काकडी या पिकाची योग्य नियोजन करून जर उत्पन्न घेतले तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत सुधारणा होऊ शकते. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जामनेर, यावल, पारोळा व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काकडीचे अधिक प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. काकडीला उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मागणी असते. जर शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात योग्य नियोजन करून चांगले उत्पन्न घेतले तर शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
काकडी लागवडीचा कालावधी - काकडी पिकाची लागवड वर्षाच्या जून किंवा जुलै आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात करणे महत्वाचे असते. लागवड करण्याआधी शेताची चांगली मशागत करून योग्य प्रमाणात शेणखताचा पुरवठा करावा. जर माती परीक्षण केलेले असेल तर उत्तम. 50 किलो पालाश 50 किलो स्फुरद या रासायनिक खतांचा पुरवठा योग्याप्रमाणात करावा. नत्राचा पुरवठा एकाचवेळेस न करता दोन टप्प्यात विभागून द्यावा. रासायनिक खतांचा पुरवठा खुरपणी झाल्यानंतर साधारणतः 3 आठवडयांनी पहिला डोस व 6 हप्त्यानंतर 2 रा डोस द्यावा.
जमीन व हवामान -काकडी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम किंवा रेताड जास्त प्रमाणात उपयोगी आहे. जास्त खोल व निचरा होणाऱ्या जमिनीतही लावणी करता येते. काकडी पिकाच्या उत्पादनात हवामान या घटकाचा फार प्रमाणात प्रभाव पडतो. साधारणपणे काकडी पिकास उष्ण हवामान लाभदायी असते.लागवडीच्या वेळी 11 अंश सेल्सिअस पेक्षा तापमान कमी नसावे जर तापमान यापेक्षा कमी असेल तर पिकाच्या उगवण शक्तीवर त्याचा परिणाम होतो. काकडी पिकाच्या वाढीसाठी कमीतकमी 18 ते जास्तीतजास्त 24 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते.
हेही वाचा:आंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे; kidney stone साठी आहे गुणकारी
लागवड पद्धत -काकडी पिकाची लागवड सरी -वरंबा पद्धतीने केलेली चांगले असते. 1.5 ते 1 मी. चे आळे पाडून 3 फुटाचीसरी पाडावी व त्यात 90 सेमी अंतरावर टोकन पद्धतीने लावणी करावी.
पाण्याचे प्रमाण - जमिनीचा मगदूर पाहून व इतर वेळेस गरज ओळखून पाण्याच योग्य तो पुरवठा करावा काकडी पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. जर उन्हाळ्यात उन्हाचे प्रमाण जास्त असेल तर पाण्याचा ताण आला तर वेल पिवळे पडतात. शक्यतो फुलधारणेच्या वेळी पाणी योग्य प्रमाणात देणे फार महत्वाचे आहे. पाण्याचा ताण देऊन एकदम जास्त प्रमाणात पाणी दिल्यास फळांना तडे पडू शकतात. काकडीत मादी फुलांची वाढ होणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. त्याकरिता जिब्रेलिक ऍसिड 10-25 ppm पीपीएम किंवा बोरॉन 3 पीपीएम च्या फवारण्या पीक 2-4 पानांवर असताना करावा त्यामुळे मादी फुलांची वाढ होण्यास मदत होते. अन्नद्रव्याची कमतरता किंवा प्रमाणातील अधिकता काकडीच्या उत्पादन वाढीसाठी योग्य नाही.
काकडीवरील रोग - फळकूज आणि खोडकूज हा काकडी पिकावरील मुख्य रोग आहे. त्यासाठी मॅन्कोझेब किंवा क्लोरोथॅलॉनॉल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पांढऱ्या बुरशीसाठी मॅट्यालक्सील किंवा मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पांढरी माशी, मावा, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडींचा प्रतिबंध करणे फार महत्वाचे असते. त्यासाठी इमोडाक्लोप्रिड (कॉन्फिडोर )किंवा, उलाला या कीटकनाशकांची फवारणी प्रति 15लिटर पाण्यात 8ते 10 मिली या प्रमाणात करावी जर एकात्मिक कीड व्यवस्थापन केले तर फायद्याचेच ठरते. फळांची तोडणी शक्यतो काकडी निघायला चालू झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी करावी कारण कोवळ्या फळांना बाजारात चांगली मागणी असते, पर्यायाने चांगला भाव मिळून अधिकचे उत्पन्न मिळते.
Published on: 15 July 2020, 06:01 IST