कैरी म्हटलं की कसं तोंडाला पाणी सुटतं ना? मधल्या सुट्टीत शाळेबाहेर विकायला आलेल्या कैर्या तर आठवतातच, पण एखाद्या झाडावरून पाडून खाल्लेल्याही आठवतात. तिखट-मीठ लावलेली कैरी बघून कुणाच्या तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. आता तर आंबासुद्धा मोठ्या प्रमाणावर बाजारात यायला लागला आहे. उन्हाळ्यातच प्रामुख्याने मिळणाऱ्या कैरी आणि आंब्यांचे आरोग्यासाठीही खूप फायदे आहेत. कैरीचा आंबा तयार होतो, तसे त्यात ‘अ’ जीवनसत्त्व तयार होते आणि तिचा रंगही बदलत जातो. या दोन्ही फळांमध्ये आपापल्या परीने आरोग्यदायी गुणधर्म आहेत.
कैरी:
- कैरी थंड प्रकृतीची असते. उन्हाळ्यात मुळातच हवामान उष्ण असल्यामुळे कैरीचे लोणचे, मुरांबा, पन्हे असे पदार्थ या दिवसांत चाखणे उत्तम.
- या दिवसांत घाम खूप येत असल्याने शरीरातील क्षार घामावाटे निघून जातात. स्नायू दमतात व थकवा जाणवतो. कैरीत सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्यामुळे क्षारांची परिपूर्ती होते. शिवाय कैरीत मॅग्नेशियमही असते. ते स्नायू शिथिल करण्याचे (मसल रीलॅक्संट) काम करते.
- ‘सी’ व ‘के’ जीवनसत्त्वेही कैरीत आहेत. अनेकांना उन्हाळ्यात घोळणा फुटण्याचा त्रास होतो. अशा वेळी रक्त येणे बंद होण्यासाठी ‘सी’ व ‘के’ जीवनसत्त्वे मदत करतात. ‘सी’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.
- कैरीचे सरबत किंवा पन्हे करताना त्यात वेलची घाला. तसेच कच्च्या कैरीचे पन्हे व लोणच्यात काळ्या मिरीची पूड जरूर घाला. कच्च्या कैरीत आंबटपणा अधिक असल्यामुळे त्यामुळे घशाचा त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी मिरपूड फायदेशीर.
- कैरी वापरताना ती किमान दोन तास पाण्यात बुडवून ठेवावी म्हणजे त्याचा चीक निघून जाईल. हीच काळजी आंब्यांच्या बाबतीतही घ्यावी. काहींना या चिकाची अॅलर्जी असू शकते व त्यामुळे अंगावर पित्ताच्या गाठी उठण्यासारखा त्रास होऊ शकतो.
आंबा:
- आंब्यात प्रामुख्याने ‘अ’ जीवनसत्त्व असते. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ते चांगले. आंब्यातील ‘ल्यूटिन’ व ‘झियाझँथिन’ ही तत्त्वेदेखील डोळ्यांना अतिनील किरणांपासून संरक्षण मिळण्यात मदत करतात. ‘अ’ जीवनसत्त्व शरीरात साठवून ठेवले जाते व शरीर पुढे बराच काळ ते वापरत असते.
- आंबा थोडा सारक गुणधर्माचा असतो. आंब्याची कोय मात्र त्यावर उतारा असतो. आंब्याच्या कोयीतील गर आंब्यामुळे होणाऱ्या जुलाबांवर उतारा म्हणून वापरला जातो.
- आमरस खाताना त्यात तूप व मिरपूड अवश्य घालावी. आंबा काही प्रमाणात गॅसेस निर्माण करणारा असल्यामुळे तूप-मिरपुडीमुळे तो चांगला पचतो
- ‘कॅल्शियम कार्बाइड’ची पावडर लावलेला आंबा टाळावा. गवतात आढी घालून नैसर्गिकरीत्या पिकवलेले आंबे चांगले. खाण्याआधी ते दोन तास पाण्यात भिजवून ठेवावेत.
आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. जेवणासोबत कैरी खाण्याची तर एक वेगळीच मजा असते. कैरी फक्त खाण्यासच चांगली लागत नाही तर कैरीचे आरोग्य फायदेसुध्दा आहेत. पिंपल्स, उष्मघात, अपचनाची समस्यां यासाठी कैरी एक उपयोगी फळ आहे.
कैरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे:
- हीट स्ट्रोक
कुलिंग एजंट प्रमाणेच कच्ची कैरी शरीरातील घटलेले फ्लुईडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात हीटस्ट्रोकचा त्रास जाणवत असल्यास कैरीचे पन्हे प्यावे. - रक्तदाब नियंत्रणात राहतो
कैरीमध्ये पोटॅशियमचा मुबलक साठा असतो. यामुळे इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण राखण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृद्यविकारांचा धोकाही कमी करता येतो. - पचन सुधारते
कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा किंवा मसालेदार पदार्थांचा त्रास होऊ नये म्हणून डाळीमध्ये, आमटीमध्ये कैरीचा समावेश करावा. - त्वचेचे आरोग्य सुधारते
कैरीतील अॅन्टीऑक्सिडंट घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तसेच यामुळे एजिंगची समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी कैरी खावी. - पिंपल्स कमी होतात
कच्च्या कैरीमधील अॅस्ट्रींजंट गुणधर्म त्वचेवर तेल आणि मळ जमा होऊ देत नाही. एक कप पाण्यात कैरीची फोड उकळा. ते पाणी रात्री झोपण्यापूर्वी चेहर्यावर लावा. दुसर्यादिवशी उठल्यावर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवा. फरक जाणवेल.
सध्या उन्हाळा सुरू आहे. या दिवसांत बाजारात कैऱ्या मुबलक उपलब्ध असतात. त्याचे विविध पदार्थ आरोग्यदायी आणि चविष्ट मानले जातात. उन्हाळ्यात मुळातच हवामान उष्ण असल्यामुळे कैरीचे लोणचे, मुरांबा, पन्हे असे पदार्थ या दिवसांत चाखणे उत्तम. नुसत्या कैर्या खाण्यापेक्षा आज आम्ही घेऊन आलो आहोत कैर्यांचे चटपटीत पदार्थांच्या साध्यासोप्या पाककृती.
1. कैरीचं पन्हं
साहित्य: कच्च्या आंब्याचा गर 1 कि ग्रॅम, मीठ-120 ग्रॅम, काळेमीठ- 80 ग्रॅम जिरे पावडर- 40 ग्रॅम, पुदिना पाने- 200 ग्रॅम, सायट्रिक ॲसिड- 20 ग्रॅम, साखर- 450 ग्रॅम, सोडियम बेन्झोएट- 1 ग्रॅम, पाणी गरजेनुसार.
कृती: आंबे स्वच्छ धुऊन घ्यावेत. समप्रमाणात आंबे व पाणी (1:1) घेऊन आंबे नरम होईपर्यंत शिजवावेत. गर काढून घ्यावा. सोडियम बेन्झोएटव्यतिरिक्त सर्व घटक पदार्थ एकत्र बारीक वाटून घ्यावेत. हे मिश्रण स्टील किंवा नायलॉनच्या चाळणीमधून गाळून घ्यावे. मिश्रण मोजावे. चार किलो वजन होण्यासाठी उर्वरित पाणी मिक्स करावे. सोडियम बेन्झोएट थोड्या पदार्थामध्ये मिसळून नंतर संपूर्ण पन्ह्यामध्ये मिसळावे. तयार पन्हे काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये पॅक करावे. पिण्यासाठी पन्हे तयार करताना एक भाग पन्हे व तीन भाग थंड पाण्यात मिसळून आस्वाद घ्यावा. सदर पन्हे साखर वगळून इतर घटक पदार्थ वापरून साखरविरहितसुद्धा करता येते.
2. बिनतेलाचे लोणचे
साहित्य: आंबा फोडी 1 किलो, मीठ- 110 ग्रॅम, मिरची पावडर- 30 ग्रॅम, हिंग- 10 ग्रॅम, सोडियम बेन्झोएट- 0.25 ग्रॅम.
कृती: कैरीचे साल काढावे. छोटे चौकोनी तुकडे करावेत. मीठ सोडियम बेन्झोएट मिसळावे. फोडी उन्हामध्ये दोन दिवस वाळवाव्यात. नंतर मिरची पावडर व हिंग पावडर मिसळावी. तयार लोणचे स्वच्छ काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये भरावे.
