी सुमारे 173.79 लाख हेक्टरमध्ये भरड धान्यांची पेरणी झाली आहे. दुसरीकडे, तेलबियांचे क्षेत्रफळ सुमारे 192.56 लाख हेक्टर आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत 195.71 लाख हेक्टर होते. यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे आतापर्यंत सोयाबीनची पेरणी 121.67 लाख हेक्टरमध्ये झाली आहे जी गेल्या वर्षी 121.16 लाख हेक्टर होती.
त्याचप्रमाणे, आतापर्यंत 54.70 लाख हेक्टरमध्ये ऊसाची लागवड झाली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 53.96 लाख हेक्टर होती. त्याच वेळी, कापसाची पेरणी आतापर्यंत 119.46 लाख हेक्टरमध्ये झाली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 126.80 लाख हेक्टर होती.
Published on: 16 September 2021, 09:22 IST