Agripedia

वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी.

Updated on 22 February, 2022 11:33 AM IST

हरभरा : वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गहू : लवकर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत.

उन्हाळी सोयाबीन : उन्हाळी सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करावीत व पिकास पाणी द्यावे. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी करून 20 ते 25 दिवस झाले असल्यास व पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास मायक्रोला आरसीएफ (ग्रेड-2) या सूक्ष्म अन्नद्रव्याची 50 ते 75 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास पाणी द्यावे.

ऊस : ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृगबहार लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेस पाणी द्यावे.

डाळींब बागेत शॉर्ट होल बोरर/खोड किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास खोडांना लेप लावण्यासाठी लाल माती 4 किलो + क्लोरपायरीफॉस 20% ईसी 20 मिली + कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पेस्ट बनवून जमिनीपासून 2 ते 2.5 फुट खोडावर लेप लावावा. थाईमेथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 10 ते 15 ग्रॅम + प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 15 ते 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून ड्रेनचींग करावी.

 

भाजीपाला

भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा

फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी गादी वाफ्यावर मिरची, कांदे, टोमॅटो इत्यादी पिकांची रोपे तयार करावीत.

चारा पिके

चारा पिकासाठी लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे,

मुख्य प्रकल्प समन्वयक,

ग्रामीण कृषी मौसम सेवा,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

English Summary: Come Take care of summer crop health, read expert advice on these crops
Published on: 22 February 2022, 11:33 IST