डोमकळी कशी ओळखावी पहिल्या अवस्थेतली गुलाबी बोंडअळी फुलांमध्ये शिरते. पाकळ्यांना लाळेद्वारे एकमेकांना जोडुन स्वताला स्वरक्षणासाठी बंद करून घेते.
प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अश्या कळ्या म्हणजेच डोमकळया डोमकळ्या तोडून पाकळ्यांना वेगळे केल्यास, पाकळ्या एकमेकांना लाळेद्वारे जोडल्यासारख्या दिसतात.
बारकाईने निरीक्षण केल्यास पांढरट रंगाची पहिल्या किंवा दुस-या अवस्थेतील गुलाबी बोंडअळी आतमध्ये असल्याचे दिसून येते.या फुलांमध्ये सर्वप्रथम गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. अंडयातून निघालेली अळी, ताबडतोब पाते. कळ्या, फुले यांना छिद्र करून आत मध्ये शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुलांचे डोमकळीत रुपांतर करते.
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव १० दिवसापेक्षा कमी कालावधीच्या कळीमध्ये झाल्यास झाडावरून कळी गळून पडते. उशीरा झालेल्या प्रादुर्भावामधे नुकत्याच लागलेल्या बोंडावर किंवा उशीरा लागलेल्या फुलांवर गुलाबी
बोंड अळीची मादी पतंग अळी घालते. या फुलामधुन किंवा लहान बोंडाला छिद्र पाडून अळी बोंडात शिरते, असे छिद्र बोंडाची वाढ झाल्यामुळे बंद होते.
एकदा का अळी बोडामध्ये शिरली की, बोंडावरील छिद्र बंद असल्याने बोंडाचे वरून निरीक्षण केल्यास अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. त्याठिकाणी फक्त काळा डाग दिसतो.
अळी आतमध्ये राहून लहान हिरव्या बोंडामधील अपरीपक्व कापूस व सरकी खाऊन टाकते तर मोठया बोंडामध्ये या फक्त सरकीवर आक्रमण करते. एक अळी बोंडामधील तिन ते चार सरकीच्या दाण्यांचे नुकसान करते. एका बोंडामध्ये एक अथवा अनेक अळया आपला जीवनक्रम पूर्ण करू शकतात.
प्रादुर्भावग्रस्त बोंडे परिपक्व न होताच उमलतात, त्यामुळे रुईची प्रत खालावते. सरकीतील तेलाचे प्रमाण घटते आणि बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.
कापूस पिकातील डोमकळया वेळीच नष्ट न केल्यास यातील गुलाबी बोंडअळीची दुसरी पिढी तयार होऊन, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतो व कापूस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकरी बघुना कापूस पिकातील डोमकळीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
डोमकळीचे नियंत्रण:
१. डोमकळया गोळा करून अळीसह नष्ट कराव्यात, जेणेकरून गुलाबी बोंडअळीची पुढची पिढी तयार होणार नाही व प्रादुर्भाव होण्याच्या मुळ कारणाला आळा घालता येईल.
२. ट्रायकोग्रामाटॉयडीया बैंक्ट्री या परोपजीवी गांधील माशीचे कार्ड (१.५ लाख अंडी/हे) शेतामध्ये लावावेत.
३. कामगंध सापळे १० प्रति हेक्टरी लावावेत. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाकरिता गरजेनुसार खालील रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.
प्रोफेनोफॉस ५० ईसी किंवा ३० मिली / १० लिटर
थायोडीकार्ब
[७५ डब्ल्यू पी २० ग्रॅम /१० लिटर)
इमामेक्टीन बेन्झोएट ५ एस जी ४ ग्रॅम / १० लिटर
विकास पाटील
कृषि संचालक, (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
संकलन :- टीम कृषि शास्त्र
Published on: 02 September 2021, 06:50 IST