Agripedia

रोजच्या व्यवहारात स्वयंपाक, आंघोळ, धुणीभांडी आदींसाठी पाण्याची गरज आहे.

Updated on 10 May, 2022 5:02 PM IST

रोजच्या व्यवहारात स्वयंपाक, आंघोळ, धुणीभांडी आदींसाठी पाण्याची गरज आहे. परंतू पाणी वापराच्या पद्धतीमधील बदलाने पाणी कमी अधिक लागते मनुष्याला बादली वापरून आंघोळ करण्यासाठी २० लिटर तरी पाणी लागते परंतू फवारा (शॉवर) वापरल्यास यापेक्षा दुप्पट पाणी लागते.

पाण्याच्या नियोजन योजनांचा विचार करताना त्या फायदेशीर असाव्यात असे धोरण असते कोणकोणत्या मार्गांनी जास्तीत जास्त पाण्याचे शक्य तितके नियोजन केले जाईल व त्याचा कसा उपयोग होईल यावरून जलसंधारणाच्या कार्यक्षमतेचे मोजमाप होते, काही प्रकल्प मुख्यत: अवर्षण, महापूर, पाण्यामुळे घातक जंतुप्रसार किंवा इतर धोके शक्य तो टाळण्याकरिता आखले जातात. अशा योजना आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होतीलच असे नाही. पावसाळ्यात पुराचे जे पाणी नद्यांतून वाहत जाऊन समुद्रास मिळते ते पूर्णपणे वाया जाते. हे पुराचे पाणी थोपविणारे प्रकल्प किंवा पुराचे पाणी प्रथम जमिनीत मुरवून नंतर ते दुष्काळी प्रदेशांना उपलब्ध करून देणारे प्रकल्प आर्थिक दृष्ट्या खर्चिक असले, तरी अत्यावश्यक आहेत.

पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, मानवी आरोग्यासाठी, वनस्पतिसंवर्धानासाठी, अन्नधान्यसमृद्धीसाठी व खाद्यनिर्मितीसाठी, मत्स्योत्पादनासाठी, सिंचाईसाठी, उद्योगधंद्यांच्या विकासासाठी, विद्युत् निर्मितीसाठी व इतर करमणुकीच्या किंवा मनोरंजनाच्या साधनांसाठी पाण्याचा पुरवठा नियमितपणे करणारे प्रकल्प आयोजित करणे, हे जलसंधारणाचे मुख्य उद्दिष्ट असावे लागते.

भूमिजल, निसर्गनिर्मित तळी, नद्यांतील डोह, दलदलीचे प्रदेश, खोलगट भागात साठलेले पाणी हे सर्व जलसंधारणाचे नैसर्गिक प्रकार आहेत. बर्फाच्या रूपाने झालेला पाण्याचा संचय विशिष्ट काळात मिळण्यासारखा आहे. जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यासारखे त्याचेही नियंत्रण करावे लागते.

भूमिजल हे जलसंधारणाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. धरणे बांधून करावयाच्या जलसंचयापेक्षा भूमिगत जलसंचय फार कमी खर्चाचा असतो. तो संचय करण्याचा व्यापही फार नसतो. बाष्पीभवनाने होणारी तूटही यात अत्यल्प असते. झऱ्यांच्या किंवा पाझरांच्या रूपाने हे पाणी बाहेर पडून नदी व नाले यांचा प्रवाह वर्षाचे बाराही महिने टिकवून ठेवते. ह्याच भूमिगत पाण्यामुळे सरोवरांचे व विहिरींचे झरे सर्व ऋतूंत जिवंत राहतात.

हिमप्रदेशातील बर्फ वितळून येणाऱ्या पाण्याचा बराचसा भाग जमिनीत मुरतो. तसेच भूपृष्ठावरील जलाशयांचे पाणी, नद्यांच्या डोहातील पाणी, दलदलीच्या प्रदेशातील पाणी सारखे जमिनीत मुरत राहते आणि त्यामुळे भूमिजलाच्या साठ्यात भर पडते असते. पावसाचे पाणी नैसर्गिक रीत्या जमिनीत मुरते, त्यापेक्षा ते अधिक प्रमाणात मुरेल अशा भूमिजलाचा साठा वाढेल या उद्देशाने अनेक उपाय योजिले पाहिजेत. हे उपाय कमी खर्चाचे असतात. गटागटाने त्यांचा अवलंब करणे शक्य हाते. वने व झाडी यांचाही याकामी उपयोग होतो.

जमिनीवरून पावसाचे पाणी वाहून जाण्यास झाडाच्या मुळांमुळे व पालापाचोळ्यामुळे प्रतिरोध होतो. त्यामुळे ते जमिनीत मुरणे सुलभ होते. ज्या पाणलोट क्षेत्रात वने व झाडी असते तेथील मृदा मुबलक प्रमाणात पाणी मुरू देईल अशाच स्वरूपाची असते. झाडीमुळे जमिनीची धूप होत नाही. वनसंवर्धनाने भूमिगत पाण्याचे साठे वाढविता येतात ते ह्याच कारणामुळे. माळजमिनीवरून पावसाचे पाणी शीघ्र गतीने इतरत्र वाहून जाते, तेही जमिनीत जास्त प्रमाणात मुरावे असे उपाय योजणे शक्य आहे.

पाणी वाहून नेणाऱ्या ओहळात बंधारे किंवा इतर अडथळे घालून प्रवाहाचा वेग कमी करतात येतो, त्यामुळे पाणी जमिनीत मुरण्यास जास्त वेळ मिळतो, तसेच डोंगराच्या पायथ्याशी आणि इतरत्र असलेल्या जास्त उताराच्या माळाच्या व शेतीच्या जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी केल्यास ते जास्त प्रमाणात जमिनीत मुरू शकते. यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे जमिनीच्या नैसर्गिक उताराच्या उलट दिशेकडे टप्प्याटप्प्यांनी विशिष्ट प्रमाणात उतार देणे, त्यामुळे मूळ उतारावरून खाली आलेले पाणी स्थिरावून जास्त उताराच्या दिशेने सावकाशपणे वाहू लागते. पाण्याच्या वाहण्याच्या नैसर्गिक मार्गापेक्षा अशा रीतीने काढलेल्या कृत्रिम मार्गाची लांबी अधिक असते. त्यामुळे जमिनीवरील पाण्याची गती मंदावते, ते अधिक काळ जमिनीवर रेंगाळते व हळूहळू अधिक प्रमाणात जमिनीत मुरू लागते. जमिनीची धूप थांबविण्यासाठी जे समपातळी बांध घालतात त्यामुळेही पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते.

टयूबवेल्सच्या साहाय्याने भूकवचातील पाणी काढून शेतीसाठी वापरल्यास पावसाचे वाहून जाणारे पाणी जास्त प्रमाणात जमिनीत झिरपू व साठू शकते व बाष्पीभवनही कमी होते पावसाच्या पाण्याचे जमिनीवरून वाहणारे ओहोळ हे पावसाचा जोर, जमिनीची खोली, मातीचा घट्टपणा, भूपृष्ठावरील मातीचा प्रकार, वनस्पतींच्या आच्छादनाचा प्रकार यांसारख्या बाबींवर अवलंबून असतात. जमीन वनस्पतींनी आच्छादलेली असल्यास पर्जन्यनिर्मित ओहळांची गती मंदावते, त्यामुळे जमिनीवरील मातीचे कण सैल होत नाहीत, जमिनीची छिद्रे बुजत नाहीत किंवा तिची धूप होत नाही.

उपलब्ध झालेले पाणी वाया न जाईल अशी दक्षता घेणे, पाणलोट क्षेत्रांत झाडझाडोरा वाढविणे, बाष्पीभवनामुळे येणारी पाण्याची तूट कमी करण्यासाठी जलाशयांचा विस्तार कमी ठेवणे, जलाशयांवर वाऱ्यांचे झोत कमी प्रमाणात वाहतील अशी तरतूद करणे. पाणलोट क्षेत्रातील झाडी व पालापाचोळा बाष्पीभवन बरीच कमी करतात. कालव्यातून झिरपणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कालव्याच्या जलरोधक पदार्थाचे अस्तर करतात.

डोंगरी प्रदेशात पुष्कळ लहानलहान पण बारमाही वाहणारे प्रवाह असतात. या पाण्यावर शेती किंवा बागाईत करता येते. पाण्याचा ह्या प्रकारे केलेला उपयोग जलसंधारणाचा एक सुलभ मार्ग आहे. याच धोरणाने जलविद्युत निर्मितीकरिता मोठया प्रमाणावर वापरलेल्या पाण्याचा शेतीकरिता किंवा पुन्हा जलविद्युत् निर्मितीकरिता उपयोग करतात, अणुकेंद्रीय ऊर्जानिर्मितीनंतर बाहेर आलेले पाणीही योग्य काळजी घेतल्यास पुन्हा वापरण्याजोगे असते. यामुळे जलसंधारण करणे काळाची गरज ठरत आहे.

 

संकलन : प्रविण सरवदे, कराड

English Summary: 10th may water conservation day special
Published on: 10 May 2022, 04:58 IST