Agripedia

कोरडवाहू शेतीत “ओल तसे मोल” या उक्तीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो.एकूण पडणाऱ्या पावसापैकी 10 ते 20% पाणी जमिनीवरून वाहून जाते. बाकीच्या पाण्यापैकी 10% पाणी निचऱ्या द्वारे व 60 ते 70% बाष्पीभवनाद्वारे निघून जाते. जमिनीत त्यामुळे सुमारे 10% पाणी उपलब्ध राहते. वाहून जाणारे पाणी, निचऱ्याद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात कसे साठविता येईल आणि त्या ओल्याव्याचा उपयोग पीक उत्पादन वाढीसाठी कसा करता येईल, हा कोरडवाहू शेतीच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे म्हणून कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर येथे त्या दृष्टीने सखोल अभ्यास करण्यात आला आणि काही महत्वाच्या तंत्राचा शेतीमध्ये अवलंब करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बांधबंदिस्ती, आंतरबांध व्यवस्थापन, उतारास आडवी मशागत करणे, कोळपणी करणे, आच्छादनाचा वापर, शेततळी, वनस्पतींचा बांधासारखा वापर ही महत्वाची तंत्र आहेत.

Updated on 27 February, 2019 3:12 PM IST


कोरडवाहू शेतीत “ओल तसे मोल” या उक्तीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. एकूण पडणाऱ्या पावसापैकी 10 ते 20% पाणी जमिनीवरून वाहून जाते. बाकीच्या पाण्यापैकी 10% पाणी निचऱ्याद्वारे व 60 ते 70% बाष्पीभवनाद्वारे निघून जाते. जमिनीत त्यामुळे सुमारे 10% पाणी उपलब्ध राहते. वाहून जाणारे पाणी, निचऱ्याद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात कसे साठविता येईल आणि त्या ओल्याव्याचा उपयोग पीक उत्पादन वाढीसाठी कसा करता येईल, हा कोरडवाहू शेतीच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे म्हणून कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर येथे त्या दृष्टीने सखोल अभ्यास करण्यात आला आणि काही महत्वाच्या तंत्राचा शेतीमध्ये अवलंब करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बांधबंदिस्ती, आंतरबांध व्यवस्थापन, उतारास आडवी मशागत करणे, कोळपणी करणे, आच्छादनाचा वापर, शेततळी, वनस्पतींचा बांधासारखा वापर ही महत्वाची तंत्र आहेत.

जमिनीत ओल टिकवून ठेवण्याच्या उपायाआधी जमिनीतील ओल कशी कमी होते हे पहावे.जमिनीत साठवून राहिलेली ओल पिकांनी वापरणे, पृष्ठभागावरून बाष्पीभवनामुळे ओल उडून जाणे, भेगा पडल्यामुळे त्यातून बाष्पीभवन होणे, तणावाटे ओल नष्ट होणे या चार मार्गाने ओल कमी होते. त्यातील पिकाच्या प्रत्यक्ष वाढीसाठी अतिशय कमी प्रमाणात ओल लागते.बहुतांशी (सुमारे 60 टक्के) ओल ही बाष्पीभवनामुळे उडून जाते. वरील उल्लेख केलेल्या मार्गाने कमी होणाऱ्या ओलीचा बंदोबस्त त्यावर केलेल्या उपायाने होतो.

एक कोळपणी आणि अर्धे पाणी

पिक वाढताना त्याबरोबर तण वाढत असते.हे तण पाणी अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश याबाबतीत पिकांशी स्पर्धा करते. पिक उगवून आल्यावर त्यात ठराविक दिवसानंतर कोळपणी केली जाते. त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवणे होय. तणामुळे कमी होणारी ओल, तणांचा बंदोबस्त केल्याने राखली जाते. याशिवाय माती हलवून ढिली केल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो. त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते. यामुळे ओल टिकवून धरण्यामध्ये कोळपणीचा फार मोठा वाटा आहे.

रब्बी हंगामात तर कोळपणीचा फार मोठ सहभाग आहे. ग्रामीण भागात “एक कोळपणी आणि अर्धे पाणी“ अशी म्हण आहे. म्हणजे एकदा कोळपणी केली तर जवळ जवळ पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. या तत्वांचा अवलंब करून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारी करिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे.

  • पहिली कोळपणी पीक तीन आठवड्याचे झाले असता फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे वाढणारे तण नष्ट करून त्या वाटे होणारा पाण्याचा  अपव्यय टाळता येतो.
  • दुसरी कोळपणी पीक पाच आठवड्याचे झाल्यावर पासेच्या कोळप्याने करावी. त्यावेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सुक्ष्म भेगा पडू लागलेल्या असतात त्या कोळपणी मुळे बंद होतात. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंद होते. हा मातीचा हलका थर जो तयार होतो त्याला इंग्रजीमध्ये डष्ट मल्च (Dust Mulch) असे म्हणतात.
  • तिसरी कोळपणी पीक आठ आठवड्याचे झाले असता करावी. त्यावेळी कोळपणी करण्यासाठी दातेरी कोळपे वापरण्याची शिफारस आहे. जमिन टणक झाल्याने फासाचे कोळपे नीट चालत नाही. त्याकरिता दातेरी कोळपे वापरले असता ते मातीत व्यवस्थित घुसून माती ढिली करते आणि त्यामुळे भेगा बुजविल्या जातात. त्यावेळी जमिनीत ओल फार कमी असेल, त्यावेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते.

आंतरमशागती करिता खुरपणी देखील अपेक्षित आहे. परंतु सुरुवातीस ज्यावेळी जमिन मऊ आहे आणि तण वाढत आहे, त्यावेळी या खुरपणीचा लाभ होतो. परंतु बैल कोळपे चालविण्याने खोलवर मशागत करता येते आणि जमिन भुसभुशीत होऊन मातीचा थर चांगला बसू शकतो. आंतरमशागतीचा अर्थ पीक उगवून आले असता त्याच्या दोन ओळीत केलेली मशागत. त्यात काही प्रमाणात विरळणी देखील करता येईल. मर्यादेपेक्षा ज्यादा असलेली रोपे काढून टाकणे हा पण एक ओलावा टिकविण्याचा उपाय आहे.


परावर्तकाचा वापर

सूर्यप्रकाशामध्ये असलेल्या उष्णतेने बाष्पनिकासनाची क्रिया फार मोठया प्रमाणात होते. जेवढी उष्णता अधिक तेवढे निश्काषण अधिक त्यामुळेच उन्ह्याळयात पाणी जास्त लागते. ही प्रक्रिया मंद करण्यासाठी झाडाच्या पानावर पडणारी उष्णता कमी करणे हा एक उपाय आहे. त्यासाठी सूर्यकिरण परावर्तीत करता येणे शक्य आहे. पांढरा रंग हा सूर्यप्रकाश परावर्तीत करतो, म्हणून आपण उन्हात रंगीत कपडे न वापरता पांढरे कपडे वापरतो. त्याप्रमाणे पानावर जर पांढरा परावर्तीत करणारा पदार्थ फवारला तर हे शक्य होते. त्यासाठी केओलीन 8 टक्के जर पानावर फवारले तर पानांवर पांढरा थर बसतो. त्यामुळे प्रकाशकिरण परावर्तीत होतात आणि पाण्याची बचत होते. हा फवारलेला रंग 8-10 दिवसांनी कमी होतो. म्हणून साधारणपणे दर 15 दिवसांनी फवारणी करावी, अशाप्रकारे 3 ते 4 फवारण्या उपयुक्त ठरतात.

केओलीन, पांढरा रंग अगर खडूच्या पावडरचा आठ टक्के फवारणीमुळे बाष्पीभवन कमी होऊन, पिकास अवर्षणाचा ताण सहन करण्यास मदत होते. दोन टक्के युरियाची फवारणी शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाने करावी.

इतर कामांमध्ये खतांचा वापर, पीक संरक्षण इत्यादी कामे वेळेवर केल्याने पिकांचे तेज चांगले राहून पाण्याचा ताण सहन करण्यास ते सक्षम होतात. वारा प्रतिबंधक झाडांचे/वनस्पतींचे शेताभोवती कुंपण घालावे. शेवरी, सुबाभूळ सारख्या वनस्पती लावल्यास चार आणि लाकूड मिळते. ता कुपंनामुळे वाऱ्याची गती रोखून 30 ते 30 मी. मी ओलाव्याची बचत होते. 

आच्छादनाचा वापर

आच्छादनाचा वापर बाष्पीभवन थांबविणे आणि तणांचा बंदोबस्त करणे असा दुहेरी उपयुक्त आहे. आच्छादन साधरणत शेतीतील काडीकचरा टाकून करता येते. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर येथे या विषयी फार मोठया प्रमाणात संशोधन झाले आहे. आच्छादन साधारणपणे तूरकाट्या, धसकटे, वाळलेले गवत, गव्हाचे काड इत्यादी प्रकाराने करता येते. हेक्टरी 5 ते 10 टन आच्छादन टाकावे लागते. आच्छादनाच्या वापराने 25 ते 30 मी.मी ओलाव्याची बचत होते व त्यामुळे पिकांचे उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी वाढते असे सिद्ध झाले आहे. आच्छादन जितके लवकर टाकता येईल, तेवढे जास्त उपयुक्त ठरते. कोणत्याही परिस्थितीत पीक सहा आठवद्याचे होण्याच्या आत आच्छादनाचा वापर करावा.

कोळपणीपेक्षा आच्छादन अधिक प्रभावी आहे. आच्छादन हे बी उगवल्यापासून 15 दिवसाच्या आत लवकरात लवकर दोन ओळीत सारखे पसरवून टाकावे. त्यामुळे बाष्पीभवनावाटे होणाऱ्या ओलाव्याची हानी कमी होऊन पिकास ओलावा निकडीच्या अवस्थेत 35 ते 50 मि.मी अधिक मिळतो. तसेच जमिन भेगाळण्याची तीव्रता कमी होते. म्हणूनच रब्बी ज्वारीस आच्छादनाचा वापर करणे म्हणजे एक संरक्षक पाणी दिल्यासारखे आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण कोळपणी करण्यासाठी परिस्थिती येण्याच्या वेळेपर्यंत बरेचशी ओल उडून गेलेली असते. कोळपणी करण्यासाठी रोपे उंच व्हावी लागतात. या कालावधीतच जास्ती जास्त ओल टिकवून धरण्याची शक्यता असते म्हणून आच्छादन जेवढे लवकर टाकता येईल तेवढे टाकावे.

वरील सांगितलेले निरनिराळे उपाय परिस्थितीनुरूप वापरावे. एकाचवेळी सर्व उपाय वापरता येणे शक्य नसते. प्रचलित शेती पद्धतीत शक्य असलेला सर्वात सुलभ, सर्वाना वापरता येणारा उपाय म्हणजे “कोळपणी” ही कोळपणी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे करून जमिनीत ओलावा अधिक प्रमाणात टिकवून धरता येतो आणि पीक उत्पादन वाढवता येते.

संरक्षित पाणी

अवर्षणाचा ताण कमी करण्यासाठी पिकांच्या संवेदनक्षम एक तरी संरक्षित पाणी दयावे. सरी वरंबा पद्धतीमध्ये लावलेल्या पिकांना एक आड एक सरी भिजवून पाणी दयावे.हंगामी पिकांसाठी तुषार सिंचन व बारमाही पिकांसाठी तसेच फळबागांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्यामुळे पाण्याची बचत करता येईल.

पीक वाढीच्या काळात पाण्यामध्ये खंड पडला तर फवारणीद्वारे पिकास अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे जास्त फायदेशीर ठरते.त्यासाठी डी ए पी 2% तसेच पोटॅशियमयुक्त खतांचा (उदा. पोटॅशियम नायट्रेट/ पोटॅशियम क्लोराईड) 2% यांची फवारणी केल्यास पिकांमध्ये अवर्षणामध्ये तग धरून राहण्याची शक्ती वाढते, अशा वेळी जवळपास पाण्याची उपलब्धता असल्यास संरक्षित पाण्याचा अवश्य वापर करावा. पीक फुलोऱ्यात असताना अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना संरक्षित पाणी दिल्यास पीक उत्पादनात दुपटीने वाढ होते.

रोपांची विरळणी करणे

रोपांची विरळणी करून जमिनीतील अन्नद्रव्ये व पाणी याची बचत करावी. हे अन्नद्रव्ये व पाणी इतर रोपांना मिळून ती ताण सहन करतात. त्याच प्रमाणे अवर्षणाच्या वेळी पिकांच्या पानांतून जादा पडणारे पाणी कमी करण्यासाठी खालची पाने कमी करून वरची 4-5 कार्यक्षम पाने ठेवावीत.

डॉ. आदिनाथ ताकटे
प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
9404032389

English Summary: Crop management for reducing drought stress
Published on: 28 October 2018, 07:30 IST