भर पावसात छत्री घेऊन कृषी मंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर
१. सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर काही ठिकाणी घरांची पडझड तर बऱ्याच घरांची पत्रे उडाली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भर पावसात कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे छत्री घेऊन बांधावर पोहचले. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. चिंता करू नका सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा शब्दांत मंत्री अब्दुल सत्तार यांनी धीर दिला आहे. तसेच झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल पाठविण्याचे आदेश अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
'कांदा उत्पादक शेतकरी आज संपला', प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्याला रडू आवरेना
२. शेतकऱ्यांसमोरील संकटांची मालिका काही संपायचं नाव घेईना. अवकाळी पाऊस त्यात शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी पुरता हतबल झालाय. काल राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. आणि यात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी तर आर्थिक संकटाला सामोरे जातोय.
बीड जिल्ह्यातील बेलूरा गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नितीन प्रभाळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून ही हृदयद्रावक दृश्ये शेयर केली आहेत. कांदा उत्पादक शेतकरी आज संपला असं वक्तव्य त्यांनी केलंय. तसेच सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणीही या शेतकऱ्याने केली आहे.
७० टक्के शेतकऱ्यांचा रिफायनरी प्रकल्पाला पाठींबा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य
३. रिफायनरी प्रकल्पावरून बारसू परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पाडणारच अशी ठाम भूमिका हाती घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा पाठिंबा या रिफायनरी प्रकल्पाला असल्याचा दावा केला आहे. तसेच आंदोलनासाठी काही बाहेरून लोक आले होते. आता मात्र तिथे शांतता आहे. शिवाय पोलिसांनी लाठीमार केलेला नाही. असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांवर अन्याय करून कुठलंही काम होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
भिवंडी येथील मौजे कैलासनगर वळपाडा येथील वर्धमान कंपाऊंड येथे इमारत कोसळली, ३ जणांचा मृत्यू
४. भिवंडी येथील मौजे कैलासनगर वळपाडा येथील वर्धमान कंपाऊंड येथे काल दुपारी इमारत कोसळली. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झालाय तर १२ जण जखमी झाले आहेत. मात्र वेळेत मदतकार्य सुरू झाल्यामुळे काही जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलं. तर जखमींवर भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसाला ५ लाख रुपयांची शासकीय मदत देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चात उपचार करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. शिवाय अशा घटना घडू नयेत यासाठी भिवंडीतील अतिधोकादायक अवस्थेतील इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करून त्यातील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे असे आदेशही देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
राज्यातील अनेक भागात गारपीट, शेतकरी मोठ्या संकटात
५. राज्यात काल झालेल्या प्रचंड गारपिटीमुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ही भयानक गारपिटीची दृश्य जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील आहे. या गारपिटीमुळे पीक उध्वस्त झाली असून शेतकरी मात्र मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर या बेमोसमी पावसानं अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहे. बुलढाणा, बीड जिल्ह्याही या पावसापासून वाचू शकला नाही. त्यामुळे राज्य सरकारने या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देणं आता गरजेचं आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्
६. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व तर 5 बाजार समित्या या भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सर्व १८ जागा जिंकून घवघवीत यश मिळवलं.
बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच अधिक जोमानं काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचं वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलाय. तसेच महाविकास आघाडीच्या राज्यातील सर्व विजयी उमेदवारांचं देखील अभिनंदन करत बाजार समित्यांचं कामकाज प्रभावीपणे चालेल यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे. धनंजय मुंडे
महाराष्ट्रात सुमारे 10,000 'पाऊस मोजणारी यंत्रे' बसवण्यात येणार, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
७. महाराष्ट्रात सुमारे 10,000 पाऊस मोजणारी यंत्रे बसवण्यात येणार आहेत, ज्यामुळे हवामानाची अचूक माहिती रिअल टाइममध्ये मिळेल, अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी दिलीये. राज्यात सध्या 2,200 पर्जन्यमापन यंत्रे आहेत, मात्र हा आकडा 10,000 पर्यंत नेण्याचा सरकारचा विचार असल्याचा अब्दुल सत्तार यांनी खरीप हंगामपूर्व बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
पीटीआयशी बोलताना कृषी आयुक्त सुनील चव्हाण म्हणाले, कि “हा प्रकल्प विचाराधीन आहे आणि आम्ही राज्यात 10,000 पाऊस मोजणारी यंत्रे बसवण्याची योजना आखत आहोत. यासाठी चार ग्रामपंचायतींसाठी एक मशीन बसविण्यात येणार आहे. हे यंत्र केवळ पावसाबद्दलच नाही, तर वाऱ्याचा वेग आणि हवामानाच्या इतर बाबींचाही डेटा देईल असं त्यांनी सांगितलं.
अधिक बातम्या :
तरुणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे, स्टार्टअपसाठीही पुढाकार घ्यावा : राज्यपाल रमेश बैस
आपला शेतकरी जगात भारी! पिकवली चक्क पांढऱ्या रंगाची जांभळं, असं केलं नियोजन
काळजी घ्या! IMD कडून राज्यात पाच दिवसांसाठी हवामानाचा गंभीर इशारा, या ठिकाणी गारपिटीची शक्यता...
Share your comments