1. कृषी व्यवसाय

स्ट्रॉबेरी फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती

स्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे.हे लाल रंगाचे फळ आहे. ते थंड प्रदेशात होते. सुगंध, लाल रंग, रसाळपणा आणि गोडवा या मुळे हे फळ प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी ही झुडुप वर्गिय वनस्पती आहे. फळाचा उगम प्राचीन रोममधे झाला असे मानले जाते. सुरुवातीला स्ट्रॉबेरी हिरव्या रंगाच्या असतात.

KJ Staff
KJ Staff


स्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे.हे लाल रंगाचे फळ आहे. ते थंड प्रदेशात होते. सुगंध, लाल रंग, रसाळपणा आणि गोडवा यामुळे हे फळ प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी ही झुडुप वर्गिय वनस्पती आहे. फळाचा उगम प्राचीन रोममधे झाला असे मानले जाते. सुरुवातीला स्ट्रॉबेरी हिरव्या रंगाच्या असतात. नंतर जसजशी त्यांची वाढ होत जाते, तसतशा त्या लाल होत जातात. स्ट्रॉबेरीची लागवड पूर्वी मर्यादित क्षेत्रावर आणि ठराविक ठिकाणीच होत असे, पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली आहे. स्ट्रॉबेरीची लागवड उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तिन्ही हंगामांत करता येते; परंतु महाराष्ट्रातील ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीतील हवामान स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी पोषक आहे.

जगभरात स्ट्रॉबेरीच्या पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. जगामध्ये अमेरिका, पोलंड, कोरिया, स्पेन, जर्मनी, रशिया, मेक्सिको, लेबेनॉन, फ्रांस, इंग्लंड, युगोस्लाव्हिला, झेकोस्लाव्हिया, कॅनडा, नेदरलँड, नॉर्वे, हंगेरी, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात स्ट्रॉबेरीची लागवड प्रामुख्याने जम्मू-काश्मिर, निलगिरी, पर्वतातील परिसर, नैनीताल, डेहराडून, फैजाबाद, मीरत, मुझफ्फरनगर, सहारनपूर, उटी इत्यादी थंड हवामानाच्या प्रदेशात केली जाते तर महाराष्ट्रात महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई, मेढा, गोरेगाव (जि. सातारा), चंदगड (जि. कोल्हापूर), पुणे, लोणावळा (जि. पुणे), नाशिक, इगतपुरी, सुरगाणा (जि. नाशिक) व नागपूरकडील तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड होते. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथेही स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ लागले आहे.

स्ट्रॉबेरीची लागवड पूर्वी मर्यादित क्षेत्रावर आणि ठराविक ठिकाणीच होत असे, पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली आहे. एका हंगामात पाच बहर येत असल्याने हे जोडपीक म्हणूनही शेतकऱ्यांना पैसे देऊन जाते. सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे स्ट्रॉबेरी फेस्टिव्हल साजरा केला जातो. महारष्ट्रात स्ट्रॉबेरीच्या फळाभोवती आकर्षणाचे वलय निर्माण झाले आहे, कारण फळाचे नाविन्य, या फळातील पोषणमूल्ये आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर या फळाला असलेली मागणी त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या ताज्या फळांना युरोपीय देशांत निर्यातीसाठी भरपूर वाव आहे. समशीतोष्ण हवामानास हे पीक चांगला प्रतिसाद देते.

स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी हलकी, मध्यम काळी, वालुकामय पोयटा, गाळाची जमीन असावी. जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक ५.५ ते ६.५ या दरम्यान योग्य असतो. भुसभुशीत वालुकामय जमिनीत स्ट्रॉबेरीच्या रोपांची मुळे जोमाने वाढतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने सेल्वा, चॅन्ड्‌लर, स्वीट चार्ली, कॅमारोझा, रागिया, डग्लस, फेस्टिवल, ओसो ग्रॅंडी, विंटर डॉन, केलजंट, पजारो इत्यादी कॅलिफोर्नियन जातींची आयात केली जाते. भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी विकसित केलेली पुसा अर्ली ड्वार्फ ह्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. स्ट्रॉबेरीचे झाड औषधी म्हणूनही ओळखले जाते. निरनिराळ्या रोगांवर स्ट्रॉबेरीच्या झाडाच्या पानांचा रस आणि फळे यांचा उपयोग करतात.

