1. फलोत्पादन

नवीन फळबागेचे नियोजन कसे करावे?; जाणून घ्या योग्य पद्धत

आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारची आहे?आपल्या जमिनीत फळझाडे येतील का?बारमाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का?आपल्या हवामानात फळझाडे कोणत्या प्रकारची येऊ शकतील? मातीची व पाण्याची तपासणी केली आहे काय?बागेसाठी उत्तम जातीवंत कलमे कोठून उपलब्ध होऊ शकतील?जी बाग आपण लावणार आहोत त्यास बाजारपेठ उपलब्ध आहे काय?प्रक्रिया उद्योग आहेत काय? अशा सर्व बाबींचा विचार केल्यानंतरच आपणास कोणती फळझाडे लावायला हवीत याचा विचार करणे महत्वाचे ठरते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
New Orchard Planting

New Orchard Planting

डॉ.आदिनाथ ताकटे

राज्यामध्ये सन १९९०-९१ पासून रोजगार हमी अंतर्गत १०० टक्के अनुदानित फळझाड लागवड हि महत्त्वाकांक्षी योजना सुरु झाली. तेंव्हा पासून फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील शेतकऱ्यांच्या मनावर रुजली. फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील पडीक जमिनीला मिळालेले वरदान ठरल, अस म्हटल तर वावग ठरू नये.राज्यात आता पर्यंत ३० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फळबागा उभ्या आहेत. परंतु अद्याप फळबाग लागवडीमध्ये अपेक्षित असे यश मिळालेले नाही हि वस्तूस्थिती आहे. अशा परिस्थितीत फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी “फळबाग लागवडीची पूर्वतयारी आणि नियोजन” या महत्वाच्या बाबी आहेत.

फळबागेच्या यशस्वी लागवडीकरिता महत्वाच्या बाबी कोणत्या?
आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारची आहे?आपल्या जमिनीत फळझाडे येतील का?बारमाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का?आपल्या हवामानात फळझाडे कोणत्या प्रकारची येऊ शकतील? मातीची व पाण्याची तपासणी केली आहे काय?बागेसाठी उत्तम जातीवंत कलमे कोठून उपलब्ध होऊ शकतील?जी बाग आपण लावणार आहोत त्यास बाजारपेठ उपलब्ध आहे काय?प्रक्रिया उद्योग आहेत काय? अशा सर्व बाबींचा विचार केल्यानंतरच आपणास कोणती फळझाडे लावायला हवीत याचा विचार करणे महत्वाचे ठरते.

फळबाग म्हणजे ५ ते ६ महिन्याच्या पिकांच्या मशागतीची गोष्ट नसते, तो एक दिर्घकाळ चालणारा व्यवसायाच म्हणायला हरकत नाही. एकदा त्यात पडले कि थांबुन चालत नाही. अनेक वर्ष सात्यत्याने व चिकाटीने बागेचे फलोत्पादन हाती येईपर्यंत कष्ट करावे लागतात. मेहनत घ्यावी लागते.घामही गाळावा लागतो. कधी कधी पैसा अपुरा पडतो,पाणी पुरत नाही.भावनेच्या भरात एखादी बाग करावयाची ठरविले जाते आणि मग धाडस निभाविता येत नाही.सगळा पसारा अर्ध्यावर सोडावा लागतो.त्यामुळे केलेल्या कष्टाची पैशाची, अनाठायी नासाडी होते. त्यामुळे फळबाग लागवड करण्यापूर्वी योग्य नियोजनांची नितांत आवश्यकता असते.

फळबागेसाठी जमिनीची निवड

आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, हलकी, मध्यम कि भारी हे सर्वाना परिचित असतेच.जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी.जमिनीची खोली किती आहे? जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे? जमिनीचा निचरा कसा आहे? त्याचा अभ्यास करूनच फळबाग निवडावी.फळबागेसाठी जमिनीची निवड करताना तिचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. फळबागेसाठी कमीत कमी १ मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमिन निवडावी. भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत,मध्यम पोताची जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा.मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी असावे. जमिनीचा उतार २ ते ३ टक्क्यापेक्षा जास्त नसावा. ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे,त्या ठिकाणच्या मातीचे परिक्षण करून घेणे आवश्यक आहे.

