Agripedia

कापूस उत्पादक शेतकरी बंधूनी अजूनही कापूस पिकामध्ये उत्तम व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन आणि आर्थिक फायदा मिळणे शक्य आहे. कापसाचे पिक शेतामध्ये उभे आहे, १ऑक्टोबर पासून राज्यातील पाऊस ओसरला असुन तापमान वाढू लागले आहे

Updated on 07 November, 2021 7:04 PM IST

त्यामुळे कापसाची बोंडे चांगली फूटू लागली आहेत, बर्याच ठिकाणी कापूस वेचण्याची कामाने वेग घेतला आहे. शेतकरी बंधूंनी उमलेली कापसाची बोंडे वेचून घ्या. कापसाच्या झाडांवर काही पात्या,फूले नि बोंडे ही असणार आहेत, अजुनही ३ ते ४ महीने हातात आहेत. अजुनही कापसाचे उत्पादन मिळविता येईल, सकारात्मक विचार करा नि आलेल्या संधीचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा असे वाटते. सातत्याने झालेल्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पात्या, फुले गळ व बोंड सड ह्यामुळे उत्पादनात घट येणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी वेळ न घालविता कापूस पिकाचे सध्या परिस्थितीमध्ये अधिक उत्पादन मिळवायचे असेल तर सततच्या पावसामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये निचराद्वारे झिरपून गेली आहेत

त्यामुळे कापूस पिकाला पोषणाची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांच्या कापूस पिक ठिबक सिंचन पद्धतीवर आहे त्यांनी ठिबक मधून युरीया ३ किलो, १२:६१:० - २ किलो आणि पांढरा पोटॅश - १ किलो प्रती एकर एकत्रित ठिबक मधून आठवड्यातून दोन वेळा देणे गरजेचे आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट ५०० ग्रैम आणि चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये २५० ग्रैम आठवड्यातून एक वेळा द्यावे. कापूस पिक संपण्याच्या आधी १५ - २० दिवस ठिबक मधून पाणी आणि खते देणे बंद करावे. पिकाची मुळे अधिक कार्यक्षम होणेकरीता ह्युमिक अैसीड २ लिटर ठिबक मधून सोडावे. हयामुळे ठिबक वरील कापसाचे एकरी ५ ते ७ क्विंटल उत्पादन मिळणे शक्य आहे, ह्यावर्षी कापसाचे उत्पादन कमी नि मागणी जास्त असल्याने कापसाचे दर तेजीत असणार आहेत,शेतकर्यांनी कापूस विक्रीची खुप घाई करू नका, ह्या परिस्थीतीचा शेतकर्यांनी फायदा घेतला पाहीजे, उभ्या कापसाच्या पिका साठी थोडासा खर्च केला तर चांगला आर्थिक फायदा मिळू शकेल असे वाटते.

ठिबक वरील कापूस उत्पादक शेतकर्यांनी ७ - ८ हजार रूपये खर्च केल्यास जानेवारी अखेर पर्यंत एकरी ५ - ६ क्विंटल उत्पादन मिळू शकेल, ७००० रू प्रति क्विंटल दराने ३५ - ४० हजार रूपये मिळतील त्यातून ८ - १० हजार सर्व खर्च वजा केल्यास निदान २५ ते ३० हजार आर्थिक नफा मिळणे शक्य आहे. शेवटी शेती हा व्यवसाय आहे हे लक्षात घेऊन गुंतवणूक केल्याशिवाय फायदा मिळणार नाही, खर्च करावयाचा की नाही हे आपण ठरवा.

ज्यांच्या कापूस पिकामध्ये ठिबक नाही जमीनीत ओल भरपूर आहे, त्यांनी १०:२६:२६ रासायनिक खत १ बॅग, युरीया १ बॅग द्यावे. खते मातीने झाकून द्यावीत. तसेच विद्राव्य खते १३:४०:१३ आणि ०:५२:३४ ची फवारणी करावी. ह्या करीता साधारणपणे २ ते २.५ हजार रूपये खर्च येईल. त्या पासून एकरी २ ते ३ क्विंटल उत्पादन मिळू शकले तर ७००० रूपये प्रती क्विंटल दराने १४ - २० हजार मिळतील त्यातून सर्व खर्च ४५०० रूपये वजा केल्यास १० ते १५ हजार रूपये एकरी नफा मिळू शकेल.

बुरशीयुक्त रोगापासून तसेच बोंड सडच्या नियंत्रणाकरीता कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम आणि स्टेप्टोसायक्लीन १ ग्रॅम १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाकरीता एकात्मिक किड व्यवस्थापनचा अवलंब करताना शेतात एकरी ५ कामगंध सापळे लावावेत, निंबोळी अर्काची फवारणी करावी नंतर आठवड्याने प्रोफेनोफॉस किंवा थायोडीकार्बची किंवा सायपरमेथ्रीन ची फवारणी करावी. प्रकाश सापळे लावावेत. कापसाच्या फुलांचे निरीक्षण करा नि असलेल्या डोमकळ्या तोडून नष्ट कराव्यात. गलाबी बोंड अळीच्या प्रादूर्भाव कडे दूर्लक्ष अजीबात करू नका. रस शोषण करणारी किडी मावा, तडतूडे, फुलकिडे, पांढरी माशी नियंत्रणाकरीता पिवळे, निळे चिकट सापळे लावावेत तसेच आंतरप्रवाही किटक नाशकांची फवारणी करावी. ह्यामुळे निश्चितच कापूसाचे उत्पादन चांगले मिळेल.

कापूस पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास कापूस पिकापासून अधिक उत्पादन मिळते. कापूस पिकामध्ये नविन पात्या, फुले येत असतात, येणारी बोंडाचे योग्य पोषण केल्यास बोंडांना चांगले वजन मिळाल्याने उत्पादनात वाढ होते.

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जानेवारी अखेरपर्यंत कापूस पिक संपवावे, कापसाचे कोणतेही अवशेष शेतात राहणार नाही याची काळजी घ्यावी. जे शेतकरी आपल्या कापूस पिकाचे व्यवस्थापन करतील त्यांना त्याचा निश्चित फायदा होईल. आलेल्या संधीचा शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा असे वाटते.

- डॉ. बी.डी. जडे,

वरीष्ठ कृषीविद्या शास्त्रज्ञ,

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. 

English Summary: Cotton price reaches Rs. 9000 per quintal, take advantage of the opportunity given to cotton farmers.
Published on: 07 November 2021, 07:04 IST