भारतीय हवामान खात्याने आज दि.१५.०२.२०२२ रोजी वर्तविलेल्या पाच दिवसीय हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात येत्या पाच दिवसांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच दि. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कृषी सल्ला
▪️येत्या पाच दिवसांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता, कमाल तापमानात होत असलेली वाढ या दोन बाबी लक्षात घेता शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकांना/फळबागांना वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसणार नाही
याची काळजी घ्यावी. ओलीत करताना शक्यतो सूक्ष्म सिंचन पद्धतीने ( ठिबक / तुषार सिंचन) ओलीत करावे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळता येणे शक्य होईल.
▪️बहुतांश ठिकाणी वेळेवर पेरणी केलेले हरभरा पीक परिपक्व झाल्याचे आढळून आले आहे,तरी शेतकऱ्यांनी पिकाची कापणी करून घ्यावी व २-३ दिवस उन्हात वाळवून नंतर मळणी करावी.
▪️सामान्यतः गहू पिकामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत, दाण्याची दुधाळ अवस्थेत ओलिताची व्यवस्था करावी. तसेच उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला पीक फुलोरावस्थेत (६५-७० दिवस) असताना पाणी दिल्यास फायदेशीर ठरते.
▪️ मिरचीतील कोळी व फुलकीडीच्या नियंत्रणासाठी सरसकट रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता आलटून पालटून ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.त्यामुळे रासायनिक कीटकनाशकामुळे अपेक्षित नियंत्रण मिळेल व किडीचा उद्रेक होणार नाही.दोन फवारणीमधील अंतर नेहमी १२-१५ दिवस ठेवावे.
▪️शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाण्याचा स्त्रोत व बाजारपेठेतील मागणी या दोन बाबी लक्षात घेऊन पालेभाज्यांची (मेथी, पालक, कोथिंबीर ई.) लागवड करावी.
▪️कांदा पिकातील हुमणी अळीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही
या कीटकनाशकाची ५० मिली /१० लिटर या प्रमाणात द्रावण घेऊन खोडाजवळ टाकावे.
▪️उन्हाळ्यातील जनावरांच्या हिरव्या चाऱ्याच्या नियोजनासाठी चारा पिकांची (मका-आफ्रिकन टॉल, ज्वारी- पुसा चारी,एम.पी.चारी) पेरणी करावी. जनावरांचा गोठा/निवारा निर्जंतुक आणि स्वच्छ ठेवावा. जनावरांचे बदलत्या हवामान परीस्थीतीपासून संरक्षण करावे. त्यांच्या विश्रांतीसाठी स्वच्छ आणि कोरड्या जागेची व्यवस्था करावी.
सौजन्य:-
जिल्हा कृषी हवामान केंद्र,
कृषी विज्ञान केंद्र,बुलढाणा.
डॉ.पं.दे.कृ.वि.,अकोला.
Published on: 15 February 2022, 05:53 IST