शेतमालावर प्रक्रिया उद्योग हा एक असा मुद्दा आहे जो शेतकऱ्यांना तारू शकतो. कारण शेतमाल उत्पादित करून तो बाजारपेठेत विकणे म्हणजेच शेतकऱ्यांसाठी हा एक प्रकारचा सट्टाच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण शेतकरी बंधूंच्या हाती माल पिकवणे आहे परंतु त्याची विक्री त्यांच्या नियंत्रणात नाही. ते सगळे व्यापार्यांच्या हातात असल्यामुळे बऱ्याचदा शेतमालास कवडीमोल दराने विकावा लागतो.
बऱ्याचदा शेतकऱ्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल एवढेच उत्पन्न हातात येते. त्यामुळे उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून तो माल विकणे हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते.
शेतमाल प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित करणे ही खूप काळाची गरज आहे. या लेखात आपण बटाटा वेफर्स या उद्योगाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
बटाटा वेफर्स उद्योग
हा उद्योग एक कमीत कमी गुंतवणुकीत पण जास्त पैसा येईल अशा प्रकारचा उद्योग असून बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे व्यवस्थित पॅकिंग करून विक्रीसाठी माल उपलब्ध करून देणे खूप गरजेचे आहे.
जर आपण एकंदरीत मनुष्यबळाचा विचार केला तर खूप कमीत कमी मनुष्यबळाची आवश्यकता या उद्योगामध्ये आहे. पाचशे स्क्वेअर फुट जागा तुमच्याकडे असेल किंवा जास्तीत जास्त हजार स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता या उद्योगासाठी लागते.
या उद्योगासाठी लागणारा कच्चामाल
यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा कच्चामाल म्हणजे शर्करा कमी असलेला बटाटा,तेल, मीठ, काही फ्लेवर( थोडेसे मसालायुक्त वेफर्स तयार करायचे असतील तर आवश्यक), पाणी आणि वेफर्स पॅकिंग साठी पॅकिंग मटेरियल इतका कच्चा मालाचे आवश्यकता भासते.
लागणारे मशीन आणि किंमत
1-बटाटे धुण्यासाठी तुम्हाला ड्रम किंवा ट्रेची आवश्यकता असते.
2- बटाट्याची साल काढण्यासाठी पिलिंग मशीन- किंमत 45000
3- बटाट्याचे काप करण्यासाठी तुम्हाला स्लायझिग मशीन लागेल- किंमत 45 हजार रुपये
4- बटाट्या मधील जास्त असलेले पाणी शोधण्यासाठी ड्रायर मशीन ची आवश्यकता भासते. किंमत- पंचवीस हजार रुपये
5- तळणी यंत्र- किंमत 50 हजार रुपये
6- मसाला युक्त वेफर तयार करण्यासाठी फ्लॅवर मिक्स करायला रोटर ड्रम लागतो. त्याची किंमत 50 हजार रुपये
7- नायट्रोजन हवा मशीन व पॅकिंग मशीन देखील लागते.
या मशिनरी तासाला 50 किलो वेफर्स बनवण्याची क्षमता ठेवतात.
वेफर्स अशा पद्धतीने करावे तयार
सर्वप्रथम यामध्ये बटाटे स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन घेतले जातात व पिलर मशिनच्या साह्याने बटाटाची साल काढली जाते.नंतर हे साल काढलेले बटाटे स्लायझिंग मशिनच्या माध्यमातून त्यांचे व्यवस्थित काप केले जातात
हे काप कोमट पाण्यामध्ये काही वेळ ठेवल्यानंतर उत्तम गुणवत्ता यावी यासाठी ड्रायर मशीन मध्ये घालून त्यामध्ये नको असलेले पाणी शोषून घेण्यासाठी काही वेळ ठेवले जातात. तळणी यंत्रामध्ये त्यांना तळले जातात.
तळताना जास्तीचे तेल शोषून घेता यावे यासाठी लागणारी यंत्रे सुद्धा बाजारात मिळतात. जर तुम्हाला मसाला युक्त वेफर्स बनवायचे असतील तर तळलेले वेफर्स रोटरच्या साह्याने काही वेळ फिरत्या ड्रममध्ये ठेवले जातात.
या तयार वेफर्सचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी त्यामध्ये नायट्रोजन युक्त हवा भरून पॅकिंग करून विक्रीसाठी आपण त्यांना बाजारपेठेत पाठवू शकतो.
नक्की वाचा:Bussiness Tips: भरपूर मागणी असणारा व्यवसाय आणि कमी गुंतवणूक,कमाई मात्र प्रतिमाह लाखात
Published on: 14 September 2022, 12:05 IST