डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या "ज्वारी संशोधन केंद्रास राष्ट्रीय स्तरावरील '' उत्कृष्ठ संशोधन केंद्र '' पुरस्कार जाहीर!
अखिल भारतीय समन्वयीत ज्वारी संशोधन प्रकल्प व अखिल भारतीय तृणधान्य संशोधन संस्था , हेद्राबाद द्वारे गौरव!
अकोला : दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी संपन्न झालेल्या अखिल भारतीय समन्वयीत ज्वारी संशोधन प्रकल्पाच्या ५२ व्या आढावा बैठकीत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील ज्वारी संशोधन केंद्रास भरीव कामगिरी साठी '' उत्कृष्ठ संशोधन केंद्र '' पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदर पुरस्कार हा ज्वारी केंद्रातील मागील काळातील भरीव व उत्कृष्ठ संशोधना बद्दल, अखिल भारतीय समन्वयीत ज्वारी संशोधन प्रकल्प व अखिल भारतीय तृणधान्य संशोधन संस्था , हेद्राबाद यांच्या वतीने देण्यात आला.
सदर आढावा बैठकीस आदरणीय डॉ. त्रिलोचन महापात्रा, महानिर्देशक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली तसेच डॉ. टी. आर. शर्मा , उपमहानिर्देशक व डॉ. आर. के. सिंग , सहायक महानिर्देशक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. सदर प्रसंगी बोलतांना आदरणीय डॉ. त्रिलोचन महापात्रा, महानिर्देशक यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांचे सह ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. रामेश्वर घोराडे आणि त्यांच्या संशोधन चमूचे अभिनंदन करून भविष्य कालीन कार्याकरिता शुभेच्या दिल्या.
सदर पुरस्कार या केंद्रास याआधी सुद्धा सन २०१४ ला प्राप्त झालेला आहे हे विशेष.
महत्वाचे म्हणजे ज्वारी संशोधन केंद्राने आतापर्यत एकूण १४ विविध संकरित व सरळ वाण राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर प्रसारित केले असून या पिका संबंधी संशोधन तंत्रामध्ये विविध शिफारशी दिल्या आहेत. या केंद्राद्वारे प्रसारित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. सोबत या केंद्राने आतापर्यत एकूण १० विविध वाणाचे शेतकरी हक्क प्रसारण समिती द्वारे नोंदणी केली आहे. संशोधना मध्ये एकूण २० वेगवेगळ्या जनुकीय वंशाची (जेनेटिक स्टॉक्स) नोंदणी राष्ट्रीय स्तरावर पादप (एन. बी. पी. जी. आर.) द्वारे करण्यात आली आहे. सदर केंद्राने मा.कुलगुरू, डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनात विस्तार क्षेत्रात भरीव कामगिरी म्हणून खारपण पट्यात मोठ्या प्रमाणात प्रात्याक्षिकांचे आयोजन करून
रब्बी हंगामा मध्ये स्वास्थवर्धक, पशुधनपूरक तसेच वातावरण बदलास समरस होणाऱ्या ज्वारी पिकाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तसेच या केंद्राद्वारे वेळोवेळी सातत्याने प्रथम रेषीय प्रात्याक्षिकांचे आयोजन करून नवनिर्मित वाणाचे द्वारा उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. सोबतच या केंद्र द्वारा महत्त्वाच्या आदिवासी उपयोजने अंतर्गत मेळघाट मधील धारणी येथे प्राथमिक धान्य प्रक्रिया केंद्राची उभारणी करून दुर्घम भागातील आदिवासी करीत आर्थिक सबळीकरण करण्यासाठी प्रयत्न राबविले आहे.
सदर उल्लेखनीय कार्यासाठी मा. डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे सातत्याने मार्गदर्शन तथा प्रोत्साहन लाभले तसेच डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. डॉ. रामेश्वर घोराडे यांनी ज्वारी संशोधन केंद्रातील संपूर्ण चमूचे वतीने कळविले आहे. सदर पुरस्कार प्राप्ति बद्दल संपूर्ण विद्यापीठ परिवारात अतिशय आनंदाचे वातावरण आहे.
Published on: 01 May 2022, 06:16 IST