सध्या संपुर्ण जगाला COVID 19 (करोना) या विषाणूजन्य आजाराने विळखा घातला आहे. अशा परिस्थितीत मानवी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबुवर्गीय फळांचे आहारात सेवन करणे गरजेचे झाले आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबु सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते, त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषाणुंपासून मुक्तता मिळू शकते. लिंबु फळाच्या औषधी गुणधर्माचा विचार करता लिंबापासून लोणचे, लेमन ज्यूस, लेमन ऑईल, लेमन पावडर अशा प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्मिती करून त्याची निर्यात करणे सुद्धा सहज शक्य आहे. त्यादृष्टीने लिंबूवर आधारीत प्रक्रिया उधोगांची उभारणी करण्याकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. लिंबाचे उत्पादन आणि निर्यात याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे.
लिंबामध्ये औषधी गुणधर्म आहेत. या फळातील प्रत्येक भागाचा उपयोग केला जातो. लिंबावर प्रक्रिया करून त्यापसुन लिंबाचे लोणचे, मिश्र लोणचे, चटणी, सरबत, स्क्वॅश, सुगंधी तेल, लाईम कॉर्डिअल, सायट्रिक अॅसिड, लायमोनिन तेल, रसायनापासून अर्क पशुखाद्य, तसेच लिंबूसत्व इ. पदार्थ तयार करता येतात. व त्याचा उपयोग जेवणामध्ये करण्यात येतो.
लिंबू सेवनाचे फायदे:
१. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते व विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण होते.
२. व्हिटॅमिन ‘सी’ च्या कमतरतेमुळे होणारा स्कर्व्ही रोग बरा करण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो.
३. थकवा दुर होतो, तसेच पचनक्रिया सुधारते.
४. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचा दाह कमी करणे व तहान शमविण्यासाठी लिंबाचा उपयोग होतो.
५. लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर मध व लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.
६. पित्त झाल्यास रोज लिंबाचे सरबत घेतल्यास पचनसंस्था सुधारते व भुक वाढते.
७. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते.
८. नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.
लिंबापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ:
१. लिंबाचा रस
साहित्य: परिपक्व लिंबू फळे, सोडीयम बेंझोएट, लिंबू प्रेस इ.
कृती:
१. मोठ्या आकाराची चांगली पिवळसर फळे स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यावीत.
२. नंतर स्वच्छ कापडाने पुसून कोरडी करावीत.
३. स्टीलच्या तीक्ष्ण चाकुच्या साहाय्याने फळाचे २ काप करून बिया वेगळ्या करून घ्याव्यात.
४. लिंबू प्रेसच्या साहाय्याने सर्व फळांचा रस स्टीलच्या पातेल्यात काढून घ्यावा.
५. टिकवून क्षमता वाढवण्यासाठी प्रती लिटर रसामध्ये ६०० ग्रॅम सोडीयम बेंझोएट मिसळावे किंवा हा रस ८०० से. तापमानाला २० मिनिटांसाठी स्टीलच्या पातेल्यात उकळवून घ्यावा.
६. हा रस थंड झाल्यावर निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून घट्ट बुच लावावे व कोरड्या ठिकाणी साठवावा.
७. या रसाचा वापर लिंबू सरबत, स्क्वॅश, लेमन RTS यासारखे पेय पदार्थ बनवण्यासाठी होतो.
व्यावसायिक स्तरावर लिंबाचा रस काढण्यासाठी स्वच्छ धुतलेल्या लिंबाचे आडवे काप करून दोन भाग करतात. ही कापण्याची क्रिया वर्तुळाकार चाकु असलेल्या यंत्राद्वारे केली जाते. या यंत्रांचा आकार व क्षमता वेगवेगळी असते. याला रोजिंग मशिन म्हणतात. याद्वारे लिंबातून रस बाहेर काढण्यात येतो. या रसामध्ये बीया, चोथा इत्यादी पदार्थ असतात. त्यामुळे हे वेगळे करण्यासाठी या रसाला गाळणी यंत्रातून पाठविले जाते. या गाळणी यंत्रात रसापासून बिया व चोथा रसापासून वेगळा करण्यात येतो व एका वेगळ्या टँकमध्ये रस जमा होतो. या रसाचा वापर पुढे वेगवेगळे पदार्थ बनविण्यासाठी होतो. तर चोथ्याचा वापर पेक्टीन तयार करण्यासाठी होतो.
२. लिंबू स्क्वॅश
साहित्य: लिंबु रस, साखर, पाणी, पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट (के.एम.एस.)
कृती:
१. स्क्वॅश तयार करण्यासाठी १ लिटर लिंबू रसासाठी: २ कि. साखर १ लिटर पाण्यात मिसळावी साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण गरम करावे, गरम करताना हा पाक सतत ढवळत राहावे.
२. तयार पाक गाळुन घ्यावा व त्यात १ लिटर लिंबु रस मिक्स करावा या स्थितीला मिश्रणात २.५ ग्रॅम पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट (के.एम.एस.) टाकावे.
३. तयार झालेला स्क्वॅश हा निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावा व त्याला घट्ट बुच लावुन हवाबंद करून थंड व कोरडया जागी साठवावा.
४. स्क्वॅशमध्ये कमीत कमी २५% फळांचा रस असणे आवश्यक असते व एकूण विद्राव्य पदार्थाचे प्रमाण कमीत कमी ४०% ते ५० % असावे.
५. स्क्वॅश पिण्यासाठी देताना एक भाग स्क्वॅश व तीन भाग पाणी असे मिसळून द्यावा.
३. लिंबू RTS
साहित्य: लिंबू रस, साखर, पाणी, पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट (के.एम.एस.)
कृती:
१. १० लिटर लिंबु RTS बनवण्यासाठी: १.३० किलो साखर ८.२ लिटर पाण्यात टाकुन साखर पुर्णपणे विरघळेपर्यंत गरम करावी.
२. वरील सिरप गाळून घेऊन त्यात १/२ लिटर लिंबू रस मिसळावा.
३. नंतर ते मिश्रण एकजीव ( Homogenization) करून घ्यावे.
४. तयार RTS मध्ये १०० मिलीग्रॅम पोटॅशियम मेटा बायसल्फाईट मिक्स करावे.
५. तयार RTS निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावे व त्याला घट्ट बुच लावून हवाबंद करून थंड व कोरड्या जागी साठवावे.
६. RTS मध्ये फळांचा रस कमीत कमी १०% व एकूण विद्राव्य पदार्थाचे प्रमाण १०% असावे.
७. RTS पिण्यासाठी देताना पाणी टाकून विरल करण्याची गरज नसते त्यामुळे त्याला रेडी टु सर्व्ह (RTS) असे म्हणतात.
४. लिंबाचे लोणचे
साहित्य: लिंबू १ किलो, मीठ १२० ग्रॅम, हळद, मोठी इलायची, लाल तिखट, जिरे, बडीशेप, काळी मिरे पावडर, प्रत्येकी १० ग्रॅम, हिंग २ ग्रॅम, मोहरीचे तेल ५०० मिली इ.
कृती:
१. लिंबाचे लोणचे तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीचे पुर्ण पिकलेले, पिवळसर रंगाचे व मोठ्या आकाराची लिंबू फळे स्वच्छ धुवून कापडाने पुसुन घ्यावीत.
२. स्टीलच्या तीक्ष्ण सुरीच्या साहाय्याने लिंबाच्या ४ किंवा ८ फोडी करून त्यातील बिया काढून टाकाव्यात.
३. एक किलो लिंबासाठी १२० ग्रॅम मीठ आवश्यक असते.
४. एक चतुर्थांश फोडी पिळून त्याचा रस काढावा या रसात वरील सर्व मसाल्याचे पदार्थ व मीठ मिसळून घ्यावे.
५. तयार मिश्रण उरलेल्या ३/४ लिंबांच्या फोडींमध्ये मिक्स करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत भरून ही बरणी ४-६ दिवस उन्हात ठेवावी.
६. त्यानंतर मोहरीचे तेल गरम करून थंड झाल्यावर बरणीतील फोडींमध्ये टाकावे.
७. तयार लोणचे थंड व कोरड्या जागी साठवावे.
टीप: तेल टाकताना ते फोडींच्या वरपर्यंत येईल याची काळजी घ्यावी. ५. लिंबू मिरचीचे लोणचे
साहित्य: लिंबु ७५० ग्रॅम, हिरवी मिरची २५० ग्रॅम, मीठ १२० ग्रॅम, हळद, मोठी इलायची, जिरे, बडीशेप, काळी मिरे पावडर, दालचीनी, प्रत्येकी १० ग्रॅम, ७-८ लसूण पाकळ्या, हिंग २ ग्रॅम, मोहरीचे तेल ५०० मिली इ.
कृती:
१. सर्वप्रथम ७५० ग्रॅम परिपक्व पिवळसर रंगाचे लिंबू आणि २५० ग्रॅम चांगल्या प्रतीची हिरवी मिरची स्वच्छ पाण्याने धुवून कापडाच्या सहाय्याने पुसून कोरडे करावेत.
२. तीक्ष्ण स्टीलच्या सुरीच्या सहाय्याने लिंबाचे ८ भाग करून बिया काढून टाकाव्यात, तसेच मिरचीला मधोमध उभा काप द्यावा.
३. एक चतुर्थांश फोडी पिळून त्याचा रस काढावा या रसात वरील सर्व मसाल्याचे पदार्थ व मीठ मिसळून घ्यावे.
४. तयार मिश्रण उरलेल्या ३/४ लिंबांच्या फोडी व कापलेल्या मिरचीमध्ये मिक्स करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत भरून ही बरणी ४-६ दिवस उन्हात ठेवावी.
५. त्यानंतर मोहरीचे तेल गरम करून थंड झाल्यावर बरणीतील फोडींमध्ये टाकावे.
६. तयार लोणचे थंड व कोरड्या जागी साठवावे.
६. लिंबाच्या सालीचे तेल (लेमन ऑईल)
लिंबापासून रस वेगळा काढल्यानंतर उरलेल्या साली, बिया व चोथा यापासून बरेच उपपदार्थ बनविता येतात. यातील एक म्हणजे लिंबाच्या सालीचे तेल हे आहे. लिंबाच्या बियांमध्ये २८ ते ३०% तेल असते व चवीला हे फारच कडू असते. त्यामुळे याचा वापर रिफाइनिंग केल्यावरच अन्नपदार्थात केला जाऊ शकतो. अशुद्ध तेलाचा वापर साबण व डिटर्जंट बनविण्याच्या उद्योगात केला जातो.
तेल काढल्यावर बियांमध्ये खालीलप्रमाणे घटक पदार्थ राहतात. प्रथिने ३३.५%, मेद - ७.५०%, तंतुमय पदार्थ ७%. याचा वापर कोंबड्यांचे खाद्य म्हणून होतो. लिंबाच्या सालीपासून तेल काढण्यात येते. या तेलाचा अन्नपदार्थात, शीतपेयांमध्ये सुगंधी द्रव्य म्हणून वापर करण्यात येतो. शिवाय सौंदर्य प्रसाधने, औषधांमध्ये व घरगुती पदार्थात वापरण्यात येते. या तेलाला बाजारात चांगली किंमत मिळते. या तेलामध्ये सिट्राल हा मुख्य घटक पदार्थ असतो. लिंबाच्या सालीपासून तेल काढण्याकरिता कोल्ड प्रेस पद्धतीचा वापर अवलंब करतात.
लेखक -
प्राची बी. काळे
कार्यक्रम सहाय्यक,
कृषी विज्ञान केंद्र, धुळे.
Published on: 22 July 2020, 10:44 IST