ऊसाच्या साखरेच्या उत्पन्नात भारत नेहमीच जगात अग्रेसर राहिला आहे. आपण म्हणतो ऊसाच्या शेतीमध्ये पैसे चांगले मिळतात. पण त्यासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्या पिकांची काळजी घ्यावी लागते. ऊसाची शेती ही खर्चिक शेती असते, यामुळे या पिकाला श्रीमंत शेतकऱ्यांचे पीक म्हटले जाते. इतर पिकांच्या तुलनेत ऊसाच्या लागवडीसाठी येणारा खर्च तसा जास्त येतो. जर कमी खर्चात शेतीचे नियोजन करता आले तर? सामान्य शेतकरीही ऊसाचे उत्पन्न घेऊ लागेल. म्हणूनच आज घेऊन आलो आहोत सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान. ज्यामध्ये लागवडीसाठी होणाऱ्या खर्चात बचत होते.
सुरूवातीच्या काळात रोपांची मर कमी होते तसेच उत्पन्नातही चांगली वाढ होते. तर चला बघूयात या नवीन पण करायला अगदी सोप्या असलेल्या तंत्रज्ञानाविषयी.
- शेतामध्ये सुरूवातीला बेणे प्रक्रियेसाठी खड्डा खोदून घ्यावा. (२ मी. रुंद, ३ मी. लांब व ५०-६० सेंमी खोल). या खड्याला आतून पॉलिथीन प्लास्टिक पेपरने आच्छादित करून घ्यावे. पॉलिथीन प्लास्टिक पेपर कुठे फाटला नाही ना याची काळजी घ्यावी.
- यामध्ये अंदाजे २००-३०० लिटर पाणी भरून घेऊन त्यामध्ये २ मिली क्लोरपायरिफॉस व २ ग्राम कार्बेन्डाझिम प्रती लिटरच्या हिशोबाने खड्यातील पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यावे.
- बेण्यासाठी ९-१० महिने वयाचा ऊसाची निवड करावी आणि ऊसाच्या वरच्या बाजूच्या कांड्या बेण्यासाठी वापराव्यात कारण त्यांची उगवण क्षमता उत्तम असते.
- एक डोळा टिपऱ्यांमध्ये डोळ्यांच्या वरची बाजू छोटी आणि खालीची बाजू वरच्या बाजूपेक्षा थोडी जास्त ठेवावी.
- एक डोळ्याचे बेणे खड्यातील द्रावणात प्रक्रियेसाठी भिजवत ठेवावे, जेणे करून बेण्यावरील कीड आणि रोगांचा नाश होईल.
- जर शेतकऱ्याला खाण्याच्या चुन्याच्या पाण्याची प्रक्रिया करणे शक्य असेल तर फक्त चुन्याच्या पाण्याची निवळी प्रक्रिया चालू असलेल्या खड्यात एकत्रित करावी. चुन्याच्या पाण्याने बेण्याची उगवण क्षमता वाढण्यास मदत होते.
- किलताणाच्या गोण्या दोन्ही बाजूने उसवल्या नंतर उभी लांब सहा फूट व अडीच फूट रुंदीच्या पट्ट्या तयार होतात. पाण्याच्या खाड्या जवळच जमीन सपाट करून, त्यावर तयार केलेल्या पट्ट्या उभ्या पसरवून घ्याव्यात. मातीचे निर्जंतुकीकरण करून त्या पट्ट्यांवरती २ इंच मातीचा थर द्यावा.
- एक-दोन तास भिजवलेले बेणे खड्यातून बाहेर काढून त्यातील सर्व पाणी निथळून दयावे. निथळ्यानंतर १५ लिटर पाण्यामध्ये १५० मिलि अॅसिटोबॅक्टर मिसळून द्रावण बनवून घ्यावे आणि प्रक्रिया केलेले एक डोळा बेणे त्यामध्ये बुडवून, तयार केलेल्या मातीच्या वाफ्यावर जवळ-जवळ मांडून घ्यावेत. बाकी राहिलेले अॅसिटोबॅक्टरच द्रावण सर्व बेणं मांडून झाल्यावर वाफ्यावर फवारून घ्यावे. त्यानंतर अर्ध्या इंच मातीचा थर देऊन बेण झाकून टाकावे, त्याचबरोबर पाचटाचाही हलका थर द्यावा.
- वरच्यावर वर पाण्याची फवारणी करत राहावी; पाच दिवसानंतर कोवळे कोंब उगवताना वाफ्यावर दिसतील. नऊ-दहा दिवसांनी पूर्ण वाफ्यावर कोंब उगवलेले दिसतील. दोन-तीन पानावर यायला १८-२० दिवस लागून जातात. ३० दिवसात रोपे लागवडीसाठी तयार होतात.
- लागवडीच्या वेळी वाफ्या खालील गोणपाटाच्या पिशव्या आहे तशा उचलून बांबूच्या शिडीवर मांडून देऊ शकतो.
सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा हेतू-
सर्व सामान्य शेतकरी सुद्धा त्याच्या शेतावर हे तंत्रज्ञान अगदी सहजपणे वापरून निरोगी रोपे तयार करू शकतो. यासाठी कुशल मजुरांची तसेच प्लास्टिक ट्रे किंवा पिशव्यांची, कोकोपीट व इतर महागडया साधनांची गरज भासत नाही. हे तंत्रज्ञान कोणत्याही हंगामात कधीही वापरून रोपे तयार करू शकता. यामधून बेण्याची होणारी नासाडी टाळता येते.
सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचे फायदे-
- बेणे प्रक्रियेमुळे रोपांवरती रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव खूप कमी आढळतो.
- या तंत्रज्ञानातून तयार झालेल्या रोपांमध्ये कणखरपणा जास्त असतो, त्याचबरोबर मातीमध्ये लागवड केल्यानंतर रोपे लवकर जोम घेतात.
- या तंत्रज्ञानासाठी वेळ, पैसा आणि मजूर खूप कमी प्रमाणात खर्च होतो.
- या पद्धतीमध्ये बेणे उगवण्यासाठी लागणारा कालावधी घटतो.
- प्लास्टिक ट्रेच्या तुलनेत या तंत्रज्ञानातून तयार झालेल्या रोपांची सरासरी किंमत कमी आहे. प्लास्टिक ट्रेच्या एका रोपाची किंमत सरासरी २.५० रुपये आहे तर सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान वापरून जर रोप तयार केले तर फक्त ८०-९० पैसे खर्च येऊ शकतो.
Published on: 19 May 2020, 05:55 IST