आता विविध प्रकारच्या पिकांची लागवड व्यापारी तत्त्वावर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात.यामध्ये कलिंगड लागवड देखील आता मोठ्या प्रमाणावर केली जात असून त्यासोबतच खरबूज लागवड देखील व्यापारी तत्त्वावर शेतकरी करू लागले आहेत.दुष्काळी भागात येणारे पीक म्हणून खरबुजाची ओळख आहे. या लेखात आपण या पिकाच्या एकंदरीत लागवड पद्धती पासून सर्व काही जाणून घेऊ.
नक्की वाचा:Mango Cultivation: आंबा लागवडीसाठी वापरा 'ही'पद्धत, मिळवा कमी क्षेत्रात भरपूर उत्पादन
लागणारी जमीन व हवामान
या पिकासाठी मध्यम काळी,रेताळ उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते.जमिनीचा सामू साडेसहा ते सात असावा. जर जमीन पाणी धरून ठेवणारी असेल किंवा चोपण जमीन असेल तर अशा जमिनीत हे पीक घेणे टाळावे.
जर जमीन भारी असेल आणि पिकाला पाणी जर नियमितपणे दिले गेले नाही तर फळे तडकण्याची समस्या निर्माण होते. या पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान चांगले असते व त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या पिकाची लागवड करतात. साधारणतः या पिकांच्या उत्तम वाढीसाठी 24 ते 26 अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते.
खरबूज पिकाच्या सुधारित जाती
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुसा सरबती, हरामधु, पंजाब सूनहरी व दुर्गापुरा मधू या जाती शिफारस केलेल्या आहेत.
रोपवाटिका व्यवस्थापन महत्त्वाचे
1- अगोदर बरेच शेतकरी बियाणे टोकून लागवड करायचे. परंतु सध्याच्या पद्धतीनुसार प्रो ट्रेमध्ये वाढवलेले रोपांची पुनर्लागवड केली जाते. यामुळे वेलांची योग्य प्रमाण,मजूर, पाणी आणि इतर कृषी निविष्ठा इत्यादी गोष्टींवर होणारा खर्च वाचतो.
2- रोपे तयार करण्यासाठी 98 कप्पे असलेला प्रो ट्रे वापरतात. यामध्ये कोकोपिट भरून बियाणे लागवड केली जाते.
3-दीड ते दोन किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते.
4- लागवड केल्यानंतर आठ ते दहा ट्रे एकावर एक ठेवून काळा पॉलिथिन पेपरने झाकून घ्यावेत. यामुळे उबदारपणा टिकून राहतो व बी लवकर उगवते.
5- रोप उगवल्यानंतर तीन ते चार दिवसा नंतर पेपर काढून टाकावा व ट्रे खाली उतरून ठेवावे.
6- रोपांची सड होऊ नये म्हणून पेरणीनंतर दहाव्या दिवशी कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रॉक्साइडची दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
7- नागअळी व रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून इमिडाक्लोप्रिड 0.5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
8- 14 ते 16 दिवसांमध्ये पहिला फुटवा फूटल्यानंतर रोपांची पुनर्लागवड करावी.
9- लागवडीचा हंगाम उन्हाळ्यामध्ये जानेवारी ते मार्च आणि पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर
नक्की वाचा:Important: भाजीपाला निर्यात करायचा असेल तर लागतात 'ही'कागदपत्रे, वाचा सविस्तर
खरबुज लागवडीचे तंत्रज्ञान
1- लागवडीसाठी 75 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटिमीटर उंच गादीवाफे तयार करावेत.
2-लागवडीपूर्वी 50 किलो नत्र,स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी व लागवडीनंतर एका महिन्याने 50 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.
3- बेसल डोस मध्ये एकरी पाच टन शेणखत+ 50 किलो डीएपी+ 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश+ 50 किलो 10:26:26+ 200 किलो निंबोळी पेंड+ दहा किलो झिंक सल्फेट मिसळावे.
4- दोन गादी वाफ्यांमध्ये लॅटरल येते व अंतर सात फूट असावे.
5- गादी वाफ्याचा वरचा भाग 75 सेंटीमीटर असावा. वाफ्याच्या मध्यभागी लॅटरल टाकून त्यावर चार फूट रुंदीचा मल्चिंग पेपर अंथरून दोन्ही बाजूंनी पेपर व माती टाकावी. जेणेकरून पेपर वाऱ्यामुळे फाटणार नाही.
6- मल्चिंग पेपर अंथरला नंतर दोन इंची पाईपच्या तुकड्याच्या साह्याने ड्रीपरचा दोन्ही बाजूंना दहा सेंटिमीटर अंतरावर छिद्रे पाडावीत.
7- ड्रिप लाईनच्या एकाच बाजूच्या दोन छिद्रातील अंतर दीड फूट ठेवावे.
8- छिद्रे पाडून झाल्यावर गादीवाफा ओलून वापसा आल्यानंतर लागवड करावी. रोपांची लागवड करताना रोपे व्यवस्थित दाबून पेपरला चिकटणार नाहीत याची काळजी घ्यावी. जेणेकरून रोपांची मर होणार नाही. अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर एकरी सुमारे सात हजार 250 रोपे लागतात.
Published on: 24 September 2022, 12:08 IST