जगात ब्रोकोली उत्पादनात चीन अग्रस्थानी आहे. भारतात हि बऱ्याच ठिकाणी उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात ब्रोकोलीची लागवड लहान क्षेत्रात केली जाते. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरात ती विक्रीसाठी पाठवली जाते हि ब्रोकोली मुंबई, चैन्नई, दिल्ली, कोलकता येतील हॉटेल्ससाठी पाठवली जाते.
ब्रोकोलीचे आहारातील महत्व : ब्रोकोली गड्डयाचा रस काढून शरीर आरोग्य जपण्यासाठी पेय म्हणून वापर करतात भारतात मुख्यत्वे करून ब्रोकोलीचा हिरवे सॅलेड या स्वरूपात आहारात उपयोग करतात, ब्रोकोलीत पाणी, कॅलरीज, कर्बोदके, साखर, तंतुमय तसेच स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, विविध खनिजे असतात. ब्रोकोलीच्या गड्डयांत महत्वाची अँटी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे विविध प्रकारचे कर्करोग रोखणे शक्य होते.
हवामान :ब्रोकोलीचे उत्पादन थंड हवामानात अतिशय उत्तम येते, ज्या भागात पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणीही लागवड करता येते, दिवसा २० ते २५ अंश से. तापमान रोपांची वाढ होण्यासाठी आवश्यक असून, गड्डा तयार होतेवेळी तापमान १५-२० अंश जरुरीचे आहे, हरितगृहात रोपांची वाढ होण्यासाठी दिवसाचे तापमान २० ते २५ अंश जरुरीचे आहे, गड्डे लावणीच्या वेळी रात्रीचे, दिवसाचे तापमान अनुक्रमे १५ ते २० अंश, तर ७० टक्के नियंत्रित करावी.
जमीन :रेताड, मध्यम, काळी, निचऱ्याची जमीन या पिकास चांगली असते जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असावा, शेवटच्या कुळवणी वेळी एकरी १२ ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून टाकावे,
हरितगृहात लागवड करण्यासाठी हरितगृहातील तयार केलेले माध्यम फॉरमॅलीन या रसायनाद्वारे करावे त्यानंतर ६० से.मी. रुंद, ३० से.मी. उंच व २ गादीवाफ्यामध्ये ४० से.मी. अंतर ठेवावे हरितगृहामध्ये एकरी ४० मीटर लांबीचे एकूण १०० गादी वाफे तयार होता.
ब्रोकोलीच्या जाती :ब्रोकोलीपिकात हिरवे गड्डे, जांभळे गड्डे, फिकट गड्डे, पांढऱ्या रंगाचे गड्डे असे प्रकार आहेत. बियाणे विकत घेताना त्याचे उत्पादन, पीक किती दिवसांत काढणीस तयार होते आदी सर्व गोष्टींची माहिती घ्यावी.
१) हिरवे गड्डे :भारतात हिरव्या गडद रंगाच्या गड्डयांचे वाणच अधिक लोकप्रिय आहेत, महाराष्ट्रात लागवडीसाठी पालम समृध्दी हा वाण चांगला असून तो जास्त उत्पादन देणारा आहे, हिरव्या रंगाचा हा गड्डा ३०० ते ४०० ग्रॅमचा असतो
२) जांभळे गड्डे :जांभळ्या रंगाचे वाण कड्याक्याची थंडी सहन करू शकतात आणि ऐन हिवाळ्यात काढणीस येतात सॅलेडमध्ये या जातीचा सुद्धा उपयोग केला जातो
३) पुसा केटीएस-१ : या मध्यम उंचीच्या वाणाचे गड्डे अतिशय घट्ट व गडद हिरव्या रंगाचे असतात
लागवड :
एकरी सुमारे २६,६६० इतकी रोपे बसतात लागवड दुपारनंतर करावी त्यानंतर रोपांना ठिबकद्वारे पाणी दयावे लागवड करताना रोपांची मुळे ॲझोटोबॅक्टर जिवाणूसंवर्धकाच्या द्रावणात बुडवून लावावीत हरितगृहात लागवड प्रत्येक गादीवाफयावर ३० बाय ३० सें.मी. अंतरावर करावी
खत व्यवस्थापन :
सर्वप्रथम माती परीक्षण करून जमिनीतील उपलब्ध मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची माहिती घ्यावी एकरी ६० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ७० किलो पालाश देणे आवश्यक आहे माती परीक्षण अहवालाप्रमाणे मॉलिब्डेनम आणि बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून द्यवीत ब्रोकोली पानांचा शेंडा खुरटलेला राहणे व गड्डा न भरणे ही मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे विशेषतः आम्लीय जमिनीत (सामू ५.५ च्या खाली) ही विकृती दिसून येते
कीड नियंत्रण :
२) काळी माशी :
लक्षणे :ही माशी पानांच्या पेशींत अंडी घालते, रोपांची वाढ खुंटते, रोपांचा शेंडा अळ्यांनी खाल्यास त्यास गड्डा धरत नाही.
नियंत्रण :मॅलॅथिऑन (50 ईसी) २० मि.लि. प्रति १० लि. पाण्यातून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
२) मावा :
लक्षणे : हिरव्या किंवा पांढऱ्या रंगांचे मावा किडे पानातील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होउन पिवळी पडतात आणि कालांतराने वाळून जातात.
नियंत्रण :नियंत्रणासाठी ०.०५ टक्के मॅलॅथिऑन ५० इ. सी निमअर्क ४ टक्के या औषधांच्या १०-१२ दिवसानंतर ३ ते ४ फवारण्या कराव्यात.
३) चौकोनी ठिपक्यांचा पतंग :
लक्षणे : अळी पानांच्या खालच्या बाजूस राहून, पानांना छिद्रे पाडून पानांतील हरितद्रव्य खाते. हि कीड सप्टेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत कार्यक्षम असते.
नियंत्रण :पिकांवर पहिली फवारणी दोन अळ्या प्रति रोप दिसू लागताच बीटी जिवाणूवर आधारित कीटकनाशक १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून करावी. ट्रायकोग्रामा हे मित्रकीटक प्रति हेक्टरी एक लाख या प्रमाणात सोडावे. फेनव्हरलेट २० इसी ५० ग्रॅम ए.आय. प्रती हेक्टर या प्रमाणात १५ दिवसाच्या अंतराने फवारावे.
काढणी व उत्पादन :
वाणपरत्वे ब्रोकोलीचा गड्डा ६० ते ७० दिवसांत लागवडीपासून काढणीस तयार होतो. विक्रीच्या द्रुष्टीने व चांगला दर मिळण्याच्या द्रुष्टीने गड्डयांचा व्यास ८-१५ सें.मी. असतानाच काढणी करावी.
यात गड्डे साधारणपणे १५ सें.मी. लांबीचा दांडा ठेवून कापून घ्यावेत, मुख्य गड्डा काढून घेतल्यानंतर खाली पानांच्या बेचक्यातून येणारे गड्डे पोसण्यास वाव मिळतो. प्रत्येक गड्डयाचे वजन सरासरी ३०० ते ४०० ग्रॅम असणे आवश्यक आहे. एकरी ४० गुंठे क्षेत्रातून सुमारे ८ ते ९ टनांपर्यत गड्डयांचे उत्पादन मिळते.
पॅकिंग :
गड्डयांची काढणी झाल्यावर त्यातील उष्णता बाहेर काढून टाकण्यासाटी गड्डयांचे पूर्व शीतकरण शून्य अंश से. ते २ अंश से तापमानात करून घेणे आवश्यक असते. आकारमान किंवा वजनाप्रमाणे प्रतवारी करून गड्डे स्वच्छ करावेत. वायूवीजनासाठी छिद्रे असलेल्या कोरुगेटेड बॉक्समध्ये ते ३ किंवा ४ थरांपर्यंत भरावेत. पॅकिंग केलेल्या बॉस्केसची रात्री (तापमान कमी असल्याने) वाहतूक करावी किंवा प्लास्टिक ट्रेमध्ये सभोवती बर्फ ठेवून तापमान कमी करून क्रेटमधून वाहतूक करावी.
साठवणूक :
गड्डयांची काढणी झाल्यानंतर खोलीच्या तापमानात(रूम टेंपरेचर )गड्डा २ दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतो. परंतु गड्डे पूर्वशीतकरण झाल्यानंतर शीतकरून शून्य अंश से. तापमानात व ९५-९८ टक्के सापेक्ष आद्रतेत २-३ आठवड्यांपर्यंत चांगल्या स्थितीत साठवून टेवता येतात.
विजय भुतेकर, सवणा
संकलन : प्रविण सरवदे, कराड
Published on: 31 March 2022, 12:12 IST