3. कैरीचे गोड लोणचे
साहित्य: आंबट कैरी 1 किलो, मोहरी डाळ 100 ग्रॅम, धणे 500 ग्रॅम, मेथी दाणे 25 ग्रॅम, गूळ 500 ग्रॅम, मीठ, लाल तिखट चवीनुसार, 2 टे. स्पून. लवंग दालचिनी जायफळ पूड, हिंग, तिळाचे तेल.
कृती: कैरीच्या मध्यम फोडी करून घ्या. धणे-मेथीदाण्याची भरडपूड करा. गूळ किसून घ्या. मोहरीडाळ, धणे पूड, मेथी पूड कोरडी भाजून घ्या. हिंग पूड करा. एका परातीत लाल-तिखट, हिंग व सर्व मसाले एकत्र करून त्यावर थोडा गरम तेल ओता, किसलेले गूळ व मीठ टाकून एकत्र करा. कैऱ्यांच्या फोडी घालून कालवा. वरून तेलाची झणझणीत फोडणी करून लोणच्यावर ओतून बरणीत भरून ठेवा. अधूनमधून हलवत राहा.
4. तक्कू
साहित्य: एक कैरी, दोन मध्यम आकाराचे कांदे, लाल तिखट, मीठ, साखर किंवा गूळ, फोडणीसाठी दोन चमचे तेल, अर्धा चहाचा चमचा मेथ्या, तितकी मोहरी, दोन चिमूट हिंग.
कृती: कैरी आणि कांदे दोन्ही किसून घ्या. या किसलेल्या मिश्रणात चवीप्रमाणं मीठ, साखर/बारीक चिरलेला गूळ आणि लाल तिखट घाला आणि नीट कालवून घ्या. कालवता-कालवता चव घेऊन पाहा. वकुबाप्रमाणे ‘स्स.’ करायला लावणारी पण, आणखी खायची इच्छा होईल इतपत आंबट-गोड-तिखट चव जमायला हवी. फोडणीच्या भांडय़ात तेल तापवून मोहरी तडतडवून घ्या. मेथ्या खरपूस तळा. मेथ्या लालसर होऊ लागल्या की, हिंग घाला. फोडणी थंड झाल्यानंतर कैरी-कांद्याच्या मिश्रणावर ओता. माणसांच्या तावडीतून वाचल्यास हा तक्कू फ्रीजमध्ये दोन-चार दिवस टिकतो.
5. कैरीची भाजी
साहित्य: कैरीच्या फोडी-1/2 किलो, किसलेला गूळ-4 ते 5 टेबल स्पून, अख्खे धणे-1 टी स्पून, लाल तिखट-1 ते दीड टी स्पून, लसूण पेस्ट-1 टी स्पून तमालपत्र-1, जिरे-मोहोरी-1 टी स्पून, चवीनुसार मीठ, गरजेनुसार तेल, सजावटीसाठी कोथिंबीर.
कृती: सर्वात प्रथम एका भांडय़ात पाणी गरम करत ठेवावे. पाणी उकळल्यानंतर त्यात कैरीच्या फोडी घालाव्यात व साधारण 10 ते 15 मिनिटं उकडू द्याव्यात. कैरीच्या फोडी नीट शिजल्या की नाही हे बघण्यासाठी एक फोड पाण्यातून बाहेर काढून दाबून बघावी, मऊ शिजली असेल तर कैरीच्या फोडी एका चाळणीत काढाव्यात आणि निथळत ठेवाव्यात. कढईत तेल गरम करत ठेवावे, त्यात तमालपत्र घालावे तसेच जिरे-मोहोरी घालून चांगली तडतडू द्यावी. त्यात अख्खे धणे घालावेत यानंतर लसूण पेस्ट तसेच हळद व लाल तिखट घालून नीट परतून घ्यावे. कैरीच्या उकडलेल्या फोडी घालून परतून घ्यावे. कैरीच्या फोडी नीट परतून झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालावे व परतून घ्यावे. यात किसलेला गूळ घालून नीट एकजीव करून घ्यावे. भाजीला आता थोडे पाणी सुटल्यासारखे वाटेल, भाजी पुन्हा परतून घ्यावी म्हणजे गूळ सर्व भाजीला लागेल. साधारण 5 ते 7 मिनिटात आच बंद करावी व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हि भाजी तोंडलावणी म्हणून सव्र्ह करता येईल .
