Agripedia

Water Management : ज्वारीची पेरणी झाल्यानंतर ९०-९५ दिवसात दाणे चिकाच्या अवस्थेत असतात.पिकास पाण्याची गरज असल्यास चौथे पाणी दयावे.हलक्या व मध्यम जमिनीतील ज्वारीस या पाण्याची गरज भासते.भारी जमिनीत ओल धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते.तसेच या अवस्थेत काळ्या भारी जमिनीस भेगा पडलेल्या असतात.भेगाळलेल्या जमिनीस पिकाला पाणी देणे मुश्किल होते आणि गरजेपेक्षा जास्त पाणी दयावे लागते आणि ज्वारी लोळण्याचे प्रमाण वाढते.

Updated on 02 February, 2024 10:56 AM IST

डॉ.आदिनाथ ताकटे

सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही ज्वारीची पिके ही फुलोऱ्यात, तर काही दाणे भरण्याच्या अवस्थेत, अगदी वेळेवर पेरलेल्या गव्हाचे पीक फुलोऱ्यात, उशिरा पेरलेले गव्हाचे पीक फुटवे फुटण्याच्या, तर उशिरा उशिरा पेरलेल्या गव्हाचे पीक मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत आहे. हरभऱ्याचे पीक फुलोऱ्यात, तर काही घाटे भरण्याच्या अवस्थेत,सूर्यफुल, करडईचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.शाश्वत पीक उत्पादनासाठी या पिकांना या काळात पाणी देण्याची नितांत आवश्यकता आहे.त्यामुळे शेतकरी बंधूनी कटाक्षाने उपलब्ध पाण्याच्या वापर केला पाहिजे.

रब्बी ज्वारी

सर्वसाधारणपणे ७०-७५ दिवसात ज्वारी फुलोऱ्यात येते.या अवस्थेत पाणी मिळाल्याने कणसात दाणे भरण्यास मदत होते आणि कणसाचे वजन वाढून एकूण उत्पादन वाढते.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असेल त्यांनी ज्वारीच्या पिकास पाणी दयावे.

रब्बी ज्वारीस पाणी देण्याच्या अवस्था

ज्वारी पिकाचा जोमदार वाढीचा काळ(पेरणीनंतर २८ ते ३० दिवस)
पीक पोटरीत असतांना (पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी )
पीक फुलोऱ्यात असतांना(पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी)
कंसात दाणे भरण्याचा काळ (पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस)

ज्वारीची पेरणी झाल्यानंतर ९०-९५ दिवसात दाणे चिकाच्या अवस्थेत असतात.पिकास पाण्याची गरज असल्यास चौथे पाणी दयावे. हलक्या व मध्यम जमिनीतील ज्वारीस या पाण्याची गरज भासते.भारी जमिनीत ओल धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते.तसेच या अवस्थेत काळ्या भारी जमिनीस भेगा पडलेल्या असतात.भेगाळलेल्या जमिनीस पिकाला पाणी देणे मुश्किल होते आणि गरजेपेक्षा जास्त पाणी दयावे लागते आणि ज्वारी लोळण्याचे प्रमाण वाढते.भारी जमिनीत तीन पाणी दिले असता मिळणारे उत्पादन,चार पाण्याच्या उत्पादनाच्या जवळपास मिळते.

गहू

भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.मध्यम जमिनीसाठी १५ दिवसाच्या अंतराने ७ पाळ्या द्याव्यात तर हलक्या जमिनीस १०-१२ दिवसाच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात.परंतु पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होते.त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.पाणी अपुरे असल्यास व एक ते पाच पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पुढील प्रमाणे पाणी दयावे.

एकाच पाणी देणे शक्य असल्यास ते पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी दयावे.
दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी व दुसरे ५५-६० दिवसांनी दयावे.
तीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी,दुसरे ५५-६० दिवसांनी तर तिसरे ७०-८० दिवसांनी दयावे.
चार पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी,दुसरे ५५-६० दिवसांनी तर तिसरे ७०-८० दिवसांनी दयावे तर चौथे पाणी ९०-१०० दिवसांनी दयावे.
पाच पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी,दुसरे ४०-४५ दिवसांनी तर तिसरे ५५-६०दिवसांनी,चौथे पाणी ७०-८० दिवसांनी तर पाचवे ९०-१०० दिवसांनी दयावे.
अपुरा पाणी पुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी देणे शक्य आहे,त्या क्षेत्रात पंचवटी (एनआयडीडब्लू १५)नेत्रावती(एनआयएडब्लू १४१५)गव्हाच्या वाणांचा वापर करावा.गव्हाचे एकाच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते व दोन पाणी दिले तर उत्पादनात २० टक्के घट येते,अशा रीतीने गव्हाचे पाणी व्यवस्थापन करावे.

हरभरा

जिरायत हरभरा क्षेत्रात ओलावा खूप कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी दयावे.मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी दयावे. भारी जमिनीस पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेश्या होतात.त्यासाठी ३०-३५ दिवसांनी व दुसरे पाणी ६५-७० दिवसांनी दयावे.

स्थानीक परिस्थिती नुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे.जमिनीला फार मोठया भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी दयावे. हरभऱ्यास प्रमाणशीर पाणी देणे अत्यंत महत्वाचे असते,जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो.पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी,अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते. हरभऱ्यास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे.तुषार सिंचन पद्धतीने हरभरा पिकास पाणी दिल्यास हरभरा उत्पादनात आशादायक आणि भरीव वाढ होते.

सूर्यफूल

पिकास संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे.रोपावस्था,फुलकळी अवस्था,फुलोऱ्याची अवस्था,दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये.फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.

करडई

करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते.मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही.कालांतराने ओलावा कमी झाला आणि पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी तडे जाण्यापूर्वी एक संरक्षित पाणी देणे अधिक चांगले.दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात येताना ५५ ते ६० दिवसांनी दयावे.पिकास पाण्याचा जास्त ताण पडू नये. तसेच भेगा पडल्यानंतर पाणी दिले असता पाणी जास्त प्रमाणात जमिनीत मुरते. जास्त पाण्यामुळे पीक मोठया प्रमाणात मर रोगास बळी पडते म्हणून करडई पिकास हलके पाणी दयावे.

लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे,मृद शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, मो.९४०४०३२३८९

English Summary: Crop Water Management Give water to the crops as per requirement
Published on: 02 February 2024, 10:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)