जमिनीचा प्रकार व त्यात घ्यावयाची पिके
अ.न.जमिनीचा प्रकार फळपिके

१.हलकी ते मध्यम -अंजीर,पेरू,डाळिंब,कागदी लिंबू,द्राक्षे,पपई,सीताफळ,बोर, करवंद, कवठ, चिंच
२.मध्यम - चिकू,आंबा,संत्री,मोसंबी, काजू,नारळ.
३.भारी - केळी

फार खोल असणाऱ्या जमिनी, क्षारयुक्त जमिनी, चोपण जमिनी यातून पाण्याचा निचरा योग्य होत नाही अशा जमिनीत प्रारंभी झाडे वाढल्यासारखी दिसली तरी पुढे वाढीचा वेग मंदावतो व उत्पादन मिळत नाही. काही वेळा झाडे मरण्याची संभावना असते.तसेच ज्या जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १० % पेक्षा जास्त आहे अशा जमिनीत फळबागेची वाढ होत नाही.

माती परिक्षण करण्यासाठी फळबाग क्षेत्रातील मातीचा नमुना कसा घ्यावा?

फळबागे करिता मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार प्रातिनिधिक नमुना घ्यावा. सर्वप्रथम ३ x ३ x ३ फुट खोलीचा (१०० से.मी) किंवा मुरूम लागेपर्यंत खड्डा करून पृष्ठभागापासून प्रत्येक फुटातील प्रतिनिधिक नमुना काढावा व तो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून तपासणी साठी पाठवावा.माती परीक्षणाप्रमाणेच पाण्याची तपासणी करणे आवश्यक आहे.आपले विहिरीचे/ बोअर चे पाणी क्षारयुक्त वा मचूळ असू नये ते गोड असावे. तेव्हा माती बरोबरच,पाण्याचेही रासायनिक परिक्षण करून घ्यावे आणि त्या अनुषंगानेच फळझाडांची निवड करावी.

फळबागेसाठी पाण्याची उपलब्धता

बागायती फळझाडांना नियमित पाणी द्यावे लागते,अशा बागायती फळझाडांची लागवड करताना कितपत पाणीपुरवठा पुरेल किंवा पाण्याची उपलब्धता किती आहे,याचा विचार करूनच नियोजन करावे.कोरडवाहू फळपिकांना लागवडीच्या सुरुवातीस पहिली तीन ते चार वर्ष पाण्याची,चांगल्या व समाधानकारक वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते.नारळ, सुपारी, केळी, पपई,चिकू मसाला पिके यांना इतर फळझाडांपेक्षा जास्त पाणी लागते.तसेच फळझाडांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता आवश्यक फवारणीसाठी पाण्याची आवश्यकता असते.म्हणून पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळझाडांची निवड करावी. आपल्याकडे १२ महिने पाण्याची सोय असेल तर ज्या फळझाडांना बाराही महिने पाणी लागते अशा फळझाडांची निवड करावी.आपल्याला पाणी आठ महिने पुरत असेल तर पेरू सारखी फळझाडे लावावीत.आपले पाणी फक्त सहा महिने पुरत असेल तर सीताफळ, रामफळ, आवळा, बोर या सारखी कोरडवाहू फळझाडांची लागवड करावी.

हवामानानुसार फळपिकांची लागवड

महाराष्ट्रातील शेतकरी या बाबतीत खरोखरच भाग्यवान आहेत, कारण आपल्या राज्यात सफरचंद वगळता बहुतेक फळझाडांची यशस्वी लागवड करता येते. कारण आपल्या राज्यातील हवामान फळबाग लागवडीसाठी खुपच अनुकूल आहे.यामुळे हवामांनाच्या बाबतीत फळबाग लागवड करताना शेतकऱ्यांना फारसा विचार करावा लागत नाही.आपल्या राज्याचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रात आंबा, केळी, चिकू, पपई, नारळ अशा प्रकारची फळझाडे घ्यावीत.पूर्वेकडील उष्ण व कोरड्या हवामानात संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, द्राक्षे, डाळिंब यासारखी फळझाडे घ्यावीत.कोकणसारख्या अति पावसाच्या भागात चिकू, नारळ, फणस, आंबा काजू यासारखी फळझाडे घ्यावीत.अति कमी पावसाच्या भागात बोर, सीताफळ, आवळा, चिंच अशी

कोरडवाहू फळझाडे घ्यावी

हवामानानुसार फळझाडांची लागवड न केल्यास फळे न येणे, फळे लागल्यास फळांची प्रत खालावणे,उशिरा फळे लागणे, रोग व किडींचा प्रादुर्भाव इत्यादी समस्या भेडसावतात म्हणून हवामानानुसार फळझाड लागवड करावी.

फळबागेची आखणी आणि अंतर

फळझाडांची आणि जागेची निवड झाल्यावर लागवडीसाठी आखणी करणे गरजेचे आहे, तेंव्हा जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवडीची पद्धत ठरवावी. फळपिके लागवडीच्या चौरस, आयताकृती, त्रिकोणी, षटकोनी, उतार (कंटूर) अशा निरनिराळ्या पद्धती आहेत.

चौरस पद्धत ही सर्वात सोपी,आखणीस अडचण नसणारी आणि उभ्या-आडव्या मशागतीस योग्य अशी पद्धत प्रामुख्याने सर्वत्र वापरली जाते,आंबा, पेरू, चिकू, संत्रा, मोसंबी इत्यादी फळझाडांची लागवड या पद्धतीने केली जाते. या पद्धतीमध्ये झाडांच्या रांगा काटकोन करून असतात. दोन झाडातील आणि दोन रोपातील अंतर सारखेच येत असल्यामुळे झाडे सर्व दिशांनी पाहिल्यास सारख्या अंतरावर दिसतात. या पद्धतीने लागवड करणे अत्यंत सुलभ असते.

फळबाग लागवडीचे अंतर

विविध फळझाडांसाठी खड्डा खोदणे आणि भरणे महत्वाचे, त्याकरिता खड्ड्याचा आकार किती असावा ? हे खड्डे केंव्हा घ्यावेत? आणि केंव्हा भरावेत आणि कसे ? जेथे फळझाडांची लागवड करावयाची आहे,तेथे योग्य त्या अंतरावर चौरस पद्धतीने आखणी करून खड्डे खोदावेत.जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि फळझाडांच्या प्रकारानुसार खड्ड्याचा आकार ठरवावा.खड्डे खोदण्याचे काम उशिरात उशिरा एप्रिल महिन्यात पूर्ण करावे.

सर्व साधारणपणे मोठ्या आकाराचे खड्डे हलक्या जमिनीत व मोठया विस्ताराच्या झाडासाठी घ्यावेत. दीर्घायुषी झाडे असतील तर १ x १ x १ मी. आकाराचा खड्डा घ्यावा.मध्यम आकारच्या झाडांना ७५ x ७५ x ७५ से. मी. व लहान झाडांना ६० x ६० x ६० से.मी आकारचे खड्डे घ्यावेत.जमीन डोंगर उतारची असेल तर समपातळी रेषा काढून त्याप्रमाणे लागवड करावी.

फळबागेसाठी खड्डा कसा भराल?

खड्डा खोदताना वरच्या व खालच्या थरातील माती वेगवेगळी टाकावी.खड्डे तीन आठवडे तापू द्यावे,जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाशामुळे खड्ड्याचे निर्जंतुकीकरण होईल. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खड्डे परत भरावे. खड्डे मातीने भरताना ते निर्जंतुकीकरण करून वाळलेला पालापाचोळा १५ से.मी. थरात भरावा. मातीमध्ये २०-२५ किलो चांगले कुजलेले शेणखत + २ ते ३ किलो गांडूळखत + २ ते ३ किलो लिंबोळी पेंड २५ ग्रॅम टायकोडर्मा जीवाणू +१५ ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जीवाणू +२५ ग्रॅम अॅझोटोबॅकटर हे मिश्रण मिसळून घ्यावे. खड्डा जमिनीच्या वर ५ ते ७ से.मी उंच भरून ठेवावा.म्हणजे पावसाळ्याच्यासुरुवाती बरोबर लागवड करता येईल.

फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती

खात्रीशीर पाऊस झाल्यावर पावसाच्या सुरुवातीस जून महिना अगर जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. अतिपावसात अगर पावसाच्या शेवटी सप्टेबर-ऑक्टोबर मध्ये फळझाड लागवड करू नये.पावसाच्या सुरुवातीस लागवड केलेली झाडे चांगली समाधानकारक वाढतात. काही कालावधीकरिता पाण्याचा ताणही सहन करू शकतात.जून-जुलै पर्यंत वेळेवर झाडांची लागवड झाल्यास वाढ जोमाने होते.

कलमांची निवड कशी कराल?

फळबागांपासून काही वर्षाच्या मेहनतीनंतर उत्पन्न देणारे झाड न मिळाल्यास ते तोडून दुसरे लावणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.फळझाडांची कलमे,रोपांच्या निवडीवर फळांची गुणवत्ता आणि फळबागेचे एकूण यश अवलंबून असते म्हणून बागेकरिता उत्कृष्ट आणि गुणवत्ता माहित असलेली दर्जेदार आणि खात्रीशीर कलमे रोपे आणावी.कृषि विद्यापीठ किंवा शासकीय रोपवाटिकेमधून शक्यतो रोपे आणावीत.शक्य नसल्यास आपल्या माहितीतील शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतून कलमे /रोपे घ्यावीत.कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत,यापेक्षा ती योग्य त्या जातीच्या मातृवृक्षापासून केलेली आहेत कि नाहीत याबाबींकडे अधिक लक्ष द्यावे.रोपे घेताना कलम बांधलेली आहेत व जोड पूर्णपणे जुळलेले आहेत याची खात्री करून घ्यावी. त्याच बरोबर ती वाढीला जोमदार आहेत,निरोगी आहेत आपणास पाहिजे त्याच जातीची आहेत याची खात्री करूनच घेतली पाहिजे

नवीन रोपांची/कलमांची लागवड कशा प्रकारे कराल?

प्रथम लागवड करण्यापूर्वी कलमाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंवर उभा काप द्यावा व मुळाभोवती असलेला मातीचा गोळा न फुटता पॉलिथीन बॅग काढावी.मोकळा झालेला गोळा दोन्ही हातात धरून खड्ड्याच्या मधोमध ठेऊन हलकेच दाबावा व मोकळ्या हाताने माती भरून गोळ्याभोवती माती टाकावी.अगोदर हाताने व नंतर पायांनी दाबावी,हे करताना मातीच्या गोळ्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी.आवशकता वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे.आधारासाठी पश्चिम बाजूस ६ इंच अंतरावर ४ ते ५ फुट बांबूची काठी रोऊन त्यात कलम बांधावी.

फळबाग लावतांना वाणांची निवड

भरपूर उत्पादन क्षमता असणाऱ्या जातीची निवड करावी.आपल्या भागासाठी शिफारशीत असावी.कीड व रोगास प्रतिकारक्षम असावी

