असं सांगितलेलं असतानाही लोकांनी चिकन आणि अंड्यांचं सेवन कमी केलं आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायावर याचा गंभीर परिणाम झालेला असून एकंदरीत ग्रामीण अर्थव्यवस्थाही धोक्यात आली आहे.
देशातील अनेक उद्योगधंद्याचे कंबरडे मोडले, यामध्ये कुक्कुटपालन व्यवसायाचा देखील समावेश आहे. देशात आजमितीला कुक्कुटपालनातील कोंबड्यांची संख्या ही ३८.७ टक्के मांसल कोंबड्या, २९.४ टक्के अंड्यावरील कोंबड्या, २९.८ टक्के परसातील कोंबड्या, बदके ०.६७ टक्के आणि इतर १.४३ टक्के असा विभागलेला आहे. महाराष्ट्रात आजमितीला एकूण ५० ते ६० लाख व्यावसायिक कुक्कुटपालन व्यवसाय करतात. याद्वारे महिन्याला चार कोटी मांसल कोंबड्यांद्वारे साधारण नऊ कोटी किलो मासिक कुक्कुटमांस (चिकन) उत्पादन करतात. १.५ लाख हे देशी कोंबड्या उत्पादन करणारे देखील महिन्याला ८० लाख देशी पक्षी उत्पादन करतात. राज्यातील एकूण अंड्यावरील पक्षाची संख्या ही अंदाजे १.८७५ कोटी आहे. अंड्याचे दैनंदिन उत्पादन हे १.५ कोटी आहे. असा हा कुक्कुटपालन व्यवसाय लॉकडाउननंतर हळूहळू पूर्वपदावर येतानाच बर्ड फ्लूचे संकट त्यावर आले आहे.
पोल्ट्री उद्योगावर परत एकदा संकट आले आहे. राज्यातील अनेक भागात पोल्ट्री व्यवसाय शेतीला पुरक व्यवसाय म्हणून केला जातो. अनेक शेतकरी यात मोठी गुंतवणूक करुन आपली कमाई वाढविण्याचा प्रयत्न करतात.परंतु देशात आलेल्या बर्ड फ्लूने शिरकाव केल्याने पोल्ट्री उद्योगावर मोठं संकट आले आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री उद्योग केला जातो. कोरोनाकाळात सुरुवातीला अफवांमुळे पोल्ट्री उद्योगाला फटका बसला होता. दरम्यान आता बर्ड फ्लू पार्श्वभूमीवर चिकनची मागणी घटल्याने जिवंत कोंबडीच्या दरात २५ ते ३० रुपयांनी तर किरकोळी विक्रीच्या दरात ४०ते ५० रुपयांनी घट झाली आहे. अंड्याचे दरही नगामागे पन्नास पैसे ते एक रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील दररोज ७० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. बर्ड फ्लूच्या कारणामुळे राज्यात चिकनची मागणी घटली आहे.
कुक्कुटपालन हा शेतीला जोडव्यवसाय म्हणून करणाऱ्या छोट्या उद्योजकांना तरी शेती किंवा इतर काही आधारामुळे किमान जगण्याची भ्रांत तरी पडत नाही, पण ज्या उद्योजकांच्या मोठ्या पोलट्री आहेत आणि हाच एकमेव व्यवसाय आहे, त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे.कोरोनानंतर लॉकडाऊन झालं. त्या काळातही नॉन वेज खाल्यानं कोरोना होतो, अशी अफवा पसरली होती. त्यामुळं तेव्हाही चिकन, अंड्यांचे भाव पडले होते. त्या काळातही पाच सहा महिने आमचे नुकसानातच गेले, आता दोन तीन महिन्यांपासून सगळी परिस्थिती सुरळीत झाल्यावर परत बर्ड फ्लू आला. त्यामुळं परत नुकसान
देशाचा जगात कुक्कुट मांस उत्पादनात पाचवा क्रमांक आहे. आपण २०१९ मध्ये ५२०० दशलक्ष मेट्रिक टन चिकन चे उत्पादन घेतले आहे पण एकूणच अंडी आणि कुकुट मांस खरेदीकडे, खाण्याकडे दुर्लक्ष केले अथवा भीती बाळगली तर आपले सर्व बाजूने मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. सन २००६ मध्ये साधारण अकरा लाख पक्षी नष्ट केले, त्याची किंमत १३० दशलक्ष होती आणि ८० कोटी रुपये आपण नष्ट केलेल्या पक्षांना अनुदान म्हणून दिले होते. आज मितीला दररोज साधारण ७० कोटी रुपयांचे नुकसान हे कुक्कुटपालन व्यवसायाचे होत आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच याचा विचार करायला हवा. देशात एकूण दहा राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. देशात २००६ पासून २०१५ पर्यंत एकूण २५ वेळा या रोगाचा प्रादुर्भाव कुठे ना कुठे १५ राज्यांमध्ये झालेला आहे. पण आज अखेर राज्यासह देशात कुठेही मानवाला हा रोग झाला नाही, ही बाब सर्वांनी लक्षात घ्यावी.
या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागासह वन, महसूल, आरोग्य, ग्रामविकास विभागासह गृह खाते देखील प्रयत्नशील आहे.
कुक्कुटपालन व्यावसायिकांना पक्ष्यांच्या खाद्यासाठी दररोज साडेचार रुपये प्रतिकोंबडी इतका खर्च येतो आणि सध्या विक्री नसल्यामुळे हा माल फार्मवर पडूनच आहे. असं असलं तरीही व्यावसायिकांना कोंबड्यांच्या खाद्यावर खर्च तर करावाच लागतो, त्यामुळे सध्या लोक मिळेल त्या भावाला विक्री पक्ष्यांची विक्री करताहेत आणि आताच्या परिस्थितीत हा माल काढून टाकण्यासाठी व्यावसायिकांमध्ये चढाओढ असल्यानं मालाचे भाव अजूनच पडत आहेत.
बर्ड फ्लू आणि त्याचा राज्यातील पोल्ट्री व्यवसायावर होणारा परिणाम , “हा फक्त पोल्ट्री व्यवसायाला बसलेला फटका नसून एकूण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. पोल्ट्री इंडस्ट्रीवर परिणाम झाला की मका आणि सोयाबीनचे भावही पडतात. मका, सोयाबीन हे या पक्ष्यांचं खाद्य असून कुक्कुट उत्पादनसाखळीतला महत्वाचा घटक आहेत. या व्यवसायाचा शेती आणि शेती उत्पादनांशीही संबंध असल्यामुळे कृषी उत्पादनसाखळीवरही त्याचा परिणाम होतो.”
राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं चिकन प्रॉडक्ट्स सुरक्षित असल्याचं सांगूनही ग्राहकांनी चिकन, अंड्यांचं सेवन कमी केलं. बर्ड फ्लूआधी दर १०० नगांमागे ५०० रुपये असा अंड्याचा भाव होता आणि ब्रॉयलर चिकनचा प्रतिकिलो ९० रुपये इतका होता. आता हे भाव खूप पडलेत. तरी त्यात अंडी किमान कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवता येतात पण ब्रॉयलरचं तसं नाही, ब्रॉयलर विकणारे लोक खूप जास्त चिंतेत आहेत. ही परिस्थिती उद्भवण्यासाठी माध्यमं जबाबदार आहेत. माध्यमांनी याबाबत वस्तुस्थिती नीट समजून घेऊन मग बातम्या द्यायला हव्यात.” भारतीय आहारशैलीत चिकन वा कोणत्याही प्रकारचं मांस हे उकडून, शिजवून खाल्लं जातं, समजा एखाद्या देशी पक्ष्यांत असा विषाणू आढळला जरी, तरी ज्या तापमानाला मांस शिजवलं जातं, तेवढ्या तापमानात हे विषाणू जिवंत राहण्याची शक्यता नसतेच, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता वा खोट्या माहितीवर, अफवांवर विश्वास न ठेवता चिकन, अंडी इ. चं सेवन सुरु ठेवलं पाहिजे,अफवांवर विश्वास नाही ठेवला तर आपण निश्चितपणे या बर्ड फ्ल्यूचे संकट परतवून लावू, यात शंका नाही. सरकारने देखील पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासह नैसर्गिक आपत्ती समजून कुक्कुटपालन व्यवसायिकांना मदत आणि त्यावर अवलंबून असणाऱ्यांची उपासमार होणार नाही, याची काळजी घेणे अपेक्षित आहे.
विकास परसराम मेश्राम
मु+पो,झरपडा
ता अर्जुनी मोरगाव
जिल्हा गोदिया
मोबाईल नंबर 7875592800
Published on: 15 November 2021, 08:56 IST