Agriculture Processing

महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या फळांचे उत्पादन मोठया प्रमाणावर होत असल्याने महाराष्ट्राला भारताची फळांची टोपी असे संबोधले जाते. परंतु काढणी नंतरच्या चुकीच्या हाताळणीमुळे व प्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे फार मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे. हे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रक्रिया हा एक त्यावरील रामबाण उपाय आहे.

Updated on 09 July, 2019 8:10 AM IST


महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या फळांचे उत्पादन मोठया प्रमाणावर होत असल्याने महाराष्ट्राला भारताची फळांची टोपी असे संबोधले जाते. परंतु काढणी नंतरच्या चुकीच्या हाताळणीमुळे व प्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे फार मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे. हे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रक्रिया हा एक त्यावरील रामबाण उपाय आहे. महाराष्ट्राच्या अवर्षण प्रवण भागामध्ये जांभुळ फळांचे उत्पादन भरपूर होते. परंतु प्रक्रियेच्या अभावामुळे त्याचे फार मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे. म्हणून त्यावरील प्रक्रिया करून मुल्यवर्धीत पदार्थ तयार करून शेतकर्‍याने व महिला बचत गटाने त्याचे विक्री व्यवस्थापन योग्य पध्दतीने केल्यास निश्‍चित फायदयाचे ठरेल. तसेच त्यातून ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती देखील होण्यास मदत होईल.

जांभूळ पिकाची ओळख:

जांभूळ हे जास्त पावसाच्या प्रदेशात तसेच कोरडवाहू परिस्थितीत देखील उत्तम वाढणारे महत्वाचे औषधी गुणधर्म असलेले परंतू दुर्लक्षित राहिलेले फळझाड आहे. या झाडास वेगवेगळया भाषेत वेगवेगळया नावाने ओळखले जाते. उदा. हिंदीत जामून, गुजरातील जांबू, मराठीत जांभूळ, तेलगुत नेरडू तर इंग्रजीत ब्लॅकबेरी या झाडाचे उगमस्थान भारत देश असून भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत सर्वत्र जांभळाची झाडे दिसून येतात. भारताखेरीज मलेशियात, थायलंड, फिलीपाइंस, श्रीलंका देशात सुध्दा जांभळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात. जांभळाचे झाड सदाहरित असून हिरव्यागार पानांनी सदैव बरहलेले दिसते. झाडे उंच व मोठी असतात. परंतू ठिसूळ असतात. झाडाची साल मऊ व गुळगुळीत तसेच झाडांची फुले सुगंधीत व पांढर्‍या रंगाची असतात. फळे कच्ची असतांना हिरव्या रंगाची असतात व पिकल्यानंतर जांभळया रंगाची लांबट, गोल आकाराची असतात.

जांभूळाचे महत्व:

झाडांच्या पानांचा उपयोग जनावरांना खाद्य, रेशीम किड्यांच्या संगोपनासाठी तसेच पाने सुकुन त्यापासून सुगंधी तेल काढतात. तसेच मधुमेह या रोगावर चांगला उपयोग होतो. झाडांच्या सालीचा उपयोग रंगकाम, मुखशुध्दीसाठी, जुलाब व उलटयावर गुणकारी असतो. झाडाच्या लाकडाचा उपयोग इमारतीच्या बांधकामासाठी, शेतीत लागणारे औजारे व साधणे तयार करण्यासाठी, कलाकुसरीच्या विविध वस्तू तयार करण्यासाठी तसेच चांगले जळावू लाकूड म्हणून उपयोग करतात.

जांभळाची फळे पिकल्यानंतर गर्द काळया रंगाची किंवा जांभळया रंगाची होतात. जांभळाचा हंगाम प्रामुख्याने फेब्रुवारी ते जून या महिन्यात सुरू होतो. पिकलेल्या फळांना रंग हा प्रामुख्याने अन्थोसायनिन या रंगद्रव्यामुळे येतो. हे फळ झाडावरच पिकणारे असल्याने त्याची काढणी पूर्वपक्व झाल्यानंतरच करावी. जांभळाच्या फळांना व बियांना औषधी महत्त्व प्राप्त झाले असल्याने त्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यास फार चांगला वाव आहे. जांभळाच्या फळामध्ये 50 ते 90 टक्के खाण्यायोग्य गराचे प्रमाण असते.
जांभळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये पोषणमुल्याचे घटक पुढीलप्रमाणे दिसून येतात.

घटक              प्रमाण (%)

पाणी               83.70
मेद                0.10
प्रथिने              0.70
तंतुमय पदार्थ      0.90
आम्लता            0.41 ते 2.17
कर्बोदके           14.00
विद्राव्य घटक     10 ते 18
फॉस्फरस         15.00

जांभळाच्या फळामध्ये औषधी गुणधर्माबरोबरच आहारमुल्य देखील फार चांगले असते. जांभळाच्या फळांचा रस मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे. पिकलेल्या फळांपासून उत्तम प्रकारचे सरबते, वाईन तसेच विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळाच्या बियांमध्ये सुध्दा मोठया प्रमाणावर औषधी गुणधर्म असतो, बिया चवीला अत्यंत तुरट असतात. या बियांमध्ये पॉलीफिनॉल्स मोठया प्रमाणावर असतात. वाळलेल्या बियांच्या पावडरचा उपयोग मधुमेही रोग्यांमधील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.

