आपल्याकडे बरेच शेतकरी ऊस तोडणी केल्यानंतर पाचट जाळून टाकतात.परंतु हे पाचट न जाळता ती कुजवल्यासकिंवा तिचा आच्छादन म्हणून वापर केल्यास ऊस उत्पादन वाढीसाठी तसेच मजूर आणि पाणीबचतीसाठी उपयोग होऊ शकतो. तसेच त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून एकरी उत्पादन वाढ होणे शक्य आहे. या लेखामध्ये आपण ऊस पाचट चे उपयोग पाहू.
उसाच्या पाचटाचे उपयोग
जर आपण एक एकर क्षेत्राचा विचार केला तर त्या मधून तीन ते चार टन पाचट मिळते. परंतु आपल्याकडे बरेच शेतकरी ती जाळून टाकतात.परंतु असे न करता ऊस तुटल्यावर निघणारी पाचट खोडव्यामध्ये सरीत किंवा पट्ट्यात व्यवस्थित पसरवून टाकले तर त्याचा फायदा उन्हाळ्यामध्ये आच्छादन म्हणून तसेच कंपोस्ट खत म्हणून होतो.उसाचे पाचट शेतात ठेवून जिवाणू खतांचा वापर केल्यास रासायनिक खतांच्या वापरामध्ये जवळजवळ 25 ते 30 टक्के बचत होते. तसेच उसाच्या उत्पादनात एकरी चार ते सहा टनाने वाढ होऊ शकते. उसाच्या 65 मधील घटकांचा विचार केला तर साधारणपणे 40 ते 45 टक्के सेंद्रिय कर्ब,0.4 ते 0.5 टक्के नत्र,0.1 टक्के स्फुरद,0.5 टक्के पालाश तसेच 0.5 टक्के कॅल्शियम,0.3 टक्के मॅग्नेशियम व 0.1 टक्के गंधक हे दुय्यम अन्नघटक असून 240 पीपीएम लोह, 90 पीपीएम जस्त, तीनशे पीपीएम मॅग्नीज हे सूक्ष्मद्रव्ये असतात.
पाचट कुजण्याचे फायदे
- खुरपणी व मशागती च्या खर्चात बचत होते.
- पाचटाच्या आच्छादनामुळे संपूर्ण जमीन झाकले गेल्यामुळे गवत होत नाही त्यामुळे खुरपणीचा खर्च वाचतो.
- पाचट आच्छादनामुळे किंवा पाचट कुट्टी मुळे संपूर्ण जमीन झाकले जाते त्यामुळे जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते व जमिनीचा ओलावा दहा ते पंधरा दिवस टिकून राहतो आणि पाण्याची 40 टक्के बचत होते.
- जमिनीत वाफसा स्थिती राहील यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते.
- पाचट कुजल्यानंतर जमिनीत एकरी दीड ते दोन टन सेंद्रिय खताचा पुरवठा होतो. त्यामुळे मातीच्या कणांची रचना सुधारुन जमिन भुसभुशीत होते.
- हवा, पाणी यांचे संतुलन राहिल्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचा पुरवठा जास्तीत जास्त होत.
- जमिनीचे तापमान योग्य राखले जाते त्यामुळे जिवाणूंच्या संख्येत वाढ होऊन जमिनीतील नत्र स्थिरीकरणाचे, स्फुरद व पालाश उपलब्ध चे प्रमाण वाढते.
- पाचट आच्छादनामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते त्यामुळे जमिनीचा चोपनपणा कमी होऊन जमिनीची सुपीकता वाढते.
- उसाच्या उत्पादनात एकरी चार ते सहा पानांची वाढ होते.
- पाचट कुजण्यास जमिनीत अन्नघटकांचा पुरवठा होत असल्यामुळे बाहेरून रासायनिक खते 25 ते 30 टक्के कमी द्यावे लागतात.
- पाचट न जाळता यामुळे जमिनीची व पाण्याचे प्रदूषण कमी होते.
पाचटाचे आच्छादन कसे द्यावे?
ऊस तुटल्यानंतर पाचट सरीमध्ये एक सारखे पसरवावे किंवा पट्टा असल्यास त्यात पाचट पसरावे. कुट्टी मशीन उपलब्ध असल्यास त्या मशीनच्या साहाय्याने पाचटाची कुट्टी करावी. पाचटाचे आच्छादन केल्यानंतर किंवा कुट्टी केल्यानंतर उसाच्या बुडख्यावरपडलेले पाचट बाजूला करून बुडखे मोकळे करावेत. उसाचे बुडखे उंच राहिल्यास ते जमिनीलगत कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची संख्या वाढते. बुडखा छाटणी नंतर रोग व किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक ग्रॅम बाविस्टीन व दोन मिली रोगर एक लिटर पाण्यात या प्रमाणात मिसळून फवारावे. शेतात पसरलेल्या पाचटावर सुरुवातीस प्रति एकर तीस किलो युरिया आणि 40 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे तसेच प्रति एकरी चार ते पाच टन कुजलेले मळीकिंवा शेणखतात एक लिटर पाचट कुजविणारे जिवाणू मिसळून पाचटावर टाकल्यावर कुजण्याची क्रिया लवकर होते.
Published on: 05 October 2021, 01:43 IST