संजिवकांच्या वापराने निश्चित फायदा होतो. मात्र, गुणवत्ता चांगलीच असावी. योग्य वेळीच वापर व्हावा व किंमतसुद्धा परवडणारी असावी यासाठी ही सर्व उत्पादने तज्ज्ञां च्या सल्ल्याने किंवा चांगल्या विश्वासपात्र व्यक्तीच्या सल्ल्यानेच वापरावीत. यामध्ये बदल करू नये. आपण मागितलेलीच उत्पादने मिळण्यासाठी आग्रही असावे. कोणतीच दोन उत्पादने सारखी नसतात किंवा एकमेकांसारखी शक्यतोवर नसतात. त्यांच्या वापरामध्ये बदल करावयाचा असल्यास स्वतःच्या जबाबदारीवर करावा. फक्त झाड हिरवे होणे म्हणजेच चांगले रिझल्ट आले असे नाही.
क्लोरोमेकॉट क्लोराईड
क्लोसीन/लिव्होसीन या रसायनाचा उपयोग पिकाच्या कायिक वाढीचे रूपांतर फळधारणेमध्ये करण्यासाठी करतात. हे फवारल्यानंतर पिकाच्या फांद्या, उंची, पाने यांचा आकार व संख्या कमी वाढून मिळालेल्या अन्नद्रव्याचा वापर हा पाते, फुले लागण्यासाठी अन्नद्रव्य पानांमध्ये साठवण्यासाठी केला जातो. ज्यामुळे पिकाच्या अवास्तव वाढीवर नियंत्रण येते व त्याचा फायदा जास्त फूल, फळधारणेमध्ये होते. वेगवेगळ्या पिकांमध्ये लिव्होसीनचा वापर वेगवेगळ्या प्रकारे व वेगळ्या प्रमाणात होतो.
कापसाला लिव्होसीनचा वापर फवारणीद्वारे करतात. यामध्ये दोन पद्धती आहेत. एक म्हणजे पीक ७५ दिवसांचे असताना एकाच फवारणीत लिव्होसीन ३ मिली प्रतिपंप वापरायचे. दुसरी म्हणजे पीक ५० दिवसांचे असताना १ मिली, ६० दिवसाला २ मिली व ७० दिवसाला ३ मिली प्रतिपंप वापरायचे. पहिल्या पद्धतीमध्ये फवारणीनंतर झाडाची वाढ थांबून जाईल व फळधारणा होईल व दुसऱ्या पद्धतीमध्ये झाडाची वाढ हळूहळू मंदावेल व तेवढ्याच प्रमाणात जोरात पाते, फुले लागतील. आपल्याला हवी तशी वाढ आपण ठेवू शकू. ज्या ठिकाणी भरपूर अन्नद्रव्ये देतात व ज्या शेतात कापूस खूप वाढतो अशा ठिकाणी दुसरी पद्धत वापरतात. एखाद्या वेळेस खत जास्तच दिलेले असेल व ७० दिवसाला कापूस दाटण्याची शक्यता असल्यास ३ मिलीऐवजी ४ मिली लिव्होसीनचा वापर करावा. जसे सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद, मूग या व इतर अनेक पिकांमध्ये क्लोसीन/लिव्होनीसनचा वापर पीक कळी अवस्थेत असताना करावा. त्यानंतर वापरल्यास त्याचे परिणाम दिसत नाहीत व या पिकांसाठी याप्रमाणेसुद्धा जास्त शिफारशीत आहे.
क्लोरोमेकॉट क्लोराडटचे व्यापारी नावे क्लोसीन/लिव्होसीन व व्हॅमसी आहेत. कापसामध्ये यांचा वापर चुकूनही ४ मिली प्रतिपंप यापेक्षा जास्त करू नये.
स्टिमुलंट
पिकामधील अनेक प्रकारच्या गतिविधी वाढवण्यासाठी व पिकास उत्तेजक प्रेरक म्हणून स्टिमुलंटचा वापर करतात. ज्यामुळे पात्यांच्या व फुलांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते. झाडाची सर्वांगीण वाढ जोरात होऊन बोंडांचा आकार वाढतो, पानांचा आकार वाढतो. झाडाची भूक वाढते आणि या सर्व परिणामांमुळे खूप कमी खर्चात मोठा फायदा म्हणजेच मोबदला मिळतो. बाजारामध्ये शेकडो प्रकारचे स्टिमुलंट अनेक नावाने उपलब्ध आहेत; पण त्यातील विश्वासपात्र व्यक्तीने शिफारस केलेले वापरावे
स्टिमुलंटचा वापर करताना जमिनीमध्ये ओलावा व अन्नद्रव्ये असावीत याची काळजी घ्यावी. ओलावा कमी असेल किंवा खतांचा वापर मोजकाच असेल तर स्टिमुलंटचा वापर टाळावा. कापसासाठी झेप/उडाण, भरारी/ फ्लाईट किंवा इलिग्झर यापैकी एक स्टिमुलंट पाते लागलेले असताना एक फवारा व त्यानंतर १० ते १५ दिवसांनी दुसरा फवारा घेतल्यास उत्पादनाम ध्ये चांगली वाढ होते. इतर पिकांसाठी जसे सोयाबीन तूर, हरभऱ्यासाठी फुलोरा अवस्थेत वरील स्टिमुलंटचा वापर करावा.
बायोस्टिमुलंटचे वेगवेगळे प्रकार, कार्ये व प्रमाण आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना फवारल्यानंतर पीक हिरवे झाले म्हणजे, समाधान होते व वापरले ते फार चांगले असे वाटते. मात्र, ही महागाची उत्पादने फक्त हिरवेपणा वाढवण्यासाठी वापरून फायदा नाही, तर असे बायोस्टिमुलंट वापरावे.
ज्यामुळे हिरवेपणा वाढेल, पाते, फुलांची संख्या वाढेल. पानाबोंडांचा आकार वाढून पिकाची सर्वांगीण वाढ होईल, तसेच त्यांचे प्रमाण माहीत असावे. काही बायोस्टिमुलंट १० लिटर पाण्यासाठी फक्त २.५ मिली व काही १० लिटर पाण्यासाठी ७ ते १० मिली वापरण्याची शिफारस आहे. झेप/उडाण, भरारी/फ्लाईट, इलिग्झर यांची गुणवत्ता चांगली असल्याचे बऱ्याच शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. बायोस्टिमुलंट समजून–उमजून खात्रीच्या दुकानांवरून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उच्च गुणवत्तेचे वापरल्यास खर्चाचा पुरेपूर मोबदला मिळतो. या उत्पादनांसाठी शेतकऱ्यांनी विक्रेत्याकडे आग्रही असावे. त्याला पर्यायी दूसरे स्टिमुलंट शक्यतो घेऊ नये.
ह्युमिक अॅसिड
ह्युमिक अॅसिड म्हटल्यानंतर आपणास हे काहीतरी जहाल औषध असावे असे वाटते. मात्र, हा एक सौम्य असा घटक आहे. शेणखताचे जे काही चांगले गुणधर्म आहेत ते सर्व ह्युमसमुळे आहेत आणि हेच ह्युमस ह्युमिक अॅसिडमध्ये आहे. दिवसेंदिवस शेणखत, सेंद्रिय खतांचा वापर कमी होत चालला; पण याउलट उत्पादन वाढवणे चालूच आहे. मग ही जमीन आपणास जास्त दिवस कशी साथ देईल, जमिनीची सुपीकता कायम राहावी यासाठी ह्युमसचा वापर अनिवार्य आहे. आपण जे जमिनीमधून घेतो याचा काहीतरी मोबदला तिला दिला गेला पाहिजे. जमिनीतील ह्युमस शेणखत, सेंद्रिय खते, गांडूळ खत, हिरवळीचे खत याचा वापर करून वाढवता येते. त्यासाठी शक्य तेवढा याचा वापर करावा व गरज भासल्यास ह्युमिक अॅसिड वापरावे.
ह्युमिक अॅसिडचे महत्त्व म्हणजे हे कोणत्याही पिकाच्या पांढऱ्या मुळांची जोरात वाढ करते. पिकाला अन्नरस हे पांढरे मुळेच पुरवतात व पांढरी मुळे सक्रिय सक्षम, सशक्त असतील तर आपोआप अन्नद्रव्ये शोधतील व पिकाला पुरवतील. त्यास सक्रिय सशक्त बनविण्याचे काम ह्युमिक अॅसिड करते. रासायनिक खतांची पिकास उपलब्धता वाढण्यासाठी ह्युमिक अॅसिडचा फार फायदा होतो.
आता ह्युमिक अॅसिडचे वापरणे फार कमी खर्चाचे व भरपूर फायद्याचे आहे. मात्र, त्या गुणवत्तेचे ह्युमिक अॅसिड आपणास मिळाले पाहिजे.
साधारणतः तीन प्रकारचे ह्युमिक अॅसिड बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये ६ टक्के प्रमाण असलेले ह्युमिक अॅसिड दाणेदार, १२ टक्के प्रमाण असलेले ह्युमिक अॅसिड द्रवरूप व १२ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण असलेले ज्यामध्ये ९८ टक्क्यांपर्यंत आहे. मात्र, ह्युमिक अॅसिड हे दाणेदारमध्ये ६ टक्के व द्रवरूप १२ टक्के या स्वरूपात वापरणे चांगले, असे जाणकारांचे मत आहे. त्यापेक्षा जास्त प्रमाणात टक्केवारी असलेले त्या ह्युमिक अॅसिडची (सोल्युबिलिटी) विरघळण्याची क्षमता असू शकते. रासायनिक खतांचा बराच अंश पिकाला मिळत नाही. बरीच अन्नद्रव्ये जमिनीमध्ये फिक्स होतात व पीक त्यांचे सहज शोषण करू शकत नाही. अशा वेळेस ह्युमिक अॅसिड वापरलेले असल्यास पांढऱ्या मुळांना शक्ती मिळाल्याने ही अन्नद्रव्ये शोषण्यास मदत होते. ह्युमिक अॅसिडच्या वापराचा सर्वांत जास्त फायदा जमिनीखाली वाढणाऱ्या पिकांना जसे अद्रक, हळद, कांदा, बटाटा यांना होतो. यासोबतच कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, ऊस यांनासुद्धा याचा फायदा होतो.
त्याच्या वापराच्या विविध पद्धतींमध्ये पेरणीबरोबर किंवा खताच्या दुसऱ्या मात्रेबरोबर दाणेदार ह्युमिक अॅसिड एकरी ५ ते १० किलो वापरावे. हे रासायनिक खतामध्येसुद्धा मिसळून टाकता येते. आपल्या खर्चाच्या नियोजनानुसार एकरी दाणेदार ६% ह्युमिक अॅसिड ५ किलो द्यायचे की १० किलो द्यायचे ते आपण ठरवावे. याचा वापर जास्त केला तरी फायदाच होतो. नुकसान होत नाही. जमिनीमधून वापरल्यानंतर एक वेळेस द्रवरूप ह्युमिक अॅसिड १२% फवारणीमध्येसुद्धा वापरायला चालते. जमिनीतून न वापरल्यास दोन वेळेस फवारणीतून वापरावे. ह्युमिक अॅसिड वापरण्याची तिसरी व सर्वांत फायद्याची पद्धत म्हणजे पीक लहान असताना ठिबक सिंचनामधून किंवा ठिबक नसल्यास पाठीवरच्या पंपात पाण्यात टाकून हे मिश्रण झाडांच्या बुडाशी टाकावे. ठिबकद्वारे किंवा ड्रेचिंगद्वारे एकरी दीड ते दोन लिटर ह्युमिक अॅसिड वापरल्यास खूपच चांगले परिणाम दिसतात.
ह्युमिक अॅसिडचे ड्रेचिंग असल्यास सोबत १ किलो फवारणीचे सल्फर डब्ल्यूडीजी व २ किलो कॅल्शिअम नायट्रेट एकरी दिल्यास दुय्यम घटकांची गरजसुद्धा यातून पूर्ण होते. जमिनीतून सिंगल सुपर फॉस्फेट वापरले असल्यास सल्फर व कॅल्शिअम नायट्रेट वापरण्याची गरज नाही. अशा प्रकारे ह्युमिक अॅसिड हे शेतकऱ्यांना एक वरदान ठरू शकते. फक्त ते चांगल्या गुणवत्तेचे मिळणे फारच महत्त्वाचे आहे. ह्युमिक अॅसिड जवळपास सर्व रसायनांसोबत फवारणीस योग्य आहे.
Published on: 18 February 2022, 04:36 IST