Agripedia

महावितरण कंपनी सोयीस्कररीत्या कंपनीमध्ये चालू असलेली दरवर्षीची 12000 कोटी रुपयांची चोरी व भ्रष्टाचार लपविण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचा

Updated on 05 January, 2022 2:47 PM IST

महावितरण कंपनी सोयीस्कररीत्या कंपनीमध्ये चालू असलेली दरवर्षीची 12000 कोटी रुपयांची चोरी व भ्रष्टाचार लपविण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचा वीज वापर दुप्पट दाखवित आहे व शेतकऱ्यांना नाहक बदनाम करून शेतकरी व राज्य सरकार या दोघांचीही लूट करीत आहे.

 त्यामुळे राज्यातील सर्व शेती पंप वीज ग्राहकांनी प्रथम आज अखेरची वीजबिले व थकबाकी दुरुस्तीसाठी तक्रार अर्ज दाखल करावेत व दुरुस्ती झाल्यानंतर दुरुस्तीनुसारच सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी राज्यातील सर्व शेतीपंप वीज ग्राहकांना केले आहे.

 शेतीपंप वीज विक्री हे वितरण गळती, चोरी व भ्रष्टाचार लपविण्यासाठी अत्यंत सोयीस्कर ठिकाण आहे. शेतीपंपांचा वीजवापर ३१% व वितरण गळती १५% आहे, असा दावा कंपनीने केला आहे. प्रत्यक्षात शेती पंपांचा खरा वीजवापर फक्त १५% आहे आणि वितरण गळती किमान ३०% वा अधिक आहे.

याची या कंपन्यांना व राज्य सरकारमधील कांही संबंधितांना संपूर्ण माहिती आहे पण ती लपविली जात आहे. मीटर असलेल्या शेती पंपापैकी ८०% पंपांचे मीटर्स बंद आहेत. राज्यातील फक्त १.४% शेतीपंपांचे मीटर रीडिंगप्रमाणे बिलींग होत आहे. उर्वरीत सर्व ९८.६% शेतीपंपांचे बिलींग गेल्या १० वर्षांपासून दरमहा सरासरी प्रति अश्वशक्ती १०० ते १२५ युनिटस या प्रमाणे केले जात आहे. 

हे बिलिंग किमान दुप्पट वा अधिक आहे. त्यामुळे बिले, वीजवापर व थकबाकी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. दुप्पट बिलिंगवर तितकाच दंड व व्याज लागल्याने एकूण थकबाकी कागदोपत्री चौपट झालेली आहे. शेतीपंपाची थकबाकी ५० हजार कोटी रु. दाखविली जात आहे. 

प्रत्यक्षात राज्य सरकारनेच जाहीर केलेल्या सवलत योजनेप्रमाणे खरी बिले निश्चित करून ५०% सवलत दिली तर अंदाजे ६००० कोटी रु. इतकीच रक्कम जमा होणार आहे. तथापि या योजनेत ५ वर्षांचे व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे व्याजासह एकूण वसूलीपात्र थकबाकी कमाल ८ ते ९ हजार कोटी रु. होऊ शकते.

अतिरिक्त वीज वितरण गळती म्हणजेच चोरी व भ्रष्टाचार अशी स्पष्ट व्याख्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानेच केलेली आहे. त्यानुसार दरवर्षी शेतीपंप वीज वापराच्या नावाखाली अतिरिक्त १५% वितरण गळती म्हणजे चोरी व भ्रष्टाचार या मार्गाने अंदाजे १२००० कोटी रु. हून अधिक रकमेची लूट कांही मोजके ग्राहक व संबंधित कर्मचारी करीत आहेत. 

राज्यातील सर्व शेती पंप वीज ग्राहकांनी स्वतःची व सरकारची होणारी लूट रोखण्यासाठी बिले व बोगस थकबाकी विरोधात तक्रार अर्ज दाखल करावेत. त्यामुळे सर्व शेती पंप वीज ग्राहकांनी या बिले व थकबाकी दुरुस्ती मोहीमेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रताप होगाडे यांनी केले आहे.

𝐄-शेतकरी अपडेट्स

English Summary: Agriculture pump use under 12000 koti corruption
Published on: 05 January 2022, 02:47 IST