करवंदापासून बनवा मूल्यवर्धीत पदार्थ

30 July 2019 09:29 AM


करवंद हे एक डोंगराळ फळपिक असून त्यात असलेले औषधी गुणधर्म व उच्च पौष्टिकता यामुळे त्याची व्यावसायिकदृष्ट्या लागवड करणे चालू झाले आहे. करवंदाच्या फळामध्ये तंतूमय पदार्थ (1.6 ग्रॅम प्रति 100 ग्रॅम), पोटॅशियम (81.27 मिली ग्रॅम प्रति 100 ग्रॅम), आयर्न (10.33 मिली ग्रॅम प्रति 100 ग्रॅम), झिंक (3.26 मिली ग्रॅम प्रति 100 ग्रॅम), कॉपर (1.92 मिली ग्रॅम प्रति 100 ग्रॅम), मैंगनीज (0.3 मिली ग्रॅम प्रति 100 ग्रॅम) व क-जीवनसत्व (21.27 मिली ग्रॅम प्रति 100 ग्रॅम) हे भरपूर प्रमाणात असते.

करवंदाच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारात मोठी मागणी आहे. सर्वसाधारणपणे करवंदाची मागणी पाहता त्यावरील प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास डोंगराळ भागातील अनेक लोकांना रोजगार मिळून आर्थिक नफा होऊ शकतो.


करवंदांचा जॅम

 • पक्व करवंदांपासून जॅम तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली ताजी फळे निवडून 1 मि.मि. मेशच्या स्टेनलेस स्टील चाळनीच्या सहाय्याने लगदा (गर) काढून घ्यावा.
 • 1 किलो करवंदाच्या लगद्यामध्ये प्रथम 1 किलो साखर आणि 5 ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून घ्यावे.
 • हे मिश्रण मंदाग्नीवर घट्ट (एकूण विद्राव्य घटक कमीत कमी 68.5 टक्के) होईपर्यंत उकळावे.
 • तयार झालेला जाम निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बरणीमध्ये भरून त्याची साठवणूक थंड व कोरड्या जागी करावी.


करवंदाची जेली

 • जेली तयार करण्यासाठी प्रथम कच्ची करवंदे धुवून घ्यावीत.
 • करवंदे व पाणी 1:1 या प्रमाणात घेवून ती फुटेपर्यंत शिजवावीत.
 • शिजवल्यानंतर करवंदाचा निव्वळ रस कपड्यातून गाळून घ्यावा.
 • नंतर फळाच्या रसात 1:3 या प्रमाणत साखर मिसळून मिश्रण घट्ट (एकूण विद्राव्य घटक कमीत कमी 67.5 टक्के) होईपर्यंत उकळावे.
 • जेली जास्त काळ टिकून राहण्यासाठी त्यात 250 मिलीग्रॅम प्रति किलो सोडियम बेंझोएट हे परिरक्षक जेली उकळत असताना मिसळावे.
 • जेली तयार झाल्यानंतर ती निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बरणीमध्ये हवाबंद करून ती बरणी थंड व कोरड्या जागी ठेवावी.
 • करवंदाच्या फळामध्ये पेक्टिनचे प्रमाण जास्त (0.35 टक्के) असल्याने कच्च्या फळांपासून गुलाबी रंगाची, पारदर्शक अशी उत्कृष्ट जेली तयार होते.


करवंदाचे लोणचे

 • कच्च्या करवंदापासून लोणचे तयार करण्यासाठी ताजी कच्ची करवंदे देठासहित काढून स्वच्छ धुऊन घ्यावीत.
 • नंतर ही करवंदे मलमलच्या कापडात घेऊन लाकडी दांड्याने फोडून घ्यावीत.
 • सर्वप्रथम 1.5 किलो करवंदाच्या फळांना थोडे मीठ आणि हळद लाऊन ती स्टीलच्या पातेल्यात दोन ते तीन दिवस ठेवावीत.
 • त्यामुळे करवंदातील पाणी बऱ्याच अंशी निचरून जाते. गोडेतेल (400 ग्रॅम) घेऊन त्यात मेथी (20 ग्रॅम), हळद (30 ग्रॅम), हिंग (40 ग्रॅम), लाल मिरची पावडर (48 ग्रॅम), मीठ (250 ग्रॅम) आणि मोहरी (100 ग्रॅम) वापरून फोडणी तयार करावी आणि हि फोडणी पाणी निचरलेल्या करवंदामध्ये मिसळावी.
 • तयार झालेल्या लोणच्यात 1 किलोस 250 मिलीग्राम या प्रमाणात सोडियम बेंझोएट मिसळून लोणचे बाटलीत भरल्यानंतर, शिल्लक राहिलेले गोडेतेल ओतावे.
 • बाटली झाकण लावून बंद करावी आणि थंड, कोरड्या जागी ठेवावी.


करवंदाचा रस

 • पुर्णपणे पक्व झालेली फळे स्टीलच्या पातेल्यात घेऊन स्वच्छ हाताने चांगली कुस्करून घ्यावीत.
 • हे पातेले मंद गॅस शेगडीवर ठेवून 8-10 मिनिटे गरम करावे व थंड होऊ द्यावे.
 • त्यानंतर स्क्रू-टाईप एक्सट्रॅक्टर मशिनमध्ये घालून हा लगदा बारीक करावा, जेणे करून त्यातून रस निघेल.
 • साधारणपणे फळांपासून 55 ते 56 टक्के रस मिळतो.
 • रस पातळ मलमलच्या कापडातून गाळून स्टीलच्या उभट भांड्यांमध्ये 5 ते 6 तास स्थिर ठेवावा.
 • तयार झालेला रस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावा.


करवंदाचे सरबत

 • सरबत तयार करण्यासाठी रस 10 टक्के, साखर 15 टक्के आणि आम्लता 0.30 टक्के असावी.
 • वरील प्रमाणीकरणानुसार 1 लिटर रस घेवून त्यामध्ये 1.5 कि.ग्रॅ. साखर, 25.5 ग्रॅम सायट्रिक आम्ल, 7.7 लि. पाणी मिसळावे.
 • ग्लासमध्ये थोडे सरबत घेवून त्यात 0.1 ग्रॅ. सोडियम बेन्झोएट विरघळून घ्यावे व ते सरबता मध्ये टाकावे.
 • तयार झालेले सरबत निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावे.

करवंदाचा स्क्वॅश

 • स्क्वॅश तयार करण्यासाठी रस 25 टक्के, साखर 45 टक्के आणि सायट्रिक आम्लाचे प्रमाण १ टक्के असावे.
 • वरील प्रमाणीकरणानुसार 1 लिटर रस घेवून त्यामध्ये 1.8 कि.ग्रॅ. साखर, 35.5 ग्रॅम सायट्रिक आम्ल, 1.5 लि. पाणी मिसळावे.
 • ग्लासमध्ये थोडा स्क्वॅश घेवून त्यात 0.6 ग्रॅ. सोडियम बेन्झोएट विरघळून घ्यावे व ते स्क्वॅश मध्ये टाकावे.
 • तयार झालेला स्क्वॅश पुन्हा मलमलच्या कापडातून गाळून घेऊन निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावा.
 • स्क्वॅशपासून सरबत तयार करताना त्यामध्ये दोन ते तीन पट पाणी टाकून थंड करून पिण्यासाठी वापरतात.

करवंदाचा सिरप

 • सिरप तयार करण्यासाठी रस 30 टक्के, साखर 60 टक्के व सायट्रिक आम्ल 1.5 टक्के लागते.
 • वरील प्रमाणीकरणानुसार 1 लिटर रस घेवून त्यामध्ये 1 कि.ग्रॅ. साखर, 45.5 ग्रॅम सायट्रिक आम्ल, 0.5 लि. पाणी मिसळावे.
 • ग्लासमध्ये थोडे सिरप घेवून त्यात 0.6 ग्रॅ. सोडियम बेन्झोएट विरघळून घ्यावे व ते सिरप मध्ये टाकावे.
 • तयार झालेला सिरप निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावा. 


लेखक:
श्री. एस.डी. कटके, प्रा. डॉ. के.एस. गाढे
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

karonda Carissa carandas karvand करवंद सायट्रिक आम्ल सोडियम बेन्झोएट sodium benzoate Citric acid
English Summary: value added products from karonda processing

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.