1. कृषीपीडिया

Soybean Crop Management : सोयाबीन पिकास कोणती खते द्यावी? जाणून घ्या खतमात्रेचा डोस

सोयाबीन करिता शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० गाड्या शेणखत ( १० टन) जमिनीत पसरून दयावे.पेरणीच्या वेळी ५० किलो नत्र अधिक ७५ किलो स्फूरद अधिक ४५ किलो पालाश अधिक २० किलो गंधक प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेसच दयावे.स्फूरद देण्यासाठी सिंगल सुपर फॉसपेट या खताचा वापर केला तर अतिरिक्त गंधक देण्याची आवश्यकता नाही परंतु गंधकरहित खतांचा ( १८:१८:१०,१२:३२:१६,१०:२६:२६ डीएपी ई.) वापर केला तर गंधक २० किलो प्रती हेक्टर दयावे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Soybean Crop Management News

Soybean Crop Management News

आदिनाथ ताकटे, डॉ.अनिल राजगुरू

महाराष्ट्रात सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे.मागील पाच वर्षाच्या क्षेत्राच्या आकडेवारीचे अवलोकन केल्यास सोयाबीन हे महाराष्ट्र राज्यांत क्रंमाक एक वर असल्याचे दिसून येते.या पिकाची उत्पादकता कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे या पिकाला खरीप हंगामातील एक सहज येणारे कोरडवाहू पीक म्हणूनच पहिले जाते.त्यामुळे शेतकरी या पिकाच्या लागवडी संदर्भात अगदी कमी खर्चाच्या परंतु उत्पादकता वाढविण्यास मदत करणाऱ्या बाबींकडे विशेष लक्ष देत नाही असे दिसून येते.

वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी इ.सन २०२५ पर्यंत ३०० दश लक्ष अन्नधान्याची गरज भासणार आहे. वाढत्या लोकसंख्येची वाढती अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर अनिवार्य असून त्यासाठी माती परिक्षणानुसार खत वापर करणे गरजेचे आहे.योग्य प्रमाणात खत दिल्यास जमिनीची सुपिकता आणि उत्पादकता वाढून पीक उत्पादन वाढेल आणि जमिनीचे आरोग्य उत्तम राहील. सोयाबीन करिता मध्यम खोलीची,चांगला निचरा होणारी,अत्यंत हलकी,उथळ तसेच मुरमाड जमिनीत लागवड करू नये.जास्त आम्लयुक्त,क्षारयुक्त वा रेताड जमिनीत पीक घेऊ नये.जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले असावे.

सोयाबीन करिता शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० गाड्या शेणखत ( १० टन) जमिनीत पसरून दयावे.पेरणीच्या वेळी ५० किलो नत्र अधिक ७५ किलो स्फूरद अधिक ४५ किलो पालाश अधिक २० किलो गंधक प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेसच दयावे.स्फूरद देण्यासाठी सिंगल सुपर फॉसपेट या खताचा वापर केला तर अतिरिक्त गंधक देण्याची आवश्यकता नाही परंतु गंधकरहित खतांचा ( १८:१८:१०,१२:३२:१६,१०:२६:२६ डीएपी ई.) वापर केला तर गंधक २० किलो प्रती हेक्टर दयावे.

रासायनिक खताबरोबर हेक्टरी १५ किलो फोरेट दिल्यास सोयाबीन वरील खोडमाशी व चक्री भुंग्याचे नियंत्रण होण्यास मदत होते.सर्व रासायनिक खते पेरणीच्या वेळेसच द्यावीत.पेरणी नंतर नत्रयुक्त खतांचा वापर माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी-जास्त करावी.पेरणीसाठी ट्रॅक्टरचलित पेरणी व खत यंत्राचा वापर केल्यास खते बियाण्याच्या ५ ते ७ से.मी. खाली पडेल अशा रीतीने पेरणी करावी.बियाण्यास खतांचा स्पर्श होऊ देऊ नये.शिफारस केलेल्या खतांची मात्रा देण्यासाठी तक्त्यात देलेल्या पर्यायांचा वापर करा.

खतमात्रा ( किलो प्रती हेक्टरी)
अ.न.खत मात्रेचे पर्याय (किलो /हेक्टर)

१.डीएपी-१६३ किलो + युरिया-४६ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश- ७५ किलो.
२.युरिया-१०९ किलो + एसएसपी-४६९ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश- ७५ किलो
३.१५:१५:१५ -३०० किलो + एसएसपी- १८८ किलो + युरिया -११ किलो
४.१०:२६:२६ -१७३ किलो + डीएपी-६५ किलो + युरिया - ४६ किलो
५.१०:२६:२६ -१७३ किलो + एसएसपी- १८८ किलो + युरिया -७१ किलो
६.१८:१८:१० -२७८ किलो.+ एसएसपी- १५६ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश- २८ किलो.
७.१२:३२:१६ -२३४ किलो + एसएसपी- १८८ किलो + युरिया -४८ किलो

खतमात्रा ( गोण्या प्रती हेक्टरी)
अ.न.- खत मात्रेचे पर्याय ( गोणी /हेक्टर )

१.डीएपी-३.५ गोण्या + युरिया - १ गोणी + म्युरेट ऑफ पोटॅश- १.५ गोणी
२.युरिया-२ गोण्या + एसएसपी- ९.५ गोण्या + म्युरेट ऑफ पोटॅश- १.५ गोण्या
३.१५:१५:१५ - ६ गोण्या + एसएसपी- ४ गोण्या + युरिया -११ किलो
४.१०:२६:२६ - ३.५ गोण्या + डीएपी- १.५ गोणी + युरिया – १ गोणी
५.१०:२६:२६ - ३.५ गोणी + एसएसपी- ४ गोण्या + युरिया -१.५ गोणी
६.१८:१८:१० - ५.५ गोणी .+ एसएसपी- ३ गोण्या + म्युरेट ऑफ पोटॅश- अर्धी गोणी
७.१२:३२:१६ - ५ गोणी + एसएसपी- ४ गोण्या +युरिया -१ गोणी
टीप :युरिया गोणी ४५ किलोची , तर सर्व खतांच्या गोण्या ५० किलोच्या

 

बीजप्रक्रिया:
•पेरणीपूर्वी कार्बोक्झील ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के या सयुंक्त बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
•खोडमाशीचा प्रभाव टाळण्यासाठी बुरशीनाशकाच्या बीजप्रक्रियेनंतर थायामेथोक्झाम (३० टक्के एफएस) या कीटकनाशकाची १० मिली प्रति किलो प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
•त्यानंतर रायझोबियम व स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणू खतांची (पीएसबी) २५० ग्रॅम प्रति १० किलो प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

महाराष्ट्रातील उप पर्वतीय विभागाच्या हलक्या जमिनीमध्ये सोयाबीन पिकाच्या अधिक उत्पादन आणि आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खत मात्रे मधील ( ५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद ,४५ किलो पालाश आणि १० टन शेणखत प्रती हेक्टर) ५०% नत्र व पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरीत पेरणीनंतर ३५ दिवसांनी देण्याची शिफारस करण्यात येत आहे.( शिफारस: Joint Agresco 2023)

सोयाबीनचे वाण व कालावधी
कमी कालावधीचे वाण (८०- ९० दिवस)
जेएस -२०-३४,
जेएस-९५-६०
जे एस -९३-०५
एमएयुएस-४७

मध्यम कालावधीचे वाण ((९५ – १०५ दिवस )
फुले दुर्वा (केडीएस ९९२)
फुले किमया(केडीएस ७५३)
पीडीकेव्ही अंबा(एएमएस१००-३९)
पीडीकेव्ही सुवर्ण सोया( एएमएसएमबी ५-१८)

पानांवर व शेंगांवर लव असणारे वाण:
एएमएस१००१ (पीडीकेव्ही यलो गोल्ड)
एमएयुएस १६२
एमएयुएस ६१२
एमएयुएस १५८,
जेएस२०-२९
जेएस २०-११६
जास्त कालावधीचे वाण( ११५ ते १२० दिवस)
फुले संगम(केडीएस ७२६),

सोयाबीन सुधारित वाण :
महात्मा फुले कृषि विद्यापीठ विकसित वाण:
फुले दुर्वा (केडीएस ९९२),फुले किमया (केडीएस ७५३),फुले संगम(केडीएस ७२६),फुले अग्रणी
(केडीएस ३३४),फुले कल्याणी (डीएस २२८)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित वाण:
एमएयुएस ७१( समृद्धी ), एमएयुएस १५८, एमएयुएस १६२, एमएयुएस ६१२,

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला विकसित वाण:
एएमएस१००१ (पीडीकेव्ही यलो गोल्ड) पीडीकेव्ही अंबा(एएमएस१००-३९)

आधारकर संशोधन संथ विकसित वाण -
एमएयुएस११८८, एमएयुएस१२८१

जेएनकेकेव्ही,जबलपूर विकसित वाण:
जेएस ३३५ ,जेएस ९३-०५, जेएस ९७-५२ ,जेएस२०-२९ जेएस २०-११६

सोयाबीन उत्पादन वाढी करिता महत्वाच्या टिप्स:
पिकाची फेरपालट करावी
पेरणी वेळेवर करावी ( १५ जुलै पूर्वीच)
पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
१००% शुद्ध दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरावे.
जमिनीच्या पोता नुसार पेरणीचे अंतर ठेवावे.( ४५ x ५ से.मी./३० x १५ से.मी.
पेरणीपूर्वी बियाणांची उगवणशक्ती तपासून मगच पेरणी केल्यास झाडांची संख्या उत्तम राखता येईल.
बियाणे ३.५ ते ४ से.मी पेक्षा खोल पेरू नये.
हेक्टरी रासायनिक खताबरोबर १० किलो बोरॅक्स व २० किलो झिंक सल्फेट दयावे.
पीक २० ते २५ दिवसाचे असताना सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिवळे पडल्यास सुक्ष्म अन्नद्रव्याची ५० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा
पीक फुलोरावस्थेत असताना डवरणी करू नये.
पेरणी ही उतारस आडवी पूर्व पश्चिम करावी.
शेंगा लागण्याच्या अवस्थेत १९:१९:१९ तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत ०:५२:३४ या विद्राव्य खतांची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
पावसाचा खंड पीक फुलोरावस्थेत व दाणे भरण्याच्या वेळेस पडल्यास पाण्याचे व्यवस्थापन करावे,म्हणजे उत्पादनात घट येणार नाही.
पिकाची काढणी वेळेत (९० ते ११० दिवसांत ) न केल्यास दाणे गळतात.
मळणी करतांना ड्रमची गती ३०० ते ३५० फेरे प्रती मिनिट यापेक्षा जास्त नसावी.

लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे,मृद शास्त्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, मो.नं ९४०४०३२३८९
डॉ.अनिल राजगुरू,सहायक प्राध्यापक,कृषि वनस्पती शास्र कृषि महाविद्यालय ,पुणे

English Summary: Soybean Crop Management What fertilizers should be given to soybean crop Know the dose of fertilizer Published on: 23 May 2024, 11:27 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters