शेती म्हणजे एक व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी नेहमी सुयोग्यरित्या नियोजन करणे महत्वाचे ठरते. पारंपारिक पद्धत्तीने शेती करून फक्त पोटाची खळगी भरता येऊ शकते मात्र ह्यातून शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. बळीराजा आपला विकास केवळ शास्त्रीय पद्धत्तीने शेती करून साधु शकतो. आज कृषी जागरण आपल्या शेतकरी मित्रांसाठी गाजरच्या दोन जातीविषयी माहिती घेऊन आले आहे; चला तर मग जाणुन घेऊया गाजरच्या ह्या दोन सुधारित जातींची माहिती.
भारतात गाजर लागवड हि मोठ्या प्रमाणात केली जाते ह्याची लागवड करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न कमवीत आहेत. जर आपल्यालाही गाजर लागवदीतून अतिरिक्त उत्पन्न कमवायचे असेल तर वेळ न दवडता ह्याच्या लागवडीला सुरवात करून टाका कारण गाजर लागवडीसाठी हि योग्य वेळ आहे. तसे बघायला गेले तर गाजर पिकाची आगात लागवड हि ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान केली जाते. परंतु अनेक शेतकरी बांधव ह्याची लागवड हि ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान करतात आणि चांगली कमाई देखील करतात. गाजर हे पिक सव्वा तीन महिन्यात तयार होते. म्हणजे ह्याचे उत्पादन हे सव्वा तीन महिन्यात यायला सुरवात होते.
गाजर लागवडीसाठी जमीन कशी हवी
गाजर हे पिक लोममाती म्हणजे वाळूमिश्रित चिकनमाती असलेल्या जमिनीत चांगले येते. गाजर लागवड करताना जमीन हि चांगली भुसभूशीत असावी तसेच जमीन हि पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी म्हणजे पिकाची चांगली वाढ होईल, पिक खराब होणार नाही परिणामी विक्रमी उत्पादन शेतकरी प्राप्त करू शकतात. जमिनीची पूर्वमशागत हि चांगली केली गेली पाहिजे सुरवातीला विक्टरी नागराने दोनदा शेत चांगले नांगरून घ्यावे आणि नंतर आपल्या देशी नागराने नांगरून घ्यावे आणि फळी मारून वावर चांगले भुसभूशीत करून घ्यावे. लागवड करताना वावरात चांगला ओलावा असायला हवा ह्याची काळजी घ्यावी.
गाजर लागवडिपूर्व बियाणेवर बिजप्रक्रिया करणे महत्वाचे ठरते. बिजप्रक्रिया साठी गाजराचे बियाणे केप्टण 2 ग्राम/1 किलो बियाणे हे प्रमाण घेऊन बिजप्रक्रिया करावी. शेतात शेणखत, पोटॅश, फास्फोरस ह्याची मात्रा चांगली असायला हवी.
गाजरच्या सुधारित जाती
»पुसा रुधिरा
पुसा रुधिरा गाजरची एक सुधारित वाण आहे आणि ह्याची लागवडीची शिफारस कृषी वैज्ञानिक देखील करत्यात. ह्याचे सरासरी उत्पादन हे 30 टन प्रति हेक्टर एवढे विक्रमी मिळते. शास्त्रज्ञांच्या मते, इतर गाजरच्या जातींच्या तुलनेत ह्या जातीत भरपूर पौष्टिक गुणधर्म आहेत त्यामुळे हे मानवाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे असे सांगितले जाते.
ह्या जातीच्या गाजरात असलेले औषधी गुणधर्म व घटक अनेक प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यात मदत करते. म्हणुन पुसा रुधिरा हि सुधारित वाण शेतकरी व मानवाच्या आरोग्यासाठी वरदान आहे असेच म्हणावे लागेल.
»पुसा केसर
पुसा केसर हि देखील एक सुधारित वाण आहे. ह्या जातीच्या गाजराचे वैशिष्ट्ये म्हणजे ह्या जातींचे गाजर हे इतर जातीच्या तुलनेत अधिक लाल असतात आणि खाण्यासाठी उत्कृष्ट असतात. ह्या जातीच्या गाजरच्या पाने लहान आणि मुळे हे लांब असतात. ह्या जातीच्या गाजराचे पिक हे 90-110 दिवसात तयार होते आणि एकरी 125- 150 क्विंटल पर्यंत उत्पादन देते.
Published on: 27 October 2021, 12:58 IST