Agripedia

ट्रायकोडर्माचा वापर जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशी जसे फ्युजॅरियम, रायझोक्टोनिया, स्क्लेरोशियम आणि पिथीयम मुळे उद्भवणारे रोग मर, मुळकूज, खोडकुज तसेच काही बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी करता येतो. हल्ली ट्रायकोडर्माच्या दोन प्रजाती मुख्यतेकरून वापरण्यात येतात – ट्रायकोडर्मा हरजीएनम आणि ट्रायकोडर्मा व्हिरीडी. या बुरशींचे संवर्धन २५० ग्रॅम आणि एक किलो पाकिटाच्या स्वरुपात बाजारात मिळते.

Updated on 18 May, 2024 5:05 PM IST

डॉ. पंकज नागराज मडावी

आजच्या जगात सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे तसेच प्रगतशील देशांमध्ये सेंद्रिय शेतीमधील उत्पादनास चांगली मागणी आहे. पिकांवर रोगांचे नियंत्रण करण्याकरिता ट्रायकोडर्मा एक प्रभावी रोग नियंत्रक बुरशी आहे आणि तिचा वापर आपण जैविक शेतीमध्ये रोग नियंत्रणासाठी करू शकतो. अलिकडे रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्माचा वापर होऊ लागला आहे.

ट्रायकोडर्माचा वापर जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशी जसे फ्युजॅरियम, रायझोक्टोनिया, स्क्लेरोशियम आणि पिथीयम मुळे उद्भवणारे रोग मर, मुळकूज, खोडकुज तसेच काही बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी करता येतो. हल्ली ट्रायकोडर्माच्या दोन प्रजाती मुख्यतेकरून वापरण्यात येतात – ट्रायकोडर्मा हरजीएनम आणि ट्रायकोडर्मा व्हिरीडी. या बुरशींचे संवर्धन २५० ग्रॅम आणि एक किलो पाकिटाच्या स्वरुपात बाजारात मिळते.

ट्रायकोडर्मा अपायकारक बुरशींच्या धाग्यांमध्ये विळखा घालून आपले साम्राज्य पसरविते व नंतर या धाग्यांमध्ये छिद्र करून त्यातील पोषक अन्नद्रव्ये शोषून घेते त्यामुळे अपायकारक बुरशीचा विस्तार थांबतो. ट्रायकोडर्मा अपायकारक बुरशीला मारक ठरणारे व्हिरीडीन प्रतीजैवक सुद्धा तयार करते. अपायकारक बुरशीपेक्षा ट्रायकोडर्माची वाढ लवकर होते त्यामुळे ट्रायकोडर्मा ही बुरशी अन्नद्र्व्यांसाठी अपायकारक बुरशी बरोबर प्रतिस्पर्धा करून अपायकारक बुरशीच्या वाढीसाठी लागणारे कर्ब, नत्र, व्हिटॅमिन इत्यादी वापरून घेते त्यामुळे अपायकारक बुरशीची वाढ खुंटते.

ट्रायकोडर्माचा वापर –

प्रामुख्याने ट्रायकोडर्माचा वापर बीजप्रक्रिया, रोपांची प्रक्रिया आणि मातीची प्रक्रिया करण्यासाठी केला जातो.

१)बीजप्रक्रिया - पेरणीच्या वेळी बियाण्यावर पाणी शिंपडून १ किलो बियाण्यास ३ ग्रॅम ट्रायकोडर्मा सोबत व्यवस्थितपणे मिसळावे. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी.
२)रोपांची प्रक्रिया – ज्या पिकांची लागवड रोपे तयार करून केली जाते त्या पिकांमध्ये प्रक्रीयेकरिता लागवडीपूर्वी तयार झालेल्या रोपांची मुळे ट्रायकोडर्माची ५०० ग्रॅम भुकटी ५ लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात ५ मिनिटांसाठी बुडवून ठेवावीत व नंतर त्यांची लागवड करावी.
३)मातीची प्रक्रिया – मातीची प्रक्रिया करताना १ ते १.५ किलो ट्रायकोडर्मा २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून १ हेक्टर शेतातील मातीत मिसळावे व शक्य असल्यास पाणी द्यावे.
४)फवारणी – पानावरील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणाकरिता कृषि विद्यापीठांनी विशिष्ट रोगांकरिता केलेल्या शिफारशींचा अवलंब करावा.

ट्रायकोडर्माला अधिक प्रभावी करण्यासाठी उपाय –

•पाण्याचा व्यवस्थित निचरा असणाऱ्या जमिनीत ट्रायकोडर्माची वाढ जोमाने होते म्हणून जास्त ओलीत करू नये.
•जमिनीत सेंद्रिय पदार्थ असल्यास ट्रायकोडर्माची वाढ चांगली होते त्याकरिता शेतात चांगले कुजलेले शेणखत टाकावे.
•ट्रायकोडर्मा बुरशीचे पाकीट/ द्रावण जास्त काळ न ठेवता लवकरात लवकर वापरावे तसेच वापरेपर्यंत त्यांना थंड ठिकाणी सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.
•तसेच बियाण्यांच्या प्रक्रीयेकरिता ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू इत्यादी जैविक खतांचा वापर करता येतो.

लेखक - डॉ.पंकज नागराज मडावी, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) मोबाईल क्र: ९५७९५२८५८४, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर

English Summary: Benefits and Uses of Trichoderma for Disease Free Farming
Published on: 18 May 2024, 05:05 IST