Agripedia

सोयबीन पिकांमध्ये खोड पोखरणाऱ्या किडींमध्ये प्रामुख्याने खोडमाशी आणि चक्रीभुंगा यांचा प्रादुर्भाव अधिक होत असतो. सध्या इतर किडींच्या तुलनेत या दोन किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे सुमारे ३५ टक्क्यापर्यंत तर खोडमाशी मुळे ६० ते ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते.

Updated on 04 August, 2020 6:56 AM IST


सोयबीन पिकांमध्ये खोड पोखरणाऱ्या किडींमध्ये प्रामुख्याने खोडमाशी आणि चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव अधिक होत असतो. सध्या इतर किडींच्या तुलनेत या दोन किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे सुमारे ३५ टक्क्यापर्यंत तर खोडमाशी मुळे ६० ते ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे या किडींचे वेळीच योग्य नियोजन करने पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महत्वाचे ठरते. सोयाबीन शिवाय मूग, उडीद, चवळी, तूर, भुईमूग, मिरची, कारली इत्यादी पिकावरही चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव होतो.

खोडमाशी :

प्रादुर्भावाची वेळ : या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो.

प्रादुर्भावाची लक्षणे : खोडमाशीचा प्रादुर्भाव पीक लहान असतानाच सहजपणे ओळखू येतो. या किडीच्या प्रौढ माशा चकचकीत काळ्या रंगाच्या असतात.

सोयाबीनचे रोप लहान असताना म्हणजे १५ ते २० दिवसांच्या आसपास जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळल्यास त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता असते. असा शेंडा मधोमध कापल्यास आतमध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही. शेवटी फक्त प्रौढ माशी निघून गेलेले छिद्र फांदीच्या खोडावर दिसते.

चक्री भुंगा :

प्रादुर्भावाची वेळ : - या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनचे पीक साधारपणे २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो.

प्रादुर्भावाची लक्षणे : शेतात फिरताना झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेले दिसते. पान फक्त सुकलेले असेल तर चक्रीभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते, तर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असते तर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी दिलेल्या अंड्यातून लवकरच अळी निघण्याची स्थिती असेल. या किडीचा प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा असतो. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश ते अर्धा भाग काळया रंगाचे असतात. अंडी फिकट पिवळसर व लांबट आकराची असतात. अंडयातून ३ ते ४ दिवसानी अळी बाहेर पडते. लहान अळी पांढऱ्या रंगाची आणि पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते. अंडयातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेच्या वरील भाग सुकून नंतर वाळतो. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात व त्या पूर्ण भरत नाहीत. तसेच पीक काढणीच्यावेळी खापा केलेल्या जागून खोड तुटून पडते, त्यामुळे देखील नुकसान होते.

व्यवस्थापन :

१)नत्रयुक्त खतांचा समतोल वापर करावा.

२)पिकात हेक्टरी 20 ते 25 पक्षीथांबे उभारावेत.

३)खोडमाशी, चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच 5% निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी.

४)किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तर पुढील रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

 

किडी

कीटकनाशके

प्रमाण/१० लि. पाणी

चक्री भुंगा (गर्डल बिटल)

ट्रायझोफॉस ४० प्रवाही किंवा

 

इथोफेनप्रॉक्स १० टक्के प्रवाही किंवा

 

लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ टक्के प्रवाही

 

१६ मि.लि.

 

 

२० मि.लि.

 

 

 

६ मि.लि

खोडमाशी (स्टेम फ्लाय)

ट्रायझोफॉस ४० प्रवाही किंवा

 

क्लोरपायरीफॉस २० प्रवाही किंवा

 

थायामेथोक्झाम २५ टक्के प्रवाही किंवा

 

फोरेट १० जी

(जमिनीतून देण्यासाठी)

 

१० मि.लि

 

 

२० मि.लि

 

 

२ ग्रॅम

 

 

 

१० किलो/हे

 

टीप - वरील कीटकनाशकांची मात्रा साध्या पंपासाठी आहे.

 

लेखक

खुशाल जवंजाळ

वरीष्ठ संशोधन सहकारी

डॉ. पं.दे.कृ.वी., अकोला

मो.नं. ८५३०८८७६९६

 

सुरज कुमरे

वरीष्ठ संशोधन सहकारी

डॉ. पं.दे.कृ.वी., अकोला

 

गजानन चोपडे

एम एस्सी किटकशास्त्र

 

English Summary: Be careful! Infestation of unripe weevils growing on soybeans
Published on: 27 July 2020, 07:34 IST