मागील दोन तीन दिवसात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात व विशेषतःपश्चिम विदर्भातील बऱ्याच भागात अतिवृष्टी झाली व या पावसाचे एकंदरीत स्वरूप पाहता पाऊस झालेल्या भागातील जमिनीवर बऱ्याच काळापर्यंत पाणी साचून राहिल्याचे दिसून येत आहे.या परिस्थिती मुळे इतर खरीप पिकांसोबतच कापूस पिकाचे सुद्धा भरपूर नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.अति पाऊस झालेल्या शेतामध्ये बऱ्याच काळापर्यंत पाणी साचून राहिल्यास कपाशीची झाडे पावसाच्या पाण्यात बुडून
राहिल्यास त्याचा कापूस उत्पादनावर अनिष्ट परिणाम संभवतो.मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकात पाणी साचल्यामुळे कपाशीच्या मुळ्या सडतात व त्यामुळे प्रामुख्याने मर/आकस्मिक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे.त्यावर तातडीने प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा - अमडापुर येथे कृषी विभागामार्फत पीक -कीड,रोग सल्ला शेतीशाळा संपन्न
विशेषतः काळ्या भारी जमिनीत घेतलेल्या कापूस पिकात निचरा कमी असल्यामुळे मुळांच्या कार्यक्षेत्रात वाफसा नसल्यामुळे मुळांना व पर्यायाने झाडाला अन्नद्रवे मिळत नाहीत त्यामुळे झाडे सुकू लागतात
मुलुल होतात त्यालाच आकस्मिक मर रोग असे म्हणतात व अशा प्रकारचा मर रोगाचा प्रादुर्भाव हा सर्वत्र सध्या दिसून येत आहे.कपाशीवर येणारा हा रोग नसून,या रोगास कोणत्याही बुरशी,जीवाणू किंवा विषाणू जबाबदार नाहीत.दीर्घ पावसाचा खंड व त्यानंतर भरपूर पाऊस आणि जमिनीत अतिरिक्त पाण्याची साठवण व आद्रता यामुळे या रोगाची लक्षणे दिसतात. कपाशी पिकावर आकस्मिक मर रोगाचा (Parawilt) प्रादुर्भाव आढळुन आल्यास कपाशीच्या रोगग्रस्त झाडांवरील पाने क्षीण व मुलुल होतात व खालच्या बाजूने
वाकतात व झाड मेल्यागत वाटते.झाडांमधील ताठरपणा कमी होऊन झाड सुकू लागते.उपाययोजना : अशाप्रकारचा आकस्मिक मर कपाशी पिकात आढळून आल्यास खालील उपाययोजना कराव्यात पाणी साचलेल्या कपाशी पिकात मरग्रस्त झाडे आढळून आल्यास थोडाफार वाफसा येताच झुकलेली झाडे झुकलेल्या बाजूकडून मातीचा भर देऊन सरळ करावीत व दोन पायाच्या मध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत.शेतातील साचलेले पाणी चर काढून शेताबाहेर काढावे.सखल भागातील पाण्याला वाट करून द्यावी
कपाशीच्या झाडांचे खोड हवेमुळे ढिले पडल्यास खोडाभोवती माती दाबून भर द्यावी.कॉपर ऑकसीकलोराइड २५ ग्रम + १५० ग्रम युरिया + १०० ग्रम पोटाश १० लिटर पाण्यात घेऊन झाडाच्या बुंध्याशी पाठीवरच्या पंपाच्या सहायाने अंबवणी करावी व झाडालगत साधारण १०० मिली द्रावण पडेल याप्रमाणे बांगडी पद्धतीने देऊन झाडाचे खोड व्यवस्थित दाबून घ्यावे किंवा १ किलो १३:००:४५ + २ ग्रम कोबाल्ट क्लोराईड +२५० ग्रम कॉपर ऑकसीकलोराइड २०० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रती झाड १०० मिली आंबवणी करावी.
डॉ.संजय काकडे, कापुस कृषिविद्यावेत्ता
कापुस संशोधन विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
मोबा.९८२२२३८७८०
Published on: 17 September 2022, 09:13 IST