शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय तर शेतकरी करतातच, परंतु त्यासोबतच कमी खर्चा मध्ये आणि कमीत कमी जागेत जास्त नफा देण्याची क्षमता ठेवणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन व्यवसाय होय. सध्याच्या परिस्थितीत शेळीपालन व्यवसायाला एक व्यावसायिक स्वरूप येत असून अनेक शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. त्यासोबतच शेतकऱ्यांना किंवा अशा तरुणांना शासनाकडून देखील वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करून प्रोत्साहन दिले जात आहे.
याचाच एक भाग म्हणून ठाणबंद पद्धतीने शेळीपालन योजनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील आठ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या वर्षी लाभ मिळणार असून प्रत्येक जिल्हानुसार उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
नक्की वाचा:Milk Fat: 'या' उपाययोजना करा आणि वाढवा दुधातील फॅट,तरच येईल घरी आर्थिक गंगा
एकंदरीत या योजनेचे स्वरूप
या योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी असतील तर त्यांना 50% अनुदान दिले जाते तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 75 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळतो. या योजनेची या वर्षीची जमेची बाजू म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगल्या निधीची तरतूद केली गेली आहे.
ही जी ठाणबंद पद्धतीने शेळीपालन योजना आहे ही राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून संपूर्ण राज्यभरात राबवली जाते व या योजनेच्या माध्यमातून शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान मिळते.
तसे पाहायला गेले तर या योजनेच्या माध्यमातून अनुदान मिळण्याची मागणी भरपूर शेतकऱ्यांची आहे. या योजनेत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मागच्या वर्षापासून सुरू करण्यात आली असून पुढच्या पाच वर्षापर्यंत तोच अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.
या योजनेमध्ये दहा शेळ्या व एक बोकड यासाठी शेतकरी जर सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर त्यांना 51 हजार 772 रुपये अनुदान मिळते आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना 77 हजार 653 रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेमध्ये सोडत पद्धतीने लाभार्थी निवडले जातात.
Share your comments