सोयाबीन मध्ये प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे, मांस व मासे यांच्या तुलनेत दुप्पट, अंड्याच्या तिप्पट व दुधाच्या दहापट इतके आहे, त्यामुळे सोयाबीन पासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती आणि विक्री साठी मोठा वाव आहे.
सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योगांची स्थापना करण्यापूर्वी त्या भागातील लोकांची खाद्यपदार्थाची आवड आणि पसंत इत्यादीचा विचार करून पुढील पदार्थाच्या उत्पादनावर भर द्यावा.
1) सोया चकली :
1) तांदूळ 1 किलो, हरभरा डाळ 250 ग्रॅम, मुगडाळ 100 ग्रॅम, उडीद डाळ 100 ग्रॅम, प्रक्रियायुक्त सोया डाळ 450 ग्रॅम,पोहे 100 ग्रॅम, जिरे 25 ग्रॅम, धने 25 ग्रॅम हे सर्व साहित्य वेगवेगळे लालसर भाजून एकत्र करून दळावे.
2) एक किलो पीठ,लाल मिरची पावडर 25 ग्रॅम, हळद 10ग्रॅम, तीळ 20 ग्रॅम,खाद्य तेल 100 मिली, (मोहनासाठी) तळण्यासाठी तेल चवीनुसार मीठ.
3) पिठामध्ये सर्व साहित्य मिसळून तेल गरम करून तेलाचे मोहन घालून पीठ चांगले मळून घ्यावे. चकल्या बनवून गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात.
100 ग्रॅम सोया चकली तील पोषणतत्त्वे प्रथिने - 10 - 11 ग्रॅम, स्निग्धपदार्थ, - 25 - 27 ग्रॅम, ऊर्जा - 490 - 520 किलो कॅलरीज.
2) सोया - पोहा लाडू :
1) सोया पीठ 200 ग्रॅम, बेसन 100 ग्रॅम, दगडी पोहे 150 ग्रॅम,शेंगदाणा कूट 100 ग्रॅम,पिठीसाखर 250 ग्रॅम, तूप 200 ग्रॅम.
2) सोया पीठ व बेसन थोड्या तुपात वेगवेगळे लालसर खमंग भाजावेत.
3) दगडी पोहे गरम तुपात चांगले तळून घ्यावे. थंड झाल्यावर हाताने चुरा करावा.
4) पिठामध्ये शेंगदाणा कूट, पिठीसाखर इतर साहित्य मिसळून लाडू बांधावेत.
3) सोया नट्स
1) उकळत्या पाण्यात सोडा व मीठ मिसळून सोयाबीन 20 ते 25 मिनिटे शिजवावे.
2) गरम पाण्यातून सोयाबीन काढून थोडे सुकवून मायक्रो ओव्हन मध्ये 100 अंश सेल्सिअस तापमानाला बारा मिनिटे बेक करावे किंवा शेंगदाणे किंवा भट्टीत भाजून घ्यावेत. अशा प्रकारे खमंग व खुसखुशीत सोया नट्स तयार करता येतात.
4) सोया दूध सोया डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन तीन पट पाण्यात सहा ते आठ तास भिजवावी. मात्र उन्हाळ्यात तीन ते चार तास भिजवावी.
डाळ स्वच्छ धुऊन एक किलो सोया डाळीसाठी सहा ते आठ लिटर उकळते गरम पाणी घेऊन मिक्सरमधून जाडसर बारीक करावे. बारीक केलेले मिश्रण 15 ते 20 मिनिटे गॅसवर ठेवून सतत हलवत उकळून घ्यावे. हे दूध मलमलच्या कापडातून गाळून पुन्हा पाच मिनिटे उकळावे.
5) सोया पनीर ( टोफू ) सोया दूध 80 ते 100 अंश सेल्सिअस तापमानाला उकळावे. दोन ग्रॅम सायट्रिक ऍसिड पाण्यात विरघळून एक लिटर सोया दुधात मिसळावा. ते दूध हलके हलवून पाच मिनिटे तसेच ठेवावे फाटलेले दूध मलमलच्या कापडातून गाळून घेऊन पाणी वेगळे करून कापडातील साखा पनीर प्रेसने दाबून पाण्याचा पूर्ण अंश काढून टाकावा.
जो पदार्थ तयार होतो त्याला सोया पनीर (टोफु) म्हणतात. तयार पनीर थंड पाण्यात पाच ते दहा मिनिटे ठेवून पॅक करून फ्रीजमध्ये ठेवावे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Apollo Tyres : आधुनिक शेती प्रणालीसाठी अपोलोने न्यू-जेन अँग्रीचे 'विराट' टायर केला लाँच
Published on: 06 May 2022, 07:22 IST