Agripedia

आजपर्यंत आपण अनेक बुरशीजनीत रोगांच्या नियंत्रणासाठी विविध प्रकारची रासायनिक बुरशीनाशके वापरली असतील.

Updated on 28 September, 2021 4:29 PM IST

जसे त्यामधील आंतरप्रवाही असतील,तर काही स्पर्शशील पण या शत्रूबुरशीवर फ़क्त रासायनिकच बुरशीनाशके उपाय आहेत का? तर नाही..

निसर्गाचा एक महत्वाचा नियम आहे 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजे कोणत्याही जीवाची पर्यावरणातील संख्या नियंत्रित राहण्यासाठी,त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी दुसरा जीव हा असतोच. त्याप्रमाणे पिकास अपाय करणाऱ्या बुरशी,जिवाणू,विषाणू,किटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी निसर्गाने सोय केलेलीच आहे. असे फायदेशीर घटक शेतकऱ्यांना उपयोगी ठरतात व पर्यावरण पूरक व्यवस्थापन करण्यास मदत करतात.

 

त्यांपैकीच एक म्हणजे ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी होय.

 

सरासरी सर्वच पिकामध्ये सुरवातीपासून मूळकुज, खोडकुज,मर,कॉलररॉट तर हे रोग मातीजणीत बुरशीरोग फ़ायटोप्थेरा,फ्युज्यारिअम,रायझोक्टेना,व्हर्टिसिलीअम यांसारख्या अपायकारक बुरशीमुळे पिकास होतात.अशा अपायकारक बुरशींना नियंत्रीत करण्यासाठी ट्रायकोग्रामा एक पर्यावरण पूरक व प्रभावी उपाय आहे. ट्रायकोग्रामा पिकास अपायकारक बुरशीवर वाढते.शत्रूबुरशीची वाढ थांबवते. पिकास अपाय होण्याआधी शत्रूबुरशी वर नियंत्रण मिळवले जाते.

 

ट्रायकोडर्मा काम कसे करते:-

जेव्हा ट्रायकोडर्माच्या संपर्कात एखादी शत्रूबुरशी येते.तेव्हा ट्रायकोडर्मा आपले मायसेलिअम(बुरशीचे वाढणारे सुक्ष तंतू) ते शत्रू बुरशीभोवती गुंडाळतात. पिकाच्या मूळ क्षेत्रात संरक्षण कवच तयार करतात.तसेच ग्लायटॉक्सिन व व्हीरीडीन नावाची रसायने स्त्रावित करतात.जे अनेक शत्रूबुरशिंना मारक ठरते. शत्रूबुरशीच्या वाढीस अटकाव होतो.त्यासोबत ट्रायकोडर्मा हे मातीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी फायदेशीर आहे.

 

वापरावे कसे:-

ट्रायकोडर्मा हे आपण बीजप्रक्रिया, माती प्रक्रिया, झाडांच्या बुंध्याभोवती द्रावणाची आळवणी,पिकांवर फवारणीद्वारे आणि सेंद्रिय खत निर्मितीकरिता वापरू शकतो.

बीजप्रक्रिया:- बीजप्रक्रिया करण्यासाठी ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बियाण्यास वापरावे. बियाणे स्वच्छ फरशी, प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर ४ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळावे. बियाणे ओलसर होईल, इतपत पाणी शिंपडून संवर्धन हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून त्वरित पेरणी करावी.

चांगल्या कुजलेल्या 25 ते 30 किलो शेणखतासोबत 1-2.5 किलो ट्रायकोडर्मा पावडर एक एकर क्षेत्रासाठी वापरू शकतो.

फळझाडासाठी 10 ते 15 ग्राम ट्रायकोडर्मा पावडर एक लिटर पाण्यामध्ये मिसळून झाडांच्या बुंध्यात पसरावे व मातीने झाकुन घ्यावे.

 महत्वाचे:-

ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक बुरशीनाशकांसोबत करू नये.

ट्रायकोडर्मा सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या व थंड जागेत साठवावे.

 

एकात्मिक रोग व्यवस्थापनातील महत्व:-

पिकास रोग होण्याआधीच प्रतिबंध होतो. मुळाभोवती संरक्षण कवच तयार झाल्यामुळे अपायकारक बुरशी पिकापर्यंत पोहचू शकत नाहीत

बुरशी कवकांचा वेळीच बंदोबस्त होतो. पिकास सुरवातीपासून सर्व वाढ अवस्थामध्ये संरक्षण मिळते.

ट्रायकोडर्मा जैविक पदार्थ असल्याने त्याचा जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही.उलट सेंद्रिय पदार्थ कुजवण्याची क्षमता असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.

सर्व पीकामध्ये येणाऱ्या मर,मूळकूज,खोडकुज या मातीजनीत बुरशींवर प्रभावी नियंत्रण मिळते. 

ट्रायकोडर्माचा वापर हा प्रतिबंधक उपायांमध्ये येतो. त्यामुळे पुढे बुरशीनाशकांवर होणाऱ्या खर्चात कपात होते.

म्हणूनच कोणत्याही पीक लागवड करण्याआधी ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया नक्की करावी.

 

शशिकांत वाघ,जळगांव

 रामभाऊ जाधव,उंब्रज

 शरद बोंडे अचलपूर

 

English Summary: adavantages and importanace of tricodarma fungi
Published on: 28 September 2021, 04:29 IST