फळबागेचे सरंक्षण

फळझाडे लागवड केल्यानंतर फळझाडांची नवीन वाढ जनावर खातात.तसेच रोप व कलमे तुडवतात. नवीन लावलेल्या झाडांचे भटक्या गुरांपासून संरक्षण करणे फारच गरजेचे आहे.त्यासाठी निवडलेल्या जागेभोवती चिलार,शिकेकाई,करवंद यासारख्या काटेरी झुडूपांचे कुंपण करावे.बागेचे उष्ण वारे, थंडीपासून व वादळापासून संरक्षण करण्यासाठी निलगिरी, शेवरी सारख्या उंच वाढणाऱ्या झाडांची पश्चिम व दक्षिण बाजूने २ ते ३ फुटांवर लागवड करावी.काही वेळा वाऱ्याच्या अडथळ्यासाठी लावलेली झाडे बागेतील मुख्य फळझाडांबरोबर पाणी आणि अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा करतात.हे टाळण्यासाठी अडथळ्यांच्या झाडांपासून १० फुट अंतरावर ३ फुट खोल व २ फुट रुंद खणून त्यामध्ये येणारी या झाडांची सर्व मुळे छाटून टाकावीत.अशा प्रकारे मुळ्या छाटण्याचे काम प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी करावे.

फळबागांची पारंपारिक लागवड व सधन लागवड

या पद्धतीमध्ये झाडांची छाटणी,विरळणी करणे सोपे जाते.पारंपारिक लागवडीपेक्षा जादा उत्पादन.सधन लागवड पद्धतीमध्ये फलोत्पादन लवकर मिळते. झाडांचा आकार लहान असल्याने कीड-रोग नियंत्रण व्यवस्थापन,फळांची काढणी सोपी व सहज शक्य होते.कमी क्षेत्रातुन जादा उत्पादन,फळांचा दर्जा,प्रत व गुणवत्ता,निर्यात क्षमता वाढविता येते.

कलमे लावतांना होणाऱ्या चुका

कलमांचा जोड मातीत दाबला जाणे. योग्य जातीची कलमे खरेदी न करणे.योग्य अंतरावर खड्डे न घेणे.बहुतांश ठिकाणी खड्डे भरताना फक्त मातीचा वापर करणे.रोपे/कलमे वाहतुकीच्या दरम्यान काळजी न घेणे. मान्यताप्राप्त नसलेल्या खाजगी नर्सरीतून किंवा शेतकऱ्यांकडून कलमे खरेदी करणे.

वाहतुकीच्या दृष्टीने फळबागेचे ठिकाण

जमिनीचे वाहतुकीच्या दृष्टीने स्थान अत्यंत महत्वाचे आहे.आपली जमीन वाहतुकीच्या रस्त्यापासून दूर असेल तर बागेला लागणारे साहित्य जागेवर पोहोचविणे;फळे वाहतुकीच्या सोयीच्या जाग्यावर आणणे याचा खर्च वाढतो.अनेकदा शेतकरी भावनेच्या भरत भलत्याच जागी फळबाग लावतात आणि साहित्य व फळे मजुरांच्या डोक्यावर वाहून नेण्याचा खर्च प्रचंड वाढून बागेतून फायदा काही हाती लागत नाही.त्यामुळे सुरुवातीलाच वाहतुकीच्या दृष्टीने नियोजन करण आवश्यक आहे.

फळबाग यशस्वी करण्यासाठी महत्वाच्या टिप्स

जमिनीची निवड,हवामानानुसार फळझाडांची लागवड,पाण्याची उपलब्धता,फळबागेची आखणी, योग्य कलमांची निवड, लागवडीची योग्य वेळ आणि लागवड केलेल्या रोपांची काळजी,या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य नियोजन केल्यासं फळबाग नक्कीच फायद्याची ठरेल.अत्याधुनिक तंत्रज्ञान,व्यापक दुरद्र्ष्टी, उच्चध्येये, ती प्रत्यक्ष साकारण्यासाठी प्रयत्न अभ्यासाची पराकाष्टा, उद्योजक वृत्ती या बाबी केंद्रस्थानी ठेवल्या तर निश्चितच आपली फळबाग रोल मॉडेल् ठरेल यात शंका नाही.

लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे, मृद शास्त्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
मो.९४०४०३२३८९

English Summary: How to Plan a New Orchard Learn the correct method Published on: 16 May 2024, 02:45 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters