Agripedia

महाराष्ट्र राज्यात असलेली विभिन्न प्रकारची भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक साधनसंपत्तीची अमाप देणगी झाडझुडपे व शेतीपिके यातुन सतत मिळत असलेला फुलारा या सर्व समृद्ध साधनसंपत्तीचा आधुनिक शास्त्रीय पद्धतीने योग्य असा उपयोग करुन शेतकऱ्यांसाठी मधमाशीपालन हा किफायतशिर शेतीपुरक जोडधंदा असून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देणारा उद्योग आहे.

Updated on 21 May, 2024 4:56 PM IST

डॉ. स्वाती गुर्वे, डॉ. महेश बाबर, प्रा. सागर सकटे

निसर्गातील कीटकांचा विचार केला तर आपल्याला फक्त पिकांना हानिकारक असणारेच किटक आठवतात. पण आपल्यासाठी मधासारखे अमृत निर्माण करणारा, परागीभवना‌द्वारे पिकांच्या उत्पन्नात २५ ते ३५ % वाढ करणारा, तसेच मेण, परागकण, राजान्न, प्रोपोलिस, मधमाशी ब्रेड, ब्रुड व मधमाशांचे विष (व्हेनम) देणारा सामाजिक, वसाहतीत निष्ठेने, निस्वार्थपने व अत्यंत शिस्तित काम करणारा किटक म्हणजे मधुमक्षिका होय. मानवास उपयुक्त अशा परोपकारी किटकाची थोरवी सांगताना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सांगितले होते की, मधमाशा जर पृथ्वीतलावरुन नष्ट झाल्या तर मनुष्य जातीसह अख्खी जिवसृष्टी पुढील चार वर्षांतच संपुष्टात येईल म्हणून अशा या सजिवसृष्टीकरीता अत्यंत उपयुक्त अशा किटकाचे संवर्धन व संगोपन करणे आज काळाची गरज आहे.

महाराष्ट्र राज्यात असलेली विभिन्न प्रकारची भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक साधनसंपत्तीची अमाप देणगी झाडझुडपे व शेतीपिके यातुन सतत मिळत असलेला फुलारा या सर्व समृद्ध साधनसंपत्तीचा आधुनिक शास्त्रीय पद्धतीने योग्य असा उपयोग करुन शेतकऱ्यांसाठी मधमाशीपालन हा किफायतशिर शेतीपुरक जोडधंदा असून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देणारा उद्योग आहे. भारतात मधमाशीपालन व्यवसायासाठी उत्तेजनपर अखिल भारतील मधपालांची संघटना म्हणजे 'ऑल इंडिया बी किपर्स असोसिएशन' स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात केंद्रिय मधमाशी अनुसंधान संस्था, पुणे तसेच खादी व ग्रामोद्योग महाबळेश्वरलाही मधुमक्षिकापालनाबर चांगले संशोधन सुरु आहे. अशाप्रकारे मधुमक्षिकापालन हा कुठलींही जागा, इमारत, विहीर, पाणी व विज यासारखी गुंतवणुक न लागणारा तसेच रोजगार निर्मितीचा उत्तम क्षमता असणारा महिला व पुरुषवर्गाला करता येणारा जोडधंदा आहे.

मधमाशांचे मानवी जीवनातील बहुगुणी महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

१) परागीभवन: मानवांना अन्न वनस्पतीपासून मिळत असले तरीही परागीभवन करण्यासाठी मधमाशा महत्वाची भुमीका बजावतात. मधमाशांच्या परागीभवनामुळे निसर्गाचा जैविक समतोल साधण्यास मदत होते. व्यवसायिक पद्धतीने मधुमाक्षिकांच्या वसाहती पिकांमध्ये फुले येणाऱ्या काळात ठेवल्यास उत्पन्नात २५ ते ३५ % वाढ होते. तसेच मधमाशांच्या परागीभवनाद्वारे मिळणारे उत्पन्न तुलनेने अधिक पौष्टिक मानले जाते. मधमाश्यांमुळे परागीभवन होत असलेले पिक म्हणजे लिंबू, संत्री, मोसंबी, पेरु, मोहरी, तीळ, सुर्यफुल, सोयाबीन, कारले, वांगी, भेंडी, मिरची, काकडी, कलिंगड, भोपळा, पडपळ, कारली, कोबी, मुळा, बिट, कांदा, लसुण, राजगिरा, पालक, तूर, मुग, उडीद, मटकी, चवळी, चिंच, चंदन, शेवगा, कवठ, कापूस, तंबाखू, गाजर व कोथिंबीर होय.

२) मध: मध हे निसर्गात सर्वात पौष्टिक अन्न मानले जाते. कारण मधामध्ये मानवी शरीराला आवश्यक असे सर्व पोषक घटक असतात. मध हा शितल मधुर, नेत्रास हितकारक, स्वर सुधारणारा, बुद्धीची धारणाशक्ती वाढवणारा खोकला, पित्त, कफ, क्षय दुर करणारा, रक्तशुद्ध करणे, पोटदुखी, मळमळ तसेच त्वचा केसांचे आरोग्य राखणारा पदार्थ आहे. मध म्हणजे कर्करोग हृदयरोग, मधुमेह, प्रतिबंध तसेच चिंताग्रस्त पणासाठी आरामदायक शक्तीवर्धक पदार्थ आहे.

३) मेण: मेण हे मधमाशांपासुन मिळणारे एक नैसर्गिक उत्पादन आहे. मेणाच्या विविध वापरांपैकी महत्वाचा उपयोग कॉस्मेटिक्स, फळे व भाज्यांचे पोस्ट हार्वेस्ट ग्लोझिंग एजेंट, सर्जिकल हाडे, मेणबत्या, टुथपेस्ट, कले, क्रेझॉन व इतरही आहेत.

४) परागकण: परागकण एक शक्तीवर्धक पदार्थ असून प्राषण केल्याने मानसिक श्रमास समर्थन मिळणे, मेंदुमध्ये रक्तप्रवाह वाढवणे, शरीरातील रक्त शुद्ध करणे, प्रजनन क्षमता सुधारणे, सुस्तपणा, तणाव कमी करणे, बजन कमी करणे व खेळाडूंना उर्जा व सामर्थ्य वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.

५) राजान्न (रॉयल जेली): राजान्न म्हणजे मधमाशांचे दुध होय. राजान्न प्राषण केल्याने बलवान राणीमाशी तयार होते. राजान्न पोटांच्या विविध आजारांवर यकृत समस्या, अन्नपचन समस्या, भुक न लागणे, थकवा, निद्रानाश वृद्धापकाळातील आजार, गरोदरपणा, खेळांडूंसाठी शक्तीवर्धक व आरोग्यवर्धक म्हणून काम करते, शितगृहाशिवाय राजान्न ५ दिवसांपर्यंत सेवन करु शकतो. वाळलेले राजान्न कॅपसुलच्या रुपाने सेवन करुन त्वचेचे व केसांचे सौंदर्य टिकवते.

६) प्रोपोलिस: प्रोपोलिस नावाच्या चिकट द्रव पदार्थाच्या सहाय्याने पोळे झाडाला चिकटवले जाते. प्रोपोलिसमुळे पोळ्याला मुंग्यांचा प्रादुर्भाव होत नाही. याचा उपयोग सौंदर्य प्रसाधने सुगंधी तेल व तुटलेली हाडे, स्नायुचा आजार व त्वचेचे आजार बरे करण्यासाठी होतो.

७) मधमाशी ब्रेड: मधमाशी ब्रेड किंवा भाकरी हे लहान अळ्या व मधमाशांसाठी लागणारा अन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. अॅनिमिया, मधुमेह, डायरिया, मुळव्याध, बी.पी., नैराश्य व मोठ्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी उपयुक्त घटक आहे.

८) मधमाशी विष: मधमाशीचे विष शरीरातील उतींना रक्त पुरवठा करण्यास उपयुक्त ठरते व शरीरातील लॅक्टिक आम्ल विरघळून स्नायू वेदना बच्ऱ्या करण्यास मदत करते. या विषाचा मुख्य उपयोग संधीवात बरा करण्यासाठी होतो

९) मधमाशीचे बुड: मध काढल्यानंतर अंडी, अळ्या, कोष म्हणजे ब्रुड होय. हे ब्रुड वृद्ध पाकळीतील आजारांवर व खेळांडुंना अतिरीक्त उर्जा पुरवण्यासाठी वापरतात.

मधुमक्षिकेत्त्या विविध जाती:

१) सातेरी माशी: या माशांच्या वसाहती झाडांच्या डोलीमध्ये, कडा कपारीच्या छोट्या गुहांमध्ये, भिंतीतील गाभारे, मुंग्यांचे वारुळ, अंधाऱ्या ठिकाणी एकाला एक असे ठरावीक अंतरावर समांतर पोळी बांधतात. सोतेरी वसाहतीपासुन प्रतिवर्षी ५ ते ७ किलो मध उत्पन्न होवू शकते. एका वसाहतीत २५ ते ३० हजार माशा असतात.
२) युरोपियन माशा: या मधमाशा झाडाच्या ढोलीत, दगडाच्या कपारीत व अंधाऱ्या ठिकाणी आढळून येत असल्याने त्यांचे कृत्रीमरीत्या पालन केले जाते. भारतात पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्रातील मराठवाड्यात यांचे पालन केले जाते या माशांचे सतत एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर स्थलांतर करणे गरजेचे असते या माशांना सातेरी माशांपेक्षा जास्त प्रमाणात अन्नसाठा लागतो. या माशांपासुन वर्षाला सरासरी २५ ते ३० किलो मध मिळु शकते.
३) आग्या माशी: महाराष्ट्रातील विदर्भात या माशांचे मोठ्याप्रमाणात पालन केले जाते. या माशा आकाराने सर्वात मोठ्या असून त्यांना रानटी माशा म्हणतात. या माशा स्वभावाने रागीट, तापट असून हल्ला केल्यास दंश खुप वेदनादायक असतो. या माशा वर्षाकाठी ८ ते ५० किलो पर्यंत मध तयार करु शकतात व मेणही भरपुर प्रमाणात तयार करतात.. ४) फुलोरी किंवा काटेरी माशी: या माशा भारतात सर्वत्र आढळून येतात. झाडाच्या फांदीला, झुडपात, काटेरी कुंपनात एकच पोळे बांधतात. उजेडात पोळे बांधत असल्याने स्थलांतर करणे व मध गोळा करण्याची प्रवृत्ती कमी असते. या माशांपासुन १ ते २ किलो मध मिळु शकते. या माशा आकाराने लहान असल्याने परागीभवनात मोठा वाटा आहे.
५) पोयाची माशी: या माशा आकराने सर्वात लहान असून झाडाच्या ढोलीत, अंधारात, जुण्या मातीच्या भिंतीत पोळे बांधतात. या माशांना नांगी नसल्याने त्या डंक मारत नाही. या माशा कमी प्रमाणात मधगोळा करत असल्या तरी परागीभवनासाठी चांगली मदत होते.

मधमाशांची वसाहत कार्य व जीवनक्रमः

मधमाशांच्या वसाहतीत राणीमाशी, कामकरी माशी व नरमाशी इ. घटक असतात.
१) राणीमाशी: एका वसाहतीत एकच राणीमाशी असून ती अन्नाच्या उपलब्धते नुसार दिवसाला २०० ते १००० अंडी घालते. तीचे आयुष्य २ ते ४ वर्ष असते. राणीगंधामुळे इतर माशा वसाहतीत राणीची उपस्थिती ओळखतात व ती नसेल तर वसाहत उडुन जाते.
२) कामकरी माशी: अंडी घातल्यानंतर २१ दिवसात कामकरी माशांचा जन्म होतो व त्या ६ ते ७ आठवडे जगतात. कामकरी माशा परागकण व मकरंद वाहून आणणे व पोळ्याचे रक्षण करणे असे सर्व कामे करतात.
३) नरमाशी: राणीने अफल अंडी घातल्यानंतर २४ तासांनी नराचा जन्म होतो. नराला नांगी नसल्याने तो कधिही डंख मारीत नाही. नराचे काम राणी सोबत संयोग करण्यापलीकडे कुठलेच नसते म्हणून संयोग झाला की कामकरी माशी नराला मारुन टाकतात.

मधुमक्षिकापालनासाठी आवश्यक साधनसामुग्री:

१ ) मधुपेटी : सातेरी माशांकरीता ISI ए टाईप व बी टाईप तर युरोपीयनसाठी लँगस्टोथ टाईप पेटीचा उपयोग होतो.
२) मधकाढणी यंत्र : सदर यंत्राद्वारे मेणाच्या चौकटी न मोडता मध काढले जाते
३) धुराडे : धुराड्याच्या वापरामुळे मधमाशा शांत होवून पेटीची देखभाल चांगली करता येते.
४) संरक्षक कपडे : मधमाशांच्या दंशापासुन वाचवण्यासाठी सरद कपडे वापरणे आवश्यक आहेत.
५) इतर साधने: चाकु, हातमोजे, मेणपत्रे, पटाशी, पोलन ट्रॅप राणी पिंजरा व स्वार्म नेट हे साधने येतोत.

मधपोळ्यातील किडी रोग व इतर शत्रुः

१) मेणकिडा: मेणकिडा मधमाशीचा प्रमुख शत्रु असुन पेटीत ५०० ते १००० अंडी घातल्यामुळे माशा पोळे सोडून जाण्याची शक्यता असते याच्या नियंत्रणासाठी पेटी नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
२) कोळी, मुंग्या, झुरळे, पाली, गोचिड यांच्या नियंत्रणासाठी पेटीच्या व स्टँडखाली पाण्याच्या वाट्या भरुन ठेवून वसाहत नेहमी स्वच्छ ठेवणे व वसाहतीचे सतत सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.
३) ग्रीन बी इटर : हे पक्षी पेटीजवळच्या झाडावर बसून येजा करणाऱ्या माशांना खातात.
४) अमेरीकन फावुल बुड हा रोग बॅक्टेरीयामुळे होत असून संसर्ग झाल्यास अळ्या कोषावस्थेपुर्विच मरतात. रोगग्रस्त अळ्यांच्या शरीरातून चिकट द्रव येवून वसाहतीचा घाण वास येतो.
५) युरोपियन फावुल बुडः हा रोग जीवाणूंमुळे होत असून संसर्ग झाल्यास अख्खी वसाहत विस्कळीत होते.
६) सॅक बुड व्हायरस : हा रोग विषाणूंमुळे होत असून रोगग्रस्त अळी कोषात जाण्यापुर्वीच मरते.
७) अॅकराईन रोग: हा रोग गोचिडांपासून होत असून मादी गोचिड तिची अंडी मधमांशांच्या श्वसननलिकेत घातल्याने श्वसनमार्गाची कोंडी होवून माशी तडफडून मरते.
८) नोसेमा रोग: या रोगाची वाढ मधमाशांच्या अन्ननलिकेत होत असून रोगाने ग्रस्त झालेल्या माशा २-३ दिवसात मरतात त्यामुळे वसाहत कमजोर होवून नष्ट होते. याच्या नियंत्रणासाठी वसाहतीची योग्यरीत्या स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

लेखक - डॉ. स्वाती गुर्वे, डॉ. महेश बाबर, प्रा. सागर सकटे 
शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, ता. जि. सातारा
वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, ता. जि. सातारा

English Summary: Beekeeping Madhumakshika A natural boon to farmers
Published on: 21 May 2024, 04:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)