Agriculture Processing

जिवाणू मातीतील सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात कुजवतात या प्रक्रियेत विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात, त्यामुळे विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. जिवाणू खतांचे प्रमाण अत्यंत तुम्ही असून, कमी खर्चात उपलब्ध होतात. मात्र उत्पादनात दहा ते 25 टक्क्यापर्यंत वाढ होते.

Updated on 25 January, 2024 2:24 PM IST

प्रो. ओतारी पी. टी, डॉ. सय्यद जे. आय.

पिकासाठी नत्र पालाश आणि पालाश यांच्या उपलब्धतेसाठी जैविक खते उपयुक्त ठरतात. या खतांचा योग्य वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढून पिकाच्या उत्पादनामध्ये दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंत होते. काही जिवाणू हवेतील नायट्रोजन नत्र शोषून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. या जिवाणूंची प्रयोग शाळेत वाढ करून, त्यापासून खते तयार केली जातात. अलीकडे जमिनीतून स्फुरद, पालाश, झिंक आणि लोह इत्यादी अन्नद्रव्यांची उपलब्धता करणारी जिवाणू खतेही उपलब्ध झाली आहेत. शेंगवर्गीय पिके आणि भुईमूग बियाणास रायझोबियम + पी एस बी ही जिवाणू खते प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति दहा किलो या प्रमाणात पेरणी आधी बीज प्रक्रिया करावी. गहू, ज्वारी, मका या पिकाच्या पेरणीच्या वेळी अझोटोबॅक्टर + पी एस बी प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति दहा किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.

जिवाणू खते का वापरावीत?

•जैविक खतामुळे जमिनीची सुपीकता आणि पोत सुधारतो, जमीन जैविक क्रियाशील बनते व उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते. आर्थिक आणि पर्यावरणाचे समतोल राखण्यास मदत होते.
•शेंगवर्गीय पिकामध्ये जिवाणू खताचा वापर केल्यास नत्रयुक्त गाठींचे प्रमाण मुळावर वाढते. हे जिवाणू हवा व जमिनीतील नत्र झाडाला उपलब्ध करतात. जिवाणूमुळे जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विविध रूपातून मुक्त करून मुलांना उपलब्ध केले जातात.
•जिवाणू मातीतील सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात कुजवतात या प्रक्रियेत विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात, त्यामुळे विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
•जिवाणू खतांचे प्रमाण अत्यंत तुम्ही असून, कमी खर्चात उपलब्ध होतात. मात्र उत्पादनात दहा ते 25 टक्क्यापर्यंत वाढ होते.
•जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात उपयुक्त बदल होतात.
•पिकासाठी वापरलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
•शेतातील मातीची सुपीकता टिकण्यास मदत होते.

रायझोबियम: या जिवाणूंचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते, हे जिवाणू कडधान्य वर्गीय पिकाच्या मुळावर ग्रंथी निर्माण करतात. या ग्रंथी मध्ये राहून हवेतील नत्र वायु शोषून घेऊन पिकास उपलब्ध करून देतात. या जिवाणूंचा नत्र रोपांची आवश्यकता असते.
अझोटोबॅक्टर: हे जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वनस्पतीच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने नायट्रोजनएज या विकराच्या सहाय्याने हवेतील नत्र स्थिरीकरणाचे कार्य करतात. या जिवाणूंच्या अनेक जात आहेत परंतु भारतासारख्या उष्ण प्रदेशाच्या जमिनीत मात्र अजून तो Azotobacter chroocuum ही उपजात प्रामुख्याने दिसून येते. अझोटोबॅक्टर जिवाणू हवेतील मुक्त स्वरूपात असणाऱ्या नत्र वायूचे स्थिरीकरण करून, पिकास उपलब्ध करून देतात.

स्फुरद विरघळविणारे जिवाणू:

स्फुरद जिवाणूंचा वापर करून मातीच्या कणावर स्थिर होणारे स्फुरदचे प्रमाण कमी करून त्याची उपलब्धता वाढविता येते. कडधान्य व तेलवर्गीय पिकामध्ये नत्रापेक्षा स्फुरदाची गरज अधिक असते. जमिनीत पुरेसे स्फुरद उपलब्ध असेल तर पिकामध्ये कार्ब युक्त पदार्थ प्रामुख्याने कर्बोदके तयार होण्याच्या प्रक्रियेला वेग येतो. पिकाच्या मुळाची जोरदार वाढ होते. पिक लवकर फुलोऱ्यात येतात व धान्याचे उत्पादन अधिक स्वरूपात येतात.

जिवाणू खते वापरताना:

•बियाणास आंतरशीकरण, रोपाच्या मुळावर आंतरशीकरण, मातीत मिसळणे, ठिबक सिंचनाद्वारे, पिकाच्या मुळाभोवती देणे.
•जिवाणू खते सूर्यप्रकाश व उष्णतेपासून, थंड व कोरड्या जागी साठवावीत.
•रायझोबियम खते पीक निहाय वापरावीत.
•जिवाणू खते रासायनिक खतात मिसळून वापरू नयेत.
•जिवाणू खते शक्यतो ताजी असावीत.
•जिवाणू खते दिली तरी पिकांना रासायनिक खतांची योग्य मात्रा देणे आवश्यक आहे.
•जिवाणू खते विकत घेताना पाकिटावरील खताचे नाव, कोणत्या पिकासाठी वापरावे, निर्मात्याचे व पत्ता, उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, बॅच नंबर आणि वापरण्याची पद्धती इत्यादी माहिती पाहून घ्यावी.
•जिवाणू खताचा वापर प्रामुख्याने बीज प्रक्रियेसाठी करावा.

उत्तम परिणाम मिळवण्यासाठी:

•बाजारातून जिवाणू खते आणताना त्यातून उपयुक्त जिवाणू प्रजाती संख्या असल्याची खात्री करावी.
•खात्रीलायक ठिकाणावरून खरेदी करावी, अन्यथा भेसळीची शक्यता असते.
•विविध जिवाणू खते एकत्र वापरण्यायोग्य असल्याची काळजी घ्यावी.
•वापरण्याची पद्धती, वेळ व प्रमाण पाकिटावर दिल्याप्रमाणे वापरावी.
•बीज प्रक्रिया करताना योग्य व चांगले स्टिकर (चिकट पदार्थ) वापरावेत.
•क्षारपड जमिनीत व इतर खराब झालेल्या जमिनीत वापर करावयाचा झाल्यास जिप्सम व वापरावे.
•स्फुरद व इतर अन्नद्रव्य पिकास योग्य प्रमाणात पुरवावे.
•जिवाणू खतातील जिवाणू अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी जमिनीत ओलावा आवश्यक आहे.
•जमिनीत जिवाणू मिसळताना किमान 50 किलो शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळून द्यावे.

लेखक - प्रो. ओतारी पी. टी. सहाय्यक प्राध्यापक श्रीराम कृषी महाविद्यालय, पानीव
डॉ. सय्यद जे. आय. सहाय्यक प्राध्यापक श्रीराम कृषी महाविद्यालय, पानीव

English Summary: Biological fertilizers Proper use and benefits of bacterial fertilizers agriculture news
Published on: 25 January 2024, 02:24 IST