स्ट्रॉबेरीच्या फळामध्ये कर्बोहायड्रेटस जीवनसत्त्व '','' आणि कॅल्शियम, लोह, स्फुरद इत्यादी अन्नघटक भरपूर प्रमाणात असतात. स्ट्रॉबेरीच्या फळाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात पुढीलप्रमाणे अन्नघटकाचे प्रमाण असते. पाणी ८९.०%, प्रथिने (प्रोटीन्स) ०.९%, चुना (कॅल्शियम) ०.३%, स्फुरद ०.०३%, जीवनसत्त्व ब २ ०.१%, नियॅसीन ०.४%, शर्करा (कर्बोहायड्रेटस) ९.०%, स्निग्धांश (फॅटस) ०.४%, लोह ०.१%, जीवनसत्त्व ब-१ ०.३%, जीवनसत्त्व '०.६%. स्ट्रॉबेरीच्या पक्व फळांचा उपयोग खाण्यासाठी करतात अथवा स्ट्रॉबेरीच्या पक्व फळांपासून जॅम, जेली, रस, वाईन, आईस्क्रिम, डबाबंद स्ट्रॉबेरी इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात.

स्ट्रॉबेरी फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

१) स्ट्रॉबेरी रस

  • लाल रंगाची पिकलेली निवडून स्ट्रॉबेरी घ्यावीत. स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर स्ट्रॉबेरीतील बी कॉर्करच्या साह्याने काढून स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे करून घ्यावीत. स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे स्टीलच्या पातेल्यात घेऊन स्वच्छ हाताने चांगली कुस्करून घ्यावीत. हे पातेले मंद आचेवर ठेवून ८ ते १० मिनिटे गरम करावे व थंड होऊ द्यावे.
  • त्यानंतर तयार झालेला लगदा स्क्रू-टाईप एक्सट्रॅक्टर मशिनमध्ये घालून बारीक करावा व गर काढून घ्यावा. तयार झालेला रस पातळ मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. त्यानंतर तयार झालेला रस पाश्‍चराईझ करून, परिरक्षकाचा वापर करून, निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या हवाबंद करून वर्षभर साठवून ठेवता येतो. हा रस वेगवेगळे पेये तयार करण्यासाठी वापरता येतो.

२) स्ट्रॉबेरी सिरप 

  • सिरप तयार करण्यासाठी रस ३० टक्के, साखर ६० टक्के व सायट्रिक आम्ल १.५ टक्के लागते.लाल रंगाची पिकलेली निवडून स्ट्रॉबेरी घ्यावीत. स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर स्ट्रॉबेरीतील बी कॉर्करच्या साह्याने काढून स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे करून घ्यावीत. स्टीलच्या पातेल्यात वरील प्रमाणीकरणानुसार १ लिटर रस घेवून त्यामध्ये ७५० ग्रॅम साखर, ५.५ ग्रॅम सायट्रिक आम्ल, ०.५ लि. पाणी मिसळून ते मिश्रण गरम करावे.
  • मिश्रणाचा ब्रिक्‍स ६५ ते ६८ अंश ब्रिक्‍स आला की सिरप तयार झाला असे समजावे. ग्लासमध्ये थोडे सिरप घेवून त्यात ०.६ ग्रॅम सोडियम बेन्झोएट विरघळून घ्यावे व ते सिरप मध्ये टाकावे. तयार झालेला सिरप निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या व थंड जागी साठवावा. 

३) स्ट्रॉबेरी प्युरी

  • विविध फळांच्या रसांमध्ये स्ट्रॉबेरी प्युरीचा वापर करतात. तसेच मिल्कशेक, आईस्क्रीम, बिस्कीट, रस किंवा इतर पेये बनविण्यासाठी प्युरीचा वापर करतात. प्युरीची निर्यात परदेशात केली जाते. प्युरी म्हणजे पिकलेल्या ताज्या फळातील गर, रस किंवा लगद्यावर विशिष्ट प्रक्रिया करुन सॉसप्रमाणे त्याचे स्वरुप बदलवले जाते. त्यामध्ये ताज्या फळांचा मूळ स्वाद, रंग, सुगंध कायम राहील, याची दक्षता घेतली जाते.
  • पिकलेली स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर स्ट्रॉबेरीतील बी कॉर्करच्या साह्याने काढून स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे करून गर काढून घ्यावा. स्टीलच्या पातेल्यात स्ट्रॉबेरी गर १ लिटर घेवून त्यामध्ये १०० ग्रॅम साखर मिसळून ते मिश्रण ५० ते ५५ डी.से. तापमानाला १५ ते २० मिनिटे गरम करावे. तयार झालेली स्ट्रॉबेरी प्युरी हवाविरहित व निर्जतुकीकरण करून हवाबंद डब्यात भरुन ठेवतात.


४)
स्ट्रॉबेरी जॅम

  • पूर्ण पिकलेली स्ट्रॉबेरी घ्या व त्यातील गर काढून घ्या. १ किलो गरात १ किलो साखर, ४ ग्रॅम सायट्रीक अॅसीड (लिंबू भुकटी), ४ ग्रॅम पेक्टीन व खाद्य रंग टाकावे. नंतर हे मिश्रण स्टीलच्या पातेल्यात १०३ डी.सें. तापमानापर्यंत गरम करावे (घट्ट होईपर्यंत शिजवावे).
  • शिजवितांनी मिश्रण पळीने सतत हलवावे. म्हणजे गर करपत नाही व जॅम चांगल्या प्रतीचा तयार होतो. मिश्रणाचा ब्रीक्स ६८ टक्के आल्यास जॅम तयार झाला असे समजावे व तयार झालेला जॅम कोरड्या व निर्जंतुक केलेल्या बॉटलमध्ये हवाबंद करून ठेवावे.

५) स्ट्रॉबेरी हलवा 

  • लाल रंगाची पिकलेली स्ट्रॉबेरी निवडून स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर स्ट्रॉबेरीतील बी काढून स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे करून त्य़ातील गर काढून घ्यावा. कढईत २५० ग्रॅम तूप गरम करावे आणि तूप गरम झाल्यावर त्यात २५० ग्रॅम रवा घाला. १० मिनिटे मंद आचेवर मिश्रण भाजून त्य़ात १५० मी.ली. दूध घाला आणि मिश्रण २ मिनिटे झाकून ठेवा.
  • २ मिनिटानंतर मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. तयार झालेला मिश्रणामध्ये ५० ग्रॅम साखर आणि ५०० ग्रॅम स्ट्रॉबेरीची पुरी घाला, नंतर मिश्रण चांगले मिक्स करावे आणि नंतर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे शिजवावे. तयार झालेला स्ट्रॉबेरी हलवा सर्व्हिंग भांड्यात गरम गरम सर्व्ह करा.

६) स्ट्रॉबेरी आईस्क्रिम

  • पूर्ण पिकलेली स्ट्रॉबेरी घ्या व त्य़ातील गर काढून घ्या. ५०० ग्रॅम गर गाळून घ्या. ७०० ग्रॅम दही पातळ कपड्यात बांधून २ तास टांगून ठेवा. दह्यात २५० ग्रॅम पिठीसाखर, ६० ग्रॅम दुधाची पावडर, २ ग्रॅम लिंबाचा रस व २५ ग्रॅम क्रिम घालून मिश्रणाला ५ मिनिटे फेटून घ्या. नंतर फेटलेले मिश्रण फ्रिजमध्ये २ तास सेट होण्यास ठेवा.
  • २ तासांनी अर्धवट झालेले आईस्क्रीम बाहेर काढा व मिक्सरमधून फिरवून घ्या. पुन्हा मिश्रण फ्रिजरमध्ये हवा बंद डब्यात ७ तास सेट होण्यास ठेवा. तयार झालेल्या आईस्क्रिमवर स्ट्रॉबेरीची सजावट करा.

७) स्ट्रॉबेरी श्रीखंड

  • महाराष्ट्रामधील खाद्य संस्कृतीमध्ये श्रीखंड या पदार्थाला जास्त महत्त्व आहे. स्ट्रॉबेरीचा गर किंवा पावडर वापरून उत्तम प्रतीचे श्रीखंड तयार करता येते. या श्रीखंडास चांगली चव असते. ६०० ग्रॅम चक्का व ५०० ग्रॅम साखर एकत्र करून त्याचे मिश्रण एकजीव करा. स्ट्रॉबेरीचा फोडी करून ज्यूसरमधून फिरवून घ्या व गाळणीने गाळून रस काढून घ्या.
  • त्यानंतर त्यात २०० ग्रॅम रबडी टाकून सर्व मिश्रण १० ते १५ मिनिटे फेटून घ्यावे. नंतर त्यात २ ग्रॅम इलायची, ५ ग्रॅम बदाम, २ ग्रॅम पिस्त्याची पूड व २ ग्रॅम केसर टाकून फ्रिजरमध्ये ५ तास सेट होण्यास ठेवा. थंड झाल्यावर तयार झालेला स्ट्रॉबेरी श्रीखंडचा आस्वाद घ्यावा. स्ट्रॉबेरी श्रीखंड शक्यतो खाण्याच्या आदल्या दिवशी करावे म्हणजे मुरल्यावर अधिक रुचकर लागते.

८) स्ट्रॉबेरी बार 

  • पिकलेली चांगली निरोगी फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. फळांची बी काढून बारीक फोडी करून मिक्सरमधून बारीक करून घ्याव्यात व त्यातील गर काढून घ्या मिक्सरमधून काढलेला गर मसलीन कापडामधून गळून घ्यावा. एक किलो गरामध्ये १५० ते २०० ग्रॅम साखर व ५ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मंद आचेवर १५ ते २० मिनिटे शिजवावे.
  • शिजवलेले मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकून एकसमान पसरून वाळवण्यासाठी ३ ते ४ तास ठेवावे. नंतर मिश्रणाची पापडी उलथवावी व पुन्हा २ ते ३ तास सुकवावे. नंतर तयार झालेला स्ट्रॉबेरी बारचे योग्य आकाराचे तुकडे करून बटर पेपरमध्ये आकर्षक पॅकिंग करावी व साठवणूक थंड व कोरड्या ठिकाणी करावी.

९) स्ट्रॉबेरी मफीन्स 

  • लाल रंगाची पिकलेली स्ट्रॉबेरी निवडून घ्यावीत. स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर स्ट्रॉबेरीतील बी कॉर्करच्या साह्याने काढून स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे करून घ्यावीत. नंतर मिक्सरमधून त्यातील गर काढून घ्यावा. सर्वप्रथम २०० ग्रॅम मैदा आणि ४ ग्रॅम बेकिंग पावडर एकत्र करून ३ ते ४ वेळा चाळून घ्यावे. दुसऱ्या भांड्यात ६० ग्रॅम वनस्पती तूप आणि १५० ग्रॅम साखर एकत्र करून ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यावे.
  • मिश्रणामध्ये २०० ग्रॅम मैदा, ४ ग्रॅम बेकिंग पावडर, बेकिंग सोडा ४ ग्रॅम, फणस इसेन्स २ मी.ली. आणि ३०० ग्रॅम स्ट्रॉबेरीचा गर टाकून पुन्हा ब्लेंडरने एकत्रित करावे एकत्र कलेले हे मिश्रण बटर लावलेल्या मफीन्स पात्रात भरावे. मफीन्स पात्र बेकिंग ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअस तापमानाला २० ते २५ मिनिटे बेक करावे. तयार स्ट्रॉबेरी मफीन्स थंड करून आकर्षक पॅकिंग करून घ्यावी.

लेखक:
सचिन अर्जुन शेळके
आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, 
सॅम हिगिनबॉटम कृषि, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय प्रयागराज, उत्तरप्रदेश.  
8888992522

English Summary: Processed foods products from strawberry fruit Published on: 19 April 2020, 09:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters