परंपरागत चालत आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये शेतकरी त्याच-त्या पिकांची लागवड करत असतो. त्यामधून त्याला चांगले उत्पन्नही मिळत नाही. शेतीसाठी खर्च केलेला पैसाही त्याला परत मिळत नसतो. यासाठी उत्पन्नामध्ये होणारी घट, वाढत्या रोगांचे आणि किडींचे प्रमाण, योग्य बाजारपेठ व इतर मुद्दे मारक ठरतात. त्यासाठी शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या शोधात आहेत. त्यामधूनच एक पीक फुढे येते आहे, आणि ते म्हणजे एरंड. तसे बघितले तर एरंडचा पीक म्हणून शेतकऱ्यांनी कधी विचार केलेला नाही.
शेतकऱ्याने एरंडला कधी पीक मानले नाही. एरंडला नेहमी शेताच्या बांधावर, तर कधी घरासमोरील मोकळ्या जागेत जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे त्याला मिळणाऱ्या दराकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. आठवडी बाजारात जो मिळाला १० किंवा १५ रुपये किलोचा जर दर मिळाला तरी शेतकरी त्याला विकून यायचा. याच एरंडची शेतकऱ्यांनी आता मुख्य पीक म्हणून लागवड केली तर त्याला बाजारत खूप चांगली मागणी आहे. कारण त्यापासून वंगण निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्यासाठी त्याला क्विंटली ३००० ते ३,५०० रुपये इतका बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे नवीन काहीतरी शेतीमध्ये प्रयोग करू इच्छिणाऱ्या आणि शाश्वत उत्पन्नासाठी धडपणाऱ्या शेतककऱ्यांसाठी हे योग्य पीक आहे. जर तुम्हाला अधिकचे उत्पन्न हवे असेल तर एरंड या पिकाचा तुम्ही नक्की विचार करू शकतात. आज आपण याच पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत.
पूर्वमशागत- एरंड पिकासाठी नांगरट खोलवर करावी कारण याच्या मुळ्या खोलवर जात असतात; नांगरट झाल्यावर कुळवणी करून घ्यावी.
जमीन आणि हवामान- हे पिक हलक्या किंवा मध्यम जमिनीमध्ये उत्तम पद्धतीने येते. त्यासाठी कोरडे आणि उष्ण हवामान चांगले त्याच बरोबर अवर्षणप्रवण भागामध्ये सुद्धा ४०-५० सेंमी पावसात येऊ शकते.
हेही वाचा:बागायती गहू लागवड तंत्रज्ञान
पेरणी/लागवड- या पिकाची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात करू शकता. जून महिन्यामध्ये पुरेसा पाऊस झाल्यावर जमिन वापष्यावर आल्यावरती लागण करावी. त्याचबरोबर एरंड या पिकाची लागवड आकस्मिक काळातील पिक म्हणून पण लागवड करता येते. ३ते ५ किलो प्रती एकर बियाण्याची गरज भासते. बियाण्याला ट्रायकोडरमा ५ ग्रा. प्रती किलोने बीज प्रक्रिया करून घ्यावी. दोन पिकांमधील अंतर ९० सेंमी व दोन ओळी मधील अंतर १५० सेंमी ठेवावे.
अन्नद्रव्य पुरवठा- या पिकांसाठी जमीन कसदार असेल तर अन्नद्रव्याची गरज भासत नाही. पण फुलगळ टाळण्यासाठी तसेच दाना भरण्यासाठी अन्नद्रव्याची गरज भासते. त्यासाठी ४०:४०:२० कि.ग्रा. नत्र:स्पुरद:पालाश प्रती एकराच्या हिशोबाने घालावे. अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीचे वेळेस द्यावे व उरलेले नत्र ४० ते ४५ दिवसांनी द्यावे.
अंतर पीक- एरंड पिकामध्ये अंतर पीक म्हणूनएरंडी+तूर, एरंडी+हरभरा, एरंडी+मूग, एरंडी+उडीद, एरंडी+सोयाबीन किंवा एरंडी+चवळी यापैकी कोणत्याही पिकाचे योग्य अंतर ठेवून उत्पन्न घेऊ शकता.
पाणी व्यवस्थापन- या पिकासाठी पाणी देण्याची गरज भासत नाही कारण मुळातच या पिकला पाणी कमी लागते. पण कधी पाऊस पडण्याचा कालावधी जर का वाढला तर पाणी देणे आवश्यक आहे, पाण्याच्या ताणामुळे फुलगळ जास्त होते तसेच दानासुद्धा धरत नाही, अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी एक किंवा दोनवेळा पाणी चांगल्या उत्पन्नासाठी द्यायला हवे.
हेही वाचा:सेंद्रिय खते तयार करण्याच्या पद्धती आणि अन्नद्रव्यांचे प्रमाण
काढणी- हे पिक काढणीसाठी साधारणत लागवडीनंतर ५-६ महिन्यामध्ये तयार होते. घडामधील २-३ दाने वाळले कि काढणीला सुरवात करावी. घडाची काढणी २-३ फेऱ्यात करावी लागते. एरंडाची मळणी पारंपारिक पदधतीने बडवून केली जाते. आज बाजारामध्ये एरंड मळणी यंत्र उपलब्ध आहेत. त्या द्वारेही आपण मळणी करु शकतो.
उत्पन्न- १०-२० क्विंटल (जिरायती पीक) व २०-३० क्विंटल (बागायती पीक)
कीड, रोग व त्यांचा बंदोबस्त- एरंडीवर उंट अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच दिसतो. त्यासाठी उंट आळ्या हाताने वेचून घ्याव्यात व रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. पिकाच्या सुरुवातीस १ ते २ महिने उंट अळीपासून सरंक्षण करावे. निमार्क @ ५ मिली. प्रती ली. किंवा मेटाऱ्हाईझियम बुरशी @ ५ ग्रा. प्रती ली. फावारणी करावी. शेंडे व बोंडे पोखरणाऱ्या अळीसाठी वरील औषधांचा वापर करावा.
Published on: 22 May 2020, 07:11 IST