या देशात सुसंस्कृत होण्यासाठी नैतिक, अध्यात्मिक व धार्मिकतेचे धडे देऊन, अनेक विचारवंतांनी , तपस्वी महंतांनी समाजाला अधोगती पासून रोखण्याचे प्रयत्न केले. तसेच अनेक धर्मगुरूंनी
मानवाचे जीवन सफल बनविण्यासाठी, शांततेच्या मार्गाने जगण्याचे पर्याय सुचविले व जीवन शैली सुद्धा शिकवली . म्हणूनच भारत देश हा सुसंस्कृत राहून जगात वाटचाल करीत राहिला . अनेक सुखदुःखाच्या लाटा येऊन सुद्धा तटस्थ, व खंबीर तेने मार्गक्रमण करीत राहिला . प्रत्येक धर्मात वंशपरंपरेने कवी, लेखक, साहित्यिक ,विचारवंत तयार झालेत . तसेच परंपरेने या देशाला शौर्याचा , क्रांतिकारकांचा वारसा सुद्धा मिळाला. अनेक लढाया होऊन सुद्धा डौलाने व खंबीरतेने देश उभा आहे.
भारताची संस्कृतीच ही मुळात ऋषी व कृषि प्रधान देशाची आहे. सामाजिक दृष्टीने व विविधतेने नटलेल्या या वैभवशाली कृषिप्रधान देशात अन्नदात्याला,आर्थिक समृद्धीत मात्र जगू दिले गेले नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तसेच शेतकर्यांचे पंचप्राण माननीय शरद जोशी , अश्या थोर समाजसुधारकांनी गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक दृष्टिकोन समजावून सांगितला .
मात्र देश स्वतंत्र होऊन सुद्धा, बळीराजाला समृद्ध करण्याच्या, आर्थिक विचाराला मात्र तिलांजली देण्यात आली. अन्नदात्याला पारतंत्र्यात ठेवूनच शहरीकरणाचा सुधारणावादी मार्ग निवडला गेला. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उन्हे बहात्तर (-72) टक्के सबसिडी देऊनच कारभार चालविला गेला. ग्रामीण व्यवस्थेचा विचार मांडणारे महात्मा गांधी जिवंत असते तर, कदाचित शेतकऱ्यांना मातीत घालणारे कायदे अस्तित्वात आले नसते. दिनांक 18जून 1951 ला पहिली घटना दुरुस्तीच झाली नसती. कदाचित अशी हिम्मत हंगामी सभापती असनाऱ्या पंडित नेहरूजींनी सुद्धा केली नसती. महात्मा गांधीच्या हत्येमुळे ग्रामीण व्यवस्थेतील शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले. आणि तेव्हापासून शेतकऱ्याला समृद्ध होऊन देण्यासाठी, राज्यकर्त्यांनी व सत्ताधीशांनी अनेक क्लृप्त्या आखल्या. म्हणूनच नंतरच्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख असे अनेक विचारवंत सरकार मधून बाहेर पडले. जाती जातीचे भांडणे लावून आपापल्या जातीचे नेते सत्तेत बसविले गेले.
इस भारत देश मे
" ना हिंदू खत्रे मे है l, ना मुस्लिम खतरेमे है l ना कोई जात भाई खत्रे मे है l सच्चाई तो ये है की, इस देशमें - देशका किसान खत्रे मे है l "
नटनट्या ,क्रिकेट पटू, संत महंत अशा अनेक विचाराची,आर्थिक दृष्टिकोन नसलेले आमदार, खासदार सत्तेत बसविले. त्यामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे सुरू झाले. कारण या देशाची संसद ही धार्मिकतेवर, नाही तर आर्थिक धोरणावर चालते. ज्या संसदमध्ये
जागतिक धोरणाचाआर्थिक विचार चालतो. संसद म्हणजे ही काही रंगमंच व क्रिकेट पटूचे क्रीडांगण नाही तर्, ती एक देशाची सार्वभौम सत्तास्थान, व जागतिक उलाढालीचे आर्थिक स्थान आहे.
अनेक राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलने करू राज्यपातळीवरील, बॉर्डर तोडून, शेतमाल संपूर्ण देशात विकण्याची मुभा मिळविली." एक देश, एक व्यापार" आज भारतात सुरू करून, या देशाची व्यापार पेठ एकत्र करणे सरकारला भाग पडले. कापूस राज्याबाहेर जाऊ देण्यासाठी आंदोलने केली. तशीच ती आता संपूर्ण जगाची व्यापारपेठ ही सुद्धा एकच असावी या व्यवस्थेसाठी शेतकऱ्यांचे कैवारी माननीय रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना या जगाची अर्थव्यवस्था व व्यापारपेठ मोकळी असावी. संपूर्ण जगात शेतमालाची विक्री व्हावी. या खुल्या अर्थव्यवस्थेसाठी ते देशभर सतत आंदोलने करीत आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याची मुभा जर संपूर्ण जगात झाली तर जागतिक दर्जाचे भाव शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. काही शेतमालाचे भाव जागतिक घडामोडीत पडतील ,परंतु काही शेतमालाचे भाव अतीउच्चांक गाठतील , शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले तर शेतकरी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही.
स्वतंत्र भारत देशात वाघ, नीलगाई, सांबर, चितळ,हरण, डुकरे इतर वन्यप्राण्यांना संरक्षण आहे. यांच्यावर गोळीबार होत नाही , परंतु शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या भावाची मागणी केली तर तो गुन्हेगार होऊन त्याच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या व गोळीबार चालतो. ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतो त्याच अन्नदात्यावर मात्र गोळीबार होतो. ही या देशात शेतकऱ्यांची केलेली क्रूर थट्टा व अवस्था आहे. तरी आम्ही या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणतो. खोट्या स्वातंत्र्यात गुलामीत जगवणाऱ्या शेतकऱ्याला मात्र आम्ही बळीराजा म्हणतो.
भारत देशातील शेतकऱ्याला शासन आपुलकीने गोंजारते व पाठीवर लाथ मारून त्याला हाकलल्या जाते? येवढे भीषण अवस्थेत जर शेतकरी असेल, तर तो आत्महत्या करणार नाही का? महाराष्ट्रामध्ये या फक्त एक वर्षातअडीच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्या चे थैमान चालू झाले.
१) शरद जोशी म्हणायचे " या देशातून गोरे इंग्रज गेले, परंतु काळे इंग्रज तयार झाले.".
२)म्हणजेच - "सरकारचे धोरण हेच, शेतकर्यांचे मरण."
३) आर्थिक पारतंत्र्यात व गुलामीत जखडून ठेवलेल्या शेतकऱ्यांना जर आर्थिक स्वातंत्र्य मिळाले नाही तर भारत देश हा महासत्ता होईल का.?
४) शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा कलंक मीटेल का.?
५) संसद मध्ये जखडून ठेवलेल्या शेतकरीविरोधी धोरणातून व गुलामगिरीतून अन्नदाता मुक्त होईल का.?
५) म्हणूनच पुन्हा म्हणावेसे वाटते- जर या देशात शेतकरी स्वतंत्र नाही तर, हा देश महासत्ता कसा होईल?.
आपला नम्र-
धनंजय पाटील काकडे 9890368058.
विदर्भ प्रमुख - शेतकरी संघटना.
मुक्काम- वडूरा,पोस्ट- शिराळा, तालुका- चांदूरबाजार, जिल्हा- अमरावती.
Published on: 13 April 2022, 01:34 IST