1. कृषी व्यवसाय

आरोग्यदायी कारल्याचा चहा

कडूपणासाठी प्रसिद्ध असलेले कारले आरोग्यवर्धक गुणधर्मासाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. आशिया उपखंडामध्ये आहारामध्ये भाजी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वापरही होतो. कारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. कारल्याच्या रसापासून विविध पदार्थांना मागणी वाढत आहे. कारल्याचे वाळवलेले काप, भुकटी हे अधिक काळ टिकू शकतात. आरोग्यासाठी जागरूक लोकांमध्ये कारल्याच्या चहा लोकप्रिय बनत आहे.

KJ Staff
KJ Staff


कडूपणासाठी प्रसिद्ध असलेले कारले आरोग्यवर्धक गुणधर्मासाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. आशिया उपखंडामध्ये आहारामध्ये भाजी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वापरही होतो. कारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. कारल्याच्या रसापासून विविध पदार्थांना मागणी वाढत आहे. कारल्याचे वाळवलेले काप, भुकटी हे अधिक काळ टिकू शकतात. आरोग्यासाठी जागरूक लोकांमध्ये कारल्याच्या चहा लोकप्रिय बनत आहे.

कारल्याचा चहा :

कारल्याच्या चहाला “गोयाह चहा” या नावाने ओळखले जाते. आरोग्यवर्धक चहा म्हणून याला मागणी आहे. यकृत, पचन यांच्या समस्या, इन्फ्लुएंजा रोखण्यासाठी, घशाचा दाह यामध्ये उपयुक्त असून, रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करतो.

चहा तयार करण्याची पद्धत :

  • वाहत्या पाण्यामध्ये कारली स्वच्छ धुऊन घ्यावीत. मऊ स्पंजच्या साह्याने वरील पृष्ठभाग घासून साफ करावा. लांबीच्या बाजूने दोन भाग करून, त्यातील गर व बिया चमच्याने काढून टाकाव्यात.
  • त्यानंतर कारल्याचे पातळ काप करून घ्यावेत. हे काप जितके पातळ असतील, तितक्या लवकर वाळतात आणि बारीक करणे सोपे जाते.
  • ट्रेमध्ये हे काप एका थरामध्ये ठेवून, त्यावर जाळी लावावी. म्हणजे कीटक आणि धूळ रोखली जाते.
  • हे ट्रे सूर्यप्रकाशामध्ये वाळण्यासाठी ठेवावेत. काही तासांनंतर उलट्या बाजूनेही वाळवून घ्यावेत. यासाठी वातावरणानुसार एक किंवा दोन दिवस लागू शकतात.
  • कॉफी ग्रायंडर किंवा फूड प्रोसेसरच्या साह्याने वाळवलेल्या कापांची भुकटी करून घ्यावी.
  • ही भुकटी हवाबंद डब्यामध्ये भरून थंड आणि कोरड्या जागेमध्ये साठवून ठेवावी.
  • एक चमचा कारल्याची भुकटी एक कप गरम पाण्यामध्ये टाकावी. काही मिनिटे ढवळ्यानंतर त्यात आपल्याला आवश्यक गोडी येईपर्यंत एक किंवा दोन चमचे मध टाकावा.

आरोग्यासाठी फायदे कारल्यातून फॉस्फरस आणि लोहासोबतच भरपूर प्रमाणात क-जीवनसत्त्व, आणि काही प्रमाणात अ-जीवनसत्त्व मिळते.

  • रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी : कारल्यामध्ये इन्सुलिनसारखे संयुग पॉलिपेप्टाईड-पी असून, नैसर्गिकरीत्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. नियमितपणे २००० मिलिग्रॅम या प्रमाणात कारले आहारात असल्यास टाइप-२ प्रकारच्या मधुमेहींच्या रक्तातील शर्करेचे मात्रा कमी होण्यास मदत होते. कारल्यातील वनस्पतिजन्य इन्सुलिनचा टाइप-१ मधुमेहामध्येही फायदा होतो.

  • बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी : कारल्यातील लोह आणि फोलिक आम्लामुळे हृदयरोग, पक्षाघात यांचा धोका कमी होतो. पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असल्याने, ते शरीरातील अतिरिक्त सोडियमचे शोषण करते. त्याचा फायदा रक्तदाब स्थिर ठेवण्यात होतो.

  • त्वचा व केसांच्या चमकदारपणांसाठी : त्वचेवरील वार्धक्यांच्या खुणा कमी करण्यामध्ये कारल्यातील एंटिऑक्सिडन्ट घटक व जीवनसत्त्व-अ आणि क महत्त्वाचे ठरतात. त्वचेवरील पुरळ, एक्झिमा आणि सोरायसीसचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेवर होणारे विपरीत परिणाम कमी होतात. कारल्याचा रस डोक्यामध्ये लावल्यास केस गळण्याचे, पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते. दुहेरी केस, केसांचा रखरखीतपणा, कोंडा कमी होतो.

  • यकृताच्या स्वच्छतेसाठी : कारल्यातील “मोमोर्डिका चॅराटिया” या संयुगामुळे युकृतातील आरोग्यकारक विकरांमध्ये (एंझायम्स) वाढ होते.

  • वजन कमी करण्यासाठी : कॅलरी, मेद आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारामध्ये त्यांचा समावेश केला जातो. यामुळे पोट भरल्याची भावना अधिक काळ राहते. कारल्याच्या रसामध्ये स्थौल्यत्व कमी करण्याचे गुणधर्म आहेत.

  • प्रतिकारकता वाढवण्यासाठी : विषाणू, जिवाणूंशी लढण्याची क्षमता असल्याने विविध एलर्जी रोखण्यासाठी उपयुक्त. ल्युकेमियासह विविध प्रकारच्या कर्करोगांविरुद्ध उपचारामध्ये फायदेशीर ठरू शकतात.

  • डोळ्यांसाठी : यातील बीटा-कॅरोटिन आणि जीवनसत्त्व-अ मुळे दृष्टीसंबंधी समस्यावर फायदेशीर. त्यासाठी प्रतिदिन 30 मिलि कारले रस घेण्याची शिफारस आहे.

  • बद्धकोष्ठता रोखण्यासाठी : कारले हा नैसर्गिक उपाय असून, त्यातील अन्य वाईट परिणाम दिसत नाहीत.


लेखक:

श्री. शैलेंद्र कटके 
प्रा. हेमंत देशपांडे
प्रा. डॉ. अरविंद सावते
अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

English Summary: Healthy Bitter Gourd Tea Published on: 20 January 2020, 03:33 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters