Monsoon News : केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर केरळमध्ये पावसाची हजेरी सुरु झाली आहे. तर ईशान्य भारतात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी आणखी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून तामिळनाडू, कर्नाटक आणि बंगालच्या उपसागरात आणखी प्रगती करणार आहे.
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर त्याचा परिणाम मेघालयमध्ये देखील झाला आहे. मेघालयात मुसळधार पाऊस होत आहे. तसंच पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, आसामच्या भागात देखील पावसाचा सरी पाहायला मिळत आहेत. जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी गारपिटीची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर ब्रह्मपुरी येथे ४६.९°C कमाल तापमानाची नोंद झाली. तर सातारा येथे २४.१°C हे सर्वात कमी किमान तापमान होते.
देशात एकीकडे मान्सूनचे आगमन झाले तर दुसरीकडे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट दिसून आली आहे. चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट पसरली आहे.
उष्णतेमुळे देशात मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं
देशात पसरलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. उष्णतेमुळे नागरिकांना उष्माघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये आतापर्यंत ५५, झारखंडमध्ये ५ आणि ओडिशामध्ये ४२ तर महाराष्ट्रात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. पण बिहारमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
Share your comments