शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना नाना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. पिकावर पडणाऱ्या रोग व किडींच्या बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी तणनाशके, बुरशीनाशके, रोगनाशके यांची फवारणी करतात. मात्र हे कीडनाशके विषारी असल्याने हाताळणी व फवारणी करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
कीटकनाशकांची निवड :-
किडींच्या नुकसानीचा प्रकार, प्रादुर्भावाची तीव्रता, आर्थिक नुकसानीची पातळी, अवस्था आणि किडीच्या तोंडाची रचना (सोंड/जबडे) कशी आहेत, यावरून कीडनाशकांची निवड मध्यम विषारी करावी. सर्वसाधारणपणे पाने, फुले, फळे खाणाऱ्या अळ्यांच्या व्यवस्थापनाकरिता उदर विष (Stomach Poison) तसेच रस शोषक किडीच्या व्यवस्थापनाकरिता आंतरप्रवाही.(Systemic Poison) आणि जमिनीत वास्तव्य करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनाकरिता धुरीजन्य (Fumigant Poison) किंवा जमिनीतून द्यावे लागणाऱ्या कीडनाशकांची निवड करणे अधिक हिताचे व प्रभावी ठरते.
फवारणीसाठी सर्वप्रथम मवाळ कीडनाशकांची म्हणजेच ज्या कीडनाशकांच्या डब्यावर हिरवा किंवा निळा त्रिकोण आहे, अशाच कीडनाशकांची निवड करावी. त्यानंतर गरज भासल्यास शेवटी जहाल (लाल, पिवळा त्रिकोण असलेले) कीडनाशके वापरावीत. एकच एक किंवा एकाच गटातील कीडनाशके वारंवार फवारणी न करता आवश्यक तेव्हा वरील उल्लेखीत बाबींचा विचार करून . कीडनाशकांची फेरपालट करून शिफारशीत मात्रेतच व केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारशीत केलेली (लेबल क्लेम) कीडनाशकांची फवारणी करावी. तणनाशके, बुरशीनाशके, रोगनाशके व इतर कोणतेही घटक शिफारस असल्याशिवाय मिसळून फवारू नयेत. तसेच शक्यतो दोन घटकांचे द्रावण फवारणीसाठी टाळावे.
कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी :-
-
कीडनाशके परवानाधारक विक्रेत्या कडूनच खरेदी करावीत. खरेदी केलेल्या कीडनाशकाचे विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे. किंचित विषारी . लेबलक्लेम आणि शिफारस असलेले कीडनाशक फवारणीसाठी आवश्यक तेवढ्याच प्रमाणात खरेदी करावे.
-
कीडनाशके खरेदी करताना माहिती (लिफलेट) पत्रकाची मागणी विक्रेत्या कडेच करून ते माहिती पत्रक वाचून/ऐकून घेऊन पूर्ण सूचनांचे पालन करावे व नंतरच खरेदी करावे.
-
कालबाह्य झालेल्या किंवा आवेष्टन खराब झालेल्या कीडनाशकांची खरेदी करू नये.
-
कीडनाशक खरेदी करतेवेळी आवश्यक असलेले रासायनिक घटक पाहूनच खरेदी करावी.
हाताळतांना व फवारताना घ्यावयाची काळजी :-
-
कीडनाशके शेतात फवारणी करते वेळी प्रथमोपचार साहित्य सोबत ठेवावे.
-
खाद्य पदार्थ, इतर औषधांशी कीडनाशकांचा संपर्क येऊ देऊ नये. तसेच कीडनाशके लहान मुलांच्या संपर्कात येणार नाही, अशा गुपित ठिकाणी कुलूपबंद ठेवावीत.
-
पीक, कीड व रोग निहाय कीडनाशकाची निवड करून शिफारशीत प्रमाणातच फवारणीसाठी वापरावी.
-
कीडनाशक वापरण्यापूर्वी लेबल व माहितीपत्रक व्यवस्थित वाचून खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे. तसेच कीडनाशकांच्या डब्यावरील पतंगीच्या आकाराचे चिन्हे लक्षात घेऊन कीडनाशक निवडून शिफारशीनुसार वापर करावा.
-
तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीडनाशक फवारणीसाठी वापरू नये. गळक्या फवारणी पंपाचा वापर फवारणीसाठी करू नये.
-
कीडनाशक हाताळताना नेहमी हातात हातमोजे घालावेत. कीडनाशकाचे द्रावण काडीच्या सहाय्याने हातात हातमोजे घालूनच ढवळावे.
-
फवारणी करताना अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, गनबुट इ. चा वापर करावा व संपूर्ण शरीर झाकले जाईल याची काळजी घ्यावी.
-
फवारणीचे काम सुरू असताना खाणे-पिणे, तंबाखूचे सेवन धूम्रपान अगर मद्यपान करू नये.
-
कीडनाशके फवारणीसाठी हाता पायावर जखम असलेल्या व्यक्तीची निवड करू नये. फवारणी एकाच व्यक्तीकडून सतत न करून घेता आळीपाळीने करून घ्यावे.
-
फवारणी दरम्यान नोझल गच्च झाल्यास किंवा कचरा अडकल्यास तोंडाने साफ न करता तारेच्या सहाय्याने साफ करावे.
-
फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर अंगावरील कपडे स्वच्छ धुवावे त्यानंतर सर्व अंग साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावे व अंग कोरड्या स्वच्छ टॉवेलने पुसून दुसरे कपडे घालावे.
-
कीडनाशकाचे रिकामे डबे तसेच शेतात फेकून न देता पाण्याचे स्रोत विहीर, नदीपासून दूर जमिनीत खोल गाडून टाकावे.
-
फवारणी करताना पंपाच्या विशिष्ट दाबानुसार फवारणीचे तुषाररूपी द्रावण बाहेर पडतात त्यामुळे फवारणाऱ्याने चालण्याचा वेग नियंत्रित करून झाडे नेमकीच सर्व बाजूंनी ओलीचिंब होऊन द्रावण थेंबरूपाने खाली पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
विषबाधीत व्यक्तीची काळजी :-
-
विषबाधा झाल्यास वेळ न घालवता बाधीत व्यक्तीस अपघात स्थळापासून सावलीच्या ठिकाणी न्यावे व ताबडतोब प्रथमोपचार करावा.
-
विषबाधीत व्यक्तीचे अंग/बाधीत अवयव ताबडतोब साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावे व कोरड्या स्वच्छ टॉवेलने पुसावे. विषबाधीत व्यक्तीला जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे.
-
.कीडनाशक पोटात गेलेले असल्यास विषबाधीत व्यक्तीला ताबडतोब ओकारी करण्याची उपाययोजना करावी.
-
विषबाधीत व्यक्तीला पिण्यासाठी दूध तसेच विडी/सिगारेट व तंबाख देऊ नये.
-
विषबाधीत व्यक्तीला थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरूण द्यावे.
-
विषबाधीत व्यक्तीचा श्वासोच्छवास योग्य रितीने सुरू आहे का ते तपासावे. श्वासोच्छवास अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित रोग्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्वासोच्छवास सुरू करावा.
-
विषबाधीत व्यक्तीला झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी.
-
विषबाधीत व्यक्ती बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणावयाचे प्रयत्न करावे परंतु काहीही खाऊ घालण्याचे प्रयत्न करू नये.
-
विषबाधीत व्यक्ती त्वरित कीटकनाशकांच्या माहिती पत्रकासह डॉक्टरांकडे दाखवावे किंवा दवाखान्यात दाखल करावे व डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करावे.
-
विषबाधीत व्यक्ती बरी झाल्यावर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
अधिक माहिती करिता कृषी विद्यापीठातील तज्ञ, कृषी विभागातील अधिकारी/ कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने कीटकनाशक, बुरशीनाशक व तणनाशक यांची फवारणी करावी.
लेखक :-
अमरेश गजानन शेरेकर ,
शेतीशाळा प्रशिक्षक,
(नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प,मुंबई)
उपविभाग : अमरावती. ता. भातकुली. जिं.अमरावती.
Published on: 21 May 2021, 12:52 IST