केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या. यामध्ये शेतीसाठी अनेक आधुनिक उपकरणे आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये अर्थसंकल्पामध्ये ड्रोन शेतीसाठी एक वेगळी तरतूद केली जाणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. यामुळे आता याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. असे असताना आता अंर्थसंकल्पात तरतूदीची घोषणा केल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा येथे ड्रोनच्या माध्यमातून पीक फवारणीचा उपक्रम पार पडला आहे. शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतामध्ये ड्रोनद्वारे पिकासह भाजीपाल्याची फवारणी करण्यात आली आहे.
या जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्रयोग होत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करीत असताना नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे येणाऱ्या काळात असे प्रयोग वाढणार असून यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे. यापूर्वी उस्मानाबाद, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हे प्रयोग झाले आहेत. मात्र पुढे कोणी असे प्रयोग केले नव्हते. यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे.
सध्या मजूरांचा प्रश्न बिकट होत आहे, यामुळे यावर हा एक चांगला पर्याय आहे. तसेच शेतकऱ्यांचे शारीरिक कष्टही कमी होणार आहेत. या ड्रोनमुळे एका दिवसामध्ये 10 एकरावरील फवारणी होणार असल्याने क्षेत्र लवकरच अटोपणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेती व्यवसयात वापर वाढत असून तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचा ठरत आहे. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना ते किती फायदेशीर ठरणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. काळाच्या ओघात शेती आणि पीक पध्दतीमध्ये बदल केला तरच उत्पादनात वाढ होणार आहे. सध्या हे बदल होताना दिसत आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीव्यवसयात ड्रोनचा वापर वाढणार असल्याचे सांगण्यात आले होते तर दुसरीकडे आदिवासी बहुल जिल्ह्यात हा प्रयोगही पार पडला आहे. यामुळे येणाऱ्या काळात हे प्रयोग वाढणार आहेत. आता यामुळे किती फायदा आणि किती बचत होणार यावर याचा वापर कमीजास्त होणार आहे. शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतात किसान ड्रोन, माऊली ग्रीन आर्मी, महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती आणि आयोटेक वर्ल्ड एरिगेशनच्या वतीने हा प्रयोग यशस्वीरित्या सादर करण्यात आला. यावेळी टोमॅटो, मिर्ची आणि वांग्याच्या शेतीवर फवारणी करण्यात आली.
Published on: 03 February 2022, 05:14 IST