जांभूळाच्या विविध जाती:

  • राय जांभूळ:
    या प्रकारच्या जांभळाची फळे आकाराने मोठी, लांबट, गराचे प्रमाण जासत चवीला आंबट गोड, रसदार, बी छोटया आकाराचे, गराचा रंग फिक्कट गुलाबी व फळांचा रंग जांभळा किंवा काळसर असतो. या जातीची फळे जुन, जुलै महिन्यामध्ये तयार होतात.
  • कोकण बहाडोली:
    ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक जातीतून निवड पध्दतीने शोधून काढलेली आहे. या जातीची फळे एप्रिल मे महिन्यामध्ये तयार होतात. फळांचे सरासरी वजन 16.26 ग्रॅम, फळांची लांबी 3.03 से.मी. व रूंदी 5.59 से.मी. असते. पिकल्यावर फळांचा रंग गर्द काळा होतो. फळाच्या गराचा टीएसएस 13 टक्के व आम्लता 0.21 टक्के व जीवनसत्व ‘क’ 361 मि.ग्रॅ./100 ग्रॅ. असते.
  • पारस:
    ही जात गुजरात कृषी विद्यापीठाने स्थानिक जातीतून निवड पध्दतीने शोधून काढलेली आहे.

जांभूळ प्रक्रियेच्या संधी:

जांभळाच्या पिकलेल्या फळांमध्ये आहारमुल्य व औषधी गुणधर्म चांगले असल्याने फळांना बाजारपेठेत फार चांगली मागणी आहे. ही फळे अत्यंत नाजुक व नाशवंत असल्याने 1 ते 2 दिवसांपेक्षा जास्त साठवता येत नाहीत. बाजारात एकाच वेळी फळांची आवक जास्त झाली की त्याचे दर कोसळतात व शेतकर्‍यांना त्यांचा माल पडेल त्या भावाला विकल्याने त्याचा तोटा होतो. यासाठी फळांपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यास औषधी गुणधर्माचा वापर होईल. हंगाम नसतांना फळांचा अस्वाद घेता येईल व असे प्रक्रिया उद्योग खेडोपाडी उभारल्यास रोजगार निर्मिती होऊ शकेल. या फळांपासून आपणास रस, सरबत, स्क्वॅश, सिरप, वाईन, जॅन, जेली, बर्फी टॉफी, पावडर इत्यादी पदार्थांना बाजारपेठेत जास्त मागणी आहे. जांभळाच्या पिकलेल्या फळांना गर्द जांभळा रंग असल्याने त्यांच्यापासून तयार केलेल्या पेयाला आकर्षक रंग येतो. जांभळापासून विविध प्रकारची पेय तयार करता येतात उदा. सरबत, स्क्वॅश, सिरप.

जांभूळाचे सरबत:

प्रथम पिकलेली व आकाराने मोठी फळे निवडावीत. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर जांभळी पल्परच्या सहाय्याने त्याचा रस काढून घ्यावा. एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 82 अंश से. तापमानाला 20 मिनिटे गरम करावा. यामुळे रसामधील रंगद्रव्याचे प्रमाण जास्त मिळते. रसामध्ये साखर, सायट्रीक अ‍ॅसीड, पाणी व परिरक्षक योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून ते मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर हे मिश्रण थोडावे गरम करून निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटल्यात भरून हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरडया जागेवर साठवून ठेवावे.

जांभळाचा गर: 1 लिटर
साखर: 1 किलो
पाणी: 4 लिटर
सायट्रीक अ‍ॅसीड: 2 ग्रॅम

जांभूळाचे स्क्वॅश:

जांभळाच्या फळांपासून स्क्वॅश तयार करण्यासाठी प्रथम पिकलेल्या निरोगी चांगल्या फळांची निवड करावी. फळे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर पल्परच्या सहाय्याने त्याचा रस काढून घ्यावा. एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 80 ते 82 अंश से. तापमानाला 30 मिनीटे गरम करावा. यामुळे रसामधील रंगद्रव्याचे प्रमाण जास्त मिळते. रसामध्ये साखर, सायट्रीक अ‍ॅसीड, पाणी व परिरक्षक योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून ते मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर हे मिश्रण थोडावे गरम करून निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटल्यात भरून हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरडया जागेवर साठवून ठेवावे.

जांभळाचा गर: 1 लिटर
साखर: 1 किलो
पाणी: 1 लिटर
सायट्रीक अ‍ॅसीड: 2 ग्रॅम

जांभूळाच्या बियांची पावडर:

जांभळाच्या फळांपासून गर व रस काढल्यानंतर राहिलेल्या बियांपासून पावडर तयार करता येते. ही पावडर मधुमेही रोग्यांसाठी अत्यंत गुणकारी असते. त्या पावडरला बाजारपेठेत मोठया प्रमाणावर मागणी आहे. गर काढून घेतल्यानंतर राहीलेल्या बिया पाण्याने स्वच्छ धूवून घ्याव्यात. त्या बिया ट्रे मध्ये पातळ पसरून ते ट्रे ड्रायरमध्ये 55 ते 60 अंश से. तापमानास 18 ते 20 तास ठेवावेत व उन्हात वाळवावेत. वाळलेल्या बिया मिक्सर किंवा ग्राईंडरच्या मदतीने पावडर तयार करावी. नंतर पावडरचे वजन करून पॉलीथिन पिशवीत भरून पिशव्या हवाबंद करून लेबल लावून कोरडया जागी साठवून ठेवाव्यात.

लेखक:
श्री. शशिकांत पाटील
विषय विशेषज्ञ (अन्नतंत्र विभाग)
कृषी विज्ञान केंद्र, जालना 
०२४८२-२३५५८६
७३५००१३१५७

English Summary: Processed Product from Jamun Processing
Published on: 07 July 2019, 04:50 IST