6. कैरीची उडदामेथी
साहित्य: 2 कैऱ्या सालं काढून लांबट तुकडे केलेल्या, आवडत असल्यास कोयही वापरा, एका मोठ्या लिंबाएवढा गूळ, फोडणीसाठी 2 टीस्पून तेल, अगदी 2 चिमूट मोहरी, 1 टीस्पून उडदाची डाळ, अर्धा टीस्पून मेथी दाणे, 4-5 कढीपत्त्याची पानं, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार.
कृती: एका पातेल्यात तेल गरम करा. मोहरी घाला. ती तडतडली की त्यात उडदाची डाळ आणि मेथी दाणे घालून चांगलं लाल होऊ द्या. त्यात कढीपत्ता घाला. चिमूटभर हिंग आणि हळद घाला. आता त्यात कैरीचे तुकडे आणि कोय घाला. चांगलं हलवून घ्या आणि एक वाटी पाणी घाला. जराशी उकळी आली की त्यात मीठ आणि गूळ घाला. अजून 2 वाट्या पाणी घालून चांगली खळखळून उकळी येऊ द्या. कैरी मऊ शिजायला हवी. उकळी आल्यावर गॅस बारीक करून वाटण मसाला 1 घाला. नीट हलवून घ्या आणि वाटण मसाला 2 घाला. मंद गॅसवर जरासं शिजू द्या. चव बघून हवं असल्यास गुळाचं प्रमाण वाढवा. आपल्याला हवं तसं पाण्याचं प्रमाणही कमी-जास्त करा. उडदामेथी ही जराशी घट्टच असते. फार पातळ करू नका.
7. आंबेडाळ
साहित्य: एक वाटी हरभरा डाळ, एक कैरी, दोन हिरव्या मिरच्या, एक चहाचा चमचा साखर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, चवीपुरतं मीठ. फोडणीसाठी: दोन टेबलस्पून तेल, चिमूटभर मोहरी, अर्धा चहाचा चमचा हिंग, दोन-तीन फोडणीच्या लाल मिरच्या, हळद, वाटीभर हरभरा डाळ दोन-तीन तास भिजत घाला. हरभरा डाळ जास्त वेळ भिजली की, पिठूळ बनते आणि हाताशी वेळ कमी आहे म्हणून गरम पाण्यात भिजवली की तिची चव जाते. त्यामुळे दोनेक तास हाताशी असल्याशिवाय या पाकृच्या वाटेला जाऊ नये.
कृती: एक मध्यम आकाराची कैरी किसून घ्या. कैरीचा आंबटपणाही किंचित चाखून पाहा. त्यानुसार पाककृतीमध्ये कैरी कमी किंवा अधिक घालता येईल. आंबटपणा कमी करण्यासाठी साखरेचं प्रमाण खूप वाढवू नका, चव बदलते. मिक्सरच्या भांडय़ात जिरं, मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ घालून एकदा फिरवून घ्या. त्याच मिश्रणात पाणी पूर्णपणे निथळलेली डाळ घालून अर्धबोबडी वाटून घ्या. वाटलेलं मिश्रण एका वाडग्यात काढून घ्या. त्या मिश्रणातच आंबटपणानुसार किसलेली कैरी आणि साखर मिसळून नीट कालवून घ्या. फोडणीच्या कढईत तेल तापवून घ्या. तेल तापल्यानंतर मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडायला हवी. त्यानंतर हिंग, लाल मिरच्या आणि हळद घाला. या पदार्थात हिंग नेहमीच्या प्रमाणाहून थोडा जास्तच घालायचा असतो. फोडणी थंड झाल्यानंतर कैरी-डाळीच्या मिश्रणावर ओता. व्यवस्थित कालवून खायला घ्या. काहीजण आंबाडाळीत थोडं ओलं खोबरेदेखील किसून घालतात.
श्री. गणेश गायकवाड व श्री. ऋषिकेश माने
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
9850236380
Published on: 21 April 2019, 10:33 IST