Agripedia

स्वत: मानव, त्याने पाळलेले प्राणी, वनस्पती, पिके आणि नानाविध कृषी उत्पादने, बांधकामात, घरात आणि अन्यत्र वापरायचे लाकडी साहित्य, कापड,

Updated on 21 February, 2022 3:18 PM IST

स्वत: मानव, त्याने पाळलेले प्राणी, वनस्पती, पिके आणि नानाविध कृषी उत्पादने, बांधकामात, घरात आणि अन्यत्र वापरायचे लाकडी साहित्य, कापड, वह्या-पुस्तके, कागदी साहित्य इत्यादींना उपद्रव करून मानवी अर्थव्यवस्थेचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही सजीवाला पीडक म्हणतात. वनस्पतींची पाने, फुले व मुळे कुरतडणाऱ्या, बागांची नासधूस करणाऱ्या, शेतातील पिकांची तसेच साठवून ठेवलेल्या अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या कीटकांचा आणि कीटकांच्या अळ्यांचा सामान्यपणे कीटक पीडक किंवा सुटसुटीतपणे कीड असा उल्लेख केला जातो.

जैविक कीड नियंत्रण: काही प्रकार

किडींना नष्ट करण्यासाठी विषारी रसायनांचा वापर केला जातो. परंतु अशी विषारी रसायने अतिप्रमाणात वापरल्यामुळे पर्यावरणातील हवा, पाणी, मृदा आणि अन्न या घटकांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन मनुष्याचे मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी कीड नियंत्रणाच्या विविध जैविक पद्धतींचा विकास झाला आहे.

किडींवर पोसणाऱ्या अथवा अन्य नैसर्गिक शत्रूंचा वापर :

(१) भाजीपाल्यांवर आणि पिकांवर पडणारा मावा म्हणजे मृदु त्वचेचा एक कीटक आहे. त्याचे प्रजनन अनिषेकजनन (पहा: अनिषेकजनन) पद्धतीने होत असल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत जाते. ‘लेडी बर्ड बीटल’ या चित्रांग भुंगेऱ्याच्या अळ्या अतिशय खादाड असून त्या एकामागून एक मावा खातात आणि मावा कीटकांची संख्या प्रभावी रीत्या नियंत्रणाखाली आणतात.

२) हरभऱ्याच्या पिकाला घाटे अळी या हिरव्या रंगाच्या सुरवंटांची कीड लागते. कुंभारीण माशी या अळ्यांना ठार न करता नांगीने दंश करून बेशुद्ध करते आणि मडक्यासारख्या घरट्यात अनेक घाटे अळ्या ठासून भरते. त्यातील घाटे अळीच्या त्वचेखाली कुंभारीण माशी एकेक अंडे घालते. कालांतराने कुंभारीण माशीने घातलेल्या अंड्यातून तिची अळी बाहेर पडते आणि घाटे अळ्यांना खाऊन मोठी होते. तिची वाढ आणि विकास होऊन कोशावस्थेनंतर नव्या पिढीतील कुंभारीण माशी घरट्यातून बाहेर पडते. अशा प्रकारे एक कुंभारीण माशी मोठ्या प्रमाणात घाटे अळ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवते.

 

किडींना रोगग्रस्त करण्याचा मार्ग :

कीड ही देखील सजीव असल्यामुळे अन्य सजीवांप्रमाणे केव्हा तरी रोगग्रस्त होत असते. तिला आजारी पाडण्यास कारणीभूत असलेले सूक्ष्मजीव मिळवून ते कीड लागलेल्या ठिकाणी फवारले तर किडीला रोगाची लागण होते आणि ती मरते. उदा., कोबीवर आणि सफरचंदावर जिप्सी पतंगांच्या अळ्या असतात. या अळ्यांच्या संख्येवर नियंत्रण राखण्यासाठी बॅक्युलो विषाणूंची फवारणी करतात.

 

कीड प्रतिरोधक जातींचा वापर :

पिकांच्या काही जातींमध्ये विशिष्ट किडींविषयी अथवा रोगांविषयी प्रतिकार शक्ती असते.

कृषी उत्पादनात पिकांच्या प्रतिकारक्षम जातींची लागवड केल्यास किडीचा प्रश्न उद्भवत नाही. एखादया भागातील सर्वच शेतकऱ्यानी या पद्धतीचा अवलंब केला तर ती विशिष्ट कीड त्या भागातून हद्दपार होऊ शकते. ज्वारीच्या वसंत–१ (गिडगॅप) या वाणाची निवड केली तर एरवी ज्वारीच्या पिकाचे मोठे नुकसान करणाऱ्या मिज माशी या कीटकाचे उच्चाटन करता येते. वसंत ज्वारी लवकर फुलोऱ्यावर येते. मिज माशीचा अंडी घालण्याचा हंगाम उशिरा सुरू होतो व पीक बचावते. मात्र, त्यासाठी त्या भागातील सर्वच शेतकऱ्यानी वसंत–१ या ज्वारीच्या जातीचे पीक घेणे आवश्यक असते.

कामगंधाचा (फेरोमोनांचा) वापर : कामगंध म्हणजे नरांनी मादयांना आणि माद्यांनी नरांना आकर्षित करण्यासाठी स्रवलेली विशिष्ट गंधांची रसायने. निसर्गात या गंधांनुसार नरमाद्यांच्या जोडया जमत असतात. प्रयोगशाळेत या प्रकारची कृत्रिम रसायने तयार करता येतात. घरमाश्यांना मस्का डोमेस्टिका असे शास्त्रीय नाव आहे. त्यांना आकर्षित करण्याच्या हेतूने प्रयोगशाळेत तयार केलेल्या कृत्रिम रसायनाला ‘मस्काल्यून’ असे नाव आहे. अशा कामगंध पिंजऱ्याचा (फेरोमोन्स ट्रॅप) वापर करून कीटकांच्या नरांना किंवा माद्यांना एकत्रित आणता येते. मर्यादित जागेत एकत्र जमलेल्या या कीटकांना पूर्वी माफक प्रमाणात कीटकनाशक रसायनाने मारले जात असे. अलीकडच्या काळात त्यांना मारून संपविण्याऐवजी त्यांच्यावर किरणोत्सर्गाचा मारा करून त्यांची प्रजननक्षमता नष्ट करतात आणि त्यांना पुन्हा हवेत मोकळे सोडतात. त्यांच्याबरोबर पर्यावरणातील सामान्य जोडीदाराच्या जोड्या जमतात. या जोड्या प्रजननक्षम नसतात. त्यामुळे त्यांची नवी पिढीच जन्माला येत नाही. परिणामी त्यांची संख्या खूपच घटते. घरमाशीसारख्या स्र्कूवर्म या माशीच्या अळ्या जनावरांच्या शरीरावर होणाऱ्या जखमांमध्ये अंडी घालतात आणि त्यांच्या अळ्या त्या जखमांमध्ये वाढतात. अमेरिकेत किरणोत्सारांचा मारा केलेल्या त्या कीटकांचा वापर करून त्यांचे निर्मूलन करण्यात यश आले आहे.

संमिश्र नियंत्रण पद्धती :

पूर्णपणे रासायनिक पद्धतीने कीड नियंत्रण करताना मोठ्या प्रमाणावर विषारी रसायनांचा वापर करावा लागतो. यातून गंभीर स्वरूपाचे प्रदूषण होते. त्याचे दुष्परिणाम मनुष्यालाही भोगावे लागतात. हे संकट टाळण्यासाठी कीड नियंत्रणाच्या रासायनिक पद्धतीला जैविक पद्धतीची जोड देऊन संमिश्र पद्धतीचा अवलंब करणे फायदयाचे ठरते. या पद्धतीत प्रथम कीडग्रस्त क्षेत्रात कमी क्षमतेच्या कीडनाशक रसायनाचा वापर करून किडीची संख्या आटोक्यात आणतात. अशा रीतीने विरळ झालेल्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्या एखादया नैसर्गिक शत्रूची मदत घेतात. ट्रायकोग्रॅम नावाचा एक कीटक अनेक किडींचा नैसर्गिक शिकारी शत्रू म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, कीडनाशक रसायनाचा वापर करताना त्या कीडनाशकाची मात्रा ट्रायकोग्रॅम कीटकाला हानी पोहोचविणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. 

 

 जैविक शेतकरी 

शरद केशवराव बोंडे. 

bondes841@gmail.com 

९४०४०७५६२८

English Summary: Also will bio insect and pest management
Published on: 21 February 2022, 03:18 IST