भाग २
तृणधान्याच्या सेवनामुळे शरीरपोषणासाठी कमी खर्चात अधिक प्रमाणात ऊर्जा तृणधान्यांतून मिळतात. तंतूमय पदार्थाव्यतिरिक्त तृणधान्ये ही खनिजे, बी कॉम्प्लेक्स, जीवनसत्वे, लोह, कॅल्शियम व जस्त यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध आहेत. तृणधान्याच्या सेवनामुळे रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात राहते. तृणधान्ये ही आरोग्याला चालना देणाऱ्या फायटोकेमिकल्स, फिनोलिक संयुगे, टॅनिन यांसारख्या घटकांनी समृद्ध असून त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२१ च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तृणधान्यांमुळे टाईप २ च्या मधुमेहाचा धोका कमी होण्यास व मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये एचबीए १ सी चे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.
तृणधान्ये आपल्याला पोषणविषयक सुरक्षा पुरवितात. तृणधान्ये ही तंतूमय पदार्थांनी समृद्ध असलेली धान्य असून ती मानवी आतड्यामधील सूक्ष्म जीवसमूहासाठी चांगले जीवाणू म्हणून कार्य करतात, तृणधान्यांतील तंतूमय पदार्थ स्थूलांत्रे सजल ठेवतात आणि चयापचय क्रिया अतिशय चांगल्या स्थितीत ठेवतात. अशा प्रकारे तृणधान्य ही पचनविषयक आरोग्य चांगले ठेवण्यात योगदान देतात व आतड्यातील हालचाली नियमित ठेवण्यास मदत करतात.
रागी किंवा नाचणी (फिंगर मिलेट)
रागी किंवा नाचणी ‘आफ्रिकन बाजरी’या नावानेही ओळखली जाते. नाचणी हे सर्वाधिक पोषक तृणधान्य मानले जाते. प्रथिने, तंतूमय घटक व खनिजे यांचा उत्तम स्रोत आहे. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम व पोटॅशियम असते नाचणीमध्ये असलेल्या कमी ग्लायसेमिक संवेदनशीलतेमुळे नाचणीयुक्त आहारामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. रक्तदाब, यकृताचे विकार व दमा आजराच्यावेळी तसेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी नाचणीयुक्त आहार घेण्याची शिफारस करण्यात येते. नैसर्गिक लोह भरपूर प्रमाणात असते आणि त्याच्या सेवनामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
वरई (प्रोसो मिलेट)
प्रोसो मिलेट पॅनिकम मिलिसेम, चायनीज मिलेट, वऱ्याचे तांदूळ, वरी व हिंदीत चिन आदी नावाने ओळखले जाते. खनिजे, पचनशील तंतूमय घटक, पॉलिफिनॉल्स, जीवनसत्वे (विटॅामिन) व प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे आरोग्यासाठी ते बहुगुणी ठरते. ग्लुटेनयुक्त आहाराचा त्रास असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. वरईमध्ये उच्च पातळीचे लेक्टिनिन असते त्यामुळे मेंदू विषयक आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरते. याचा ग्लायसेमिक निर्देशांक कमी असून टाईप २ मधुमेह असलेल्या मधुमेहींसाठी उत्तम अन्न ठरते.
कांगणी किंवा राळ फॉक्सटेल तृणधान्य (सेक्टारिआ इटॅलिका)
फॉक्सटेल तृणधान्य (सेक्टारिआ इटॅलिका) ही मराठीमध्ये कंगणी किंवा राळ या नावाने ज्ञात असून ग्लुटेनमुक्त धान्य आहे, ज्यात तंतूमय पदार्थ, प्रथिने व खनिजे अधिक प्रमाणात असतात. थियामिन, नियासिन व जीवनसत्व बी-६ आणि मॅग्रेशियम, पोटॅशियम व जस्त या खनिजांचा समावेश असलेला उत्तम स्त्रोत आहे. कमी शर्करा असलेले अन्न असल्यामुळे रक्तातील साखरचे प्रमाण वाढत नाही. ऑक्सिडीकरण रोधी पदार्थांचा देखील चांगला स्त्रोत असून त्यामुळे आजारांपासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत होते.
भगर–बानयार्ड मिलेटस (इथिनोक्लोआ एस्कुलेंटा किंवा जापानी तृणधान्य)
भगर हे एक बहुउद्देशीय पिक असून खाद्यान्न व चारा या दोन्हीसाठी त्याची लागवड केली जाते. त्याचे हिंदीमधील सर्वसाधारण नाव सावा व मराठीतील नाव शामुळ आहे. तृणधान्यात प्रथिने, पाचक तंतू, आणि लोह भरपूर प्रमाणात असतात. मॅग्नेशियम, पोटॅशियम व जस्त यासारख्या खनिजांचा उत्तम स्त्रोत आहे. ग्लुटेनयुक्त पदार्थाची संवेदनशीलता असणाऱ्या लोकांसाठी चांगला पर्याय ठरु शकते.
सामा किंवा कोराळे-(ब्राऊन टॉप) (उरांचोला रॅमोस एल)
सामा किंवा कोराळे हे थायमिन, नियासिन व जीवनसत्व बी-६ चा उत्तम स्त्रोत आहे. दुय्यम पदार्थ म्हणून शिजविता येऊ शकत, वाढता येते, सुप किंवा स्ट्यूमध्ये तसेच पीठात देखील मिसळता येते. पाव, पॅनकेका किंवा इतर भाजलेल्या पदार्थात वापरता येते.
कोद्रा-(ब्राऊन टॉप)
कोद्रा तृणधान्यात सुमारे ११ टक्के प्रथिने आहेत, आणि प्रथिनांचे पौष्टिकमुल्य फॉक्सटेल बाजरीपेक्षा किंचित चांगले असल्याचे आढळले आहे, परंतु इतर लहान बाजरींच्या तुलनेत ते जास्त आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान
पौष्टिक तृणधान्यांचे राज्यातील लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढावी यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून तृणधान्य उत्पादनाला प्रोत्साहन आणि तृणधान्याच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी पीक प्रात्याक्षिके, सुधारित व संकरीत प्रमाणित बियाण्याचे वितरण, कीड व रोग व्यवस्थापनासाठी औषधांचे वितरण, जैविक खते व सूक्ष्म मूलद्रव्यांचा पुरवठा, विविध यंत्रे व कृषी औजारांचे वाटप, शेतीशाळा व शेतकरी प्रशिक्षणांचे आयोजन होत आहे. जिल्हास्तरीय कार्यशाळांद्वारे पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढ व आहारातील वापर वाढ यासाठी विविध उपक्रम राबविण्याकरिता ११० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागरिकांसाठी पौष्टिक आहार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ असे दोन्ही फायदे असल्याने हे अभियान उपयुक्त ठरणारे आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे
सदर माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनाय महाराष्ट्र शासन येथे प्रकाशित करण्यात आले आहे.
Published on: 09 February 2024, 